कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी बुद्धिमत्तेशी स्पर्धा करू शकत नाही, या मतावर सुरुवातीच्या काळात अनेकजण ठाम होते. पण, कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’ने अल्पावधीतच अनेकांना त्यांचे हे मत बदलायला लावले. ‘एआय’ अस्तित्वात आल्यानंतर, एकामागोमाग एक अशा अनेक क्षेत्रांमध्ये माणसांची जागा घ्यायला सुरुवात केली. इतके सगळे होत असतानाही साहित्यक्षेत्रात ‘एआय’ शिरकाव करू शकणार नाही, असे काहींना वाटत होतेच. कारण, साहित्यात बुद्धिमत्तेची जितकी गरज असते, तितकीच भावनिकतेची असते. साहित्य म्हणजे बुद्धिमत्ता आणि भावनांचा संगम असतो, असे मानले जाते. पण, ‘एआय’ने हा समजसुद्धा खोटा ठरवून ,साहित्यक्षेत्रांमध्ये पाऊल टाकलेले आहे.
काही महिन्यांपूर्वीच ‘वीन बॉश अॅण्ड केनिंग’ या प्रसिद्ध डच पब्लिशिंग हाऊसने, ललित साहित्याचे भाषांतर करण्यासाठी ‘एआय’चा वापर करणार असल्याचे सांगितले. त्या बातमीने साहित्यविश्वाचे आणि विशेषत: भाषांतरकारांचे,अनुवादकांचे लक्ष वेधून घेतले. व्यावसायिक क्षेत्रांमध्ये भाषांतरासाठी ‘एआय’चा वापर कमी-अधिक प्रमाणात सुरू होताच. पण, साहित्याच्या आणि तेही ललित साहित्यच्या भाषांतरासाठी, ‘एआय’चा वापर केला जाणार ही गोष्ट धक्कादायक होती. त्यातही ‘वीन बॉश अॅण्ड केनिंग’ सारख्या मोठ्या प्रकाशन संस्थेने हे जाहीर केले, त्यामुळे या गोष्टीची दखल गांभीर्याने घेतली जाणे महत्त्वाचे ठरते. या घटनेमुळे साहित्यविश्वात एक वाद सुरू झाला, तो वाद अजूनही संपलेला नाही. ‘एआय’च्या भाषांतर क्षेत्रात झालेल्या शिरकावामुळे, अनेक भाषांतरकरांना त्यांच्या नोकर्या गमवाव्या लागणार आहेत, असे एका गटाचे मत आहे. तर हा एक नवीन प्रयोग आहे, यामुळे साहित्यविश्वाच्या कक्षा रुंदावतील आणि त्यामुळे साहित्य अधिकाधिक वाचकांकडे पोहोचेल, अशा मताचा दुसरा गट आहे. एका गटासाठी हा बदल नकारात्मक आहे, तर दुसर्या गटासाठी सकारात्मक.
कोणतेही नवीन तंत्रज्ञान जेव्हा अस्तित्वात येते, तेव्हा त्याचे स्वागत करणारा आणि त्याला विरोध करणारा असे दोन गट तयार होतात. तंत्रज्ञान आणि माणसाची तुलना वर्षानुवर्षे केली जात आहे. कारण, कोणतेही तंत्रज्ञान माणसाचे कोणतेतरी काम सोपे करण्यासाठी अस्तित्वात आलेले असते. त्यामुळे त्या तंत्रज्ञानाचा माणसाला किती नफा होणार आणि किती तोटा होणार, याचा विचार होणे आणि त्याविषयी मतमतांतरे असणे साहजिकच आहे. पण, पूर्वी आलेल्या कोणत्याही तंत्रज्ञानापेक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता अधिक प्रगत आणि प्रभावी आहे. मानवी बुद्धिमत्तेच्या जोरावर तयार झालेल्या या कृत्रिम बुद्धिमत्तेने, थेट मानवी बुद्धिमत्तेलाच आव्हान दिलेले आहे. ‘एआय’ मानवी भावनांनाही आव्हान देईल यावर पूर्वी कोणाचाही विश्वास बसला नसता. पण, आता नक्कीच या आव्हानाची दखल घ्यावी लागेल.
ललित साहित्यातील बराचसा भाग लेखकाच्या किंवा कवीच्या कल्पनेवर, त्याच्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित असतो. त्यात लेखकाचे वैयक्तिक जीवन, त्याची भाषा, त्याचा समाज आणि तो ज्या काळात जगत आहे, तो काळ अशा अनेक गोष्टींचे प्रतिबिंब उमटलेले असते. शिवाय या साहित्यात सगळ्याची महत्त्वाची असते ती भाषा. वरवर साध्या आणि सहज वाटणार्या शब्दांचा गुढार्थ, त्या साहित्यात दडलेला असतो. त्यामुळे ललित साहित्याचे भाषांतर करणे तुलनेने कठीण असते. शिवाय ज्या भाषेत ते भाषांतरित करायचे आहे, त्या भाषेचे व्याकरण, संदर्भ या गोष्टीही समजून घेणे, खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे एक अनुभवी आणि तज्ज्ञ भाषांतरकार किंवा अनुवादकच, अशा साहित्याचे भाषांतर चांगल्या पद्धतीने करू शकते. ‘एआय’ला या सगळ्या गोष्टी कितपत जमतील, हा एक खूप मोठा प्रश्न आहे.
अशा प्रकारच्या साहित्याचे भाषांतर जर ‘एआय’कडून अचूकरित्या करून घ्यायचे असेल, तर त्यासाठी ‘एआय’मध्ये भाषिकदृष्ट्या खूप बदल करावे लागणार. त्यासाठी पुन्हा मानवी बुद्धीचाच कस लागणार आहे. म्हणजे, अजूनही कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी बुद्धिमत्तेवरच अवलंबून आहे, असे अजून तरी म्हणावे लागेल. ‘एआय’ जितके प्रगत होत आहे, तितकीच त्याला निर्माण करणारी मानवी बुद्धिमत्ता एक मजल पुढे जात आहे. त्यामुळे अजून तरी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी बुद्धिमत्ता हातात हात घालूनच चालत आहेत. पण, ही बुद्धिमत्ता मानवी बुद्धिमत्तेच्या वरचढ ठरणार का? याचे उत्तर येत्या काळात ‘एआय’ ललित साहित्याचे भाषांतर किती प्रमाणात आणि कशाप्रमाणे करते, यावर अवलंबून आहे.