महाकुंभमेळ्यात पहिल्याच दिवशी स्नान करणाऱ्यांची संख्या ६० लाखांच्या पार!
13-Jan-2025
Total Views | 38
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Mahakumbh First Day) प्रयागराज येथे महाकुंभाला सुरुवात झाली असून लाखो भाविक याठिकाणी येत आहेत. अमृत स्नानाची पहिली तारीख १४ जानेवारी असली तरी महाकुंभाच्या पहिल्याच दिवसापासून आलेले भाविक संगमात स्नान करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत ६० लाख लोकांनी कुंभमेळ्यात स्नान केले आहे.
उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने येणाऱ्या भाविकांच्या राहण्याची व सुरक्षेची चोख व्यवस्था केल्याचे दिसते आहे. ठिकठिकाणी सुरक्षा दल तैनात आहेत. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी विशेष टेंटसिटी महाकुंभपरिसरात उभारण्यात आली आहे. महाकुंभ सुरु व्हायच्या पूर्वसंध्येलाच मोठ्या संख्येने भाविक कुंभपरिसरात यायला सुरुवात झाली होती. सोमवारी सकाळी ७.३० वाजोपर्यंत ३५ लाख लोकांनी संगमात स्नान केले तर ९.३० पर्यंत ती संख्या ६० लाखापर्यंत पोहोचली.
अध्यात्मिक वारशाला मूर्त रूप देणारा महाकुंभ
भारतीय मूल्ये आणि संस्कृती जपणाऱ्या करोडो लोकांसाठी एक अतिशय खास दिवस आहे. श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीच्या पवित्र संगमावर असंख्य लोकांना एकत्र आणणारा महाकुंभ २०२५ प्रयागराजमध्ये सुरू झाला. महाकुंभ भारताच्या कालातीत अध्यात्मिक वारशाला मूर्त रूप देतो आणि श्रद्धा व सुसंवाद साजरा करतो. प्रयागराज येथे अगणित लोक येत आहेत, पवित्र स्नान करून आशीर्वाद घेत आहेत हे पाहून मला आनंद होत आहे. सर्व यात्रेकरू आणि पर्यटकांना अनेक शुभेच्छा.