दोन हिंदूंची हत्या, एकाचे अपहरण; कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर अल्पसंख्याक
13-Jan-2025
Total Views | 23
ढाका : बांगलादेशमध्ये ( Bangladesh ) गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मोहम्मद युनूस सत्तेवर आल्यापासून हिंदूंविरुद्ध हिंसाचार सुरूच आहे. गेल्या पाच दिवसांत कट्टपंथीयांनी सहा मंदिरांना लक्ष्य केले आहे. यांपैकी चितगावमधील हातझारी येथील चार मंदिरांवर झालेले हल्ले आहेत. याशिवाय, कॉक्स बाजार आणि लाल मोनिरहाट येथील प्रत्येकी एका मंदिरात लूटमार झाली.
बांगलादेशातही हिंदूंविरुद्ध हिंसाचार आणि अपहरणाची प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये दोन हिंदूंची हत्या आणि एकाचे अपहरण झाले आहे. मृतांमध्ये माजी महाविद्यालयीन शिक्षक दिलीप कुमार रॉय (७१) यांना त्यांच्या घरात घुसून कट्टरपंथीयांनी हत्या केली. जलखाठी जिल्ह्यात २६ वर्षीय व्यापारी सुदेव हलदर यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनांमधील एकाही आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही.
हिंदू प्राचार्याकडून राजीनामा घेतला
चितगाव येथील हिंदू प्रधान चंदन महाजन यांना कट्टरपंथीयांनी राजीनामा देण्यास भाग पाडले. स्थानिक लोक याला धार्मिक द्वेषातून प्रेरित षड्यंत्र म्हणत आहेत. त्याचवेळी गायबांडा जिल्ह्यात एका हिंदू महिलेच्या घराला आग लावण्यात आली. धलग्राम युनियनमध्ये दोन हिंदूंच्या घरांवर दरोडा टाकल्याची घटना घडली आहे.
चितगांवमध्ये मंदिरांची दानपेटी लुटली
चितगावमधील हाथजारी भागात चार मंदिरांत नियोजित पद्धतीने दरोडा टाकण्यात आला आहे. माँ विश्वेश्वरी काली मंदिरातील सोन्याचे दागिने आणि दानपेटी लुटली. त्याचबरोबर, सत्यनारायण सेवा आश्रम, माँ मगधेश्वरी मंदिर आणि जगबंधू आश्रमातही चोरीच्या घटना उघडकीस आल्या. कॉक्सबाजार येथील श्रीमंदिरातही चोरीच्या घटना घडल्या आहेत. येथे चोरट्यांनी सीसीटीव्ही रेकॉर्डिंग नष्ट केले.
अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले राजकीय
युनूस सरकारने पोलिसांच्या अहवालाचा हवाला देत सांगितले की, गेल्या वर्षी दि. ४ ऑगस्ट रोजीपासून अल्पसंख्याक समुदायांवर सातत्याने हल्ले होत आहेत. मात्र, यातील बहुतांश हल्ले राजकीय स्वरुपाचे असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. सरकारनेही मान्य केले आहे की, यातील अनेक हल्ले जातीयवादी होते. परंतु, बहुतांश घटना राजकीय हेतूने प्रेरित होत्या. जातीय हिंसाचाराच्या तक्रारी थेट प्राप्त करण्यासाठी आणि अल्पसंख्याक समुदायाशी संपर्क ठेवण्यासाठी पोलिसांनी एक व्हॉट्सअॅप नंबरदेखील जारी केला आहे.