मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Mahakumbh mela devotees) प्रयागराज येथे महाकुंभात सहभागी होण्यासाठी देश-विदेशातून मोठ्यासंख्येने भाविक आले आहेत. महाकुंभाच्या पहिल्या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत साधारण ८० लाख हून अधिक भाविकांनी स्नान केले. विदेशी पर्यटकही याठिकाणी सहभागी झाले होते. महाकुंभाच्या दृष्टिकोनातून मकर संक्रांती हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून विविध आखाड्यातील साधूसंत या दिवशी पहिले अमृतस्नान करतील. तरी काही विदेशी पर्यटकांमध्ये पहिल्या दिवसापासूनच उत्साह निर्माण झाल्याचे दिसते आहे.
पोलंडहून आलेल्या भक्त क्लॉडियाने सांगितले की, त्यांना महाकुंभात येऊन आनंद होत आहे. त्यांच्यासाठी हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. महाकुंभाची औपचारिक सुरुवात झाली असली तरी दि. १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी त्या अमृत स्नान करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाकुंभाला येणारे साधूसंत अन्य भाविक यांचेसुद्धा त्यांनी मनोभावे कौतुक केले आहे.
ऑस्ट्रेलियाहून आलेल्या मंजरिका आपला अनुभव मांडताना म्हणाल्या की, 'त्या गेल्या ४० दिवसांपासून भारतात आहेत. महाकुंभाचा अनुभव पुन्हा पुन्हा मिळत नाही त्यामुळे महाकुंभाला येण्याबाबत त्यांनी यापूर्वीच निश्चित केले होते. व्यावसायिक दृष्ट्या त्या योगाशिक्षक असल्याचे त्यांनी सांगितले.' विविध देशांतून आलेल्या भाविकांनी महाकुंभात आपला सहभाग दर्शविला असून सनातनचा जयजयकार होताना दिसतो आहे.