मन नटवरा विस्मयकारा, आत्मविरोधी कुतूहलधरा’.... खरंच काळाच्या प्रवाहात बदललेले संगीत कितीही ऐकले, आत्मसात केले तरीही नाट्य संगीताचा प्रभाव आणि मनावर त्याचा होणारा सकारात्मक परिणाम काही वेगळाच. १८४३ साली संगीत नाटकाची सुरुवात झाली. त्यानंतर असंख्य संगीत नाटके प्रसिद्धीस आली. प्रेक्षकांनी त्यांचे तोंडभरुन कौतुकही केले, प्रतिसादही दिला. १९११ साली मराठी रंगभूमीवर आलेले ‘संगीत मानापमान’ या संगीत नाटकाने इतिहासच रचला. कृष्णाजी खाडिलकर लिखित या नाटकाचे संगीत दिग्दर्शन केले होते, गोविंदराव टेंबे यांनी. गोविंदराव टेंबे, बालगंधर्व, श्रीपाद नेवरेकर, नारायणराव बोडस यांच्या अभिनयाने समृद्ध झालेल्या या नाटकाला दिनानाथ मंगेशकर, बालगंधर्व, जितेंद्र अभिषेकी, पंडित वसंतराव देशपांडे, रामदास कामत अशा दिग्गज गायकांचे संगीत आजही रसिकांच्या मनात घर करुन आहे. आता पुन्हा एकदा २१व्या शतकात नव्या पिढीला आपल्या नाट्यसंगीताचा वारसा समजावा, यासाठी सुबोध भावे यांनी ‘संगीत मानापमान’ या नाटकाचे चित्रपटात माध्यमांतर करुन प्रेक्षकांसमोर सादर केले. कुठल्याही कलाकृतीत संगीताची काय ताकद असते, हे आजच्या पिढीला जाणीव करुन देणारी ही कलाकृती आहे.
‘संगीत मानापमान’ चित्रपटाची कथा भामिनी, धैर्यधर, चंद्रविलास यांच्याभोवती फिरते. सुख, समाधान, शौर्य यांचे प्रतीक असलेले संग्रामपूर. राज्यातील ज्येष्ठ सेनापती (अभिनेता शैलेश दातार) आपल्या पदावरुन निवृत्त होण्याचा विचार महाराणींना (अभिनेत्री निवेदिता सराफ) सांगतात. “त्यांच्या जागेवर येत्या वर्षभरात नवा सेनापती निवड करु,” असे वचन, काकासाहेब महाराणींना देतात. दुसरीकडे उपसेनापती चंद्रविलास (अभिनेता सुमित राघवन) आणि सेनापतींची मुलगी भामिनी (अभिनेत्री वैदेही परशुरामी) हे दोघे लहानपणापासून एकमेकांचे मित्र असतात. त्यांच्या घनिष्ट मैत्रीचे रुपांतर नात्यात व्हावे आणि भामिनीशी सुखाने संसार व्हावा, अशी स्वप्न चंद्रविलास पाहात असतो. तर दुसरीकडे संग्रामपूरमधील चंदनवाडीत राहणारा धैर्यधर (अभिनेता सुबोध भावे) सैन्यात भरती होण्याची स्वप्न बाळगून असतो. मात्र, आईच्या हट्टामुळे, तो सैन्यात भरती होण्याची इच्छा कायम बाजूला ठेवत असतो. मात्र, एका घटनेमुळे धैर्यधर संग्रामपूरच्या सैन्यात भरती होतो. ज्येष्ठ सेनापती धैर्यधराच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होतात. भामिनीच्या वाढदिवशी ते धैर्यधरच्या आईसमोर भामिनी आणि धैर्यधरच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवतात. परंतु, या प्रस्तावाला भामिनी धुडकावून लावून धैर्यधरच्या आईचा अपमान करते. सर्वांसमोर आईचा भामिनीने केलेला अपमान, धैर्यधरला सहन होत नाही. त्यानंतर एकमेकांबद्दल त्यांच्या मनात प्रचंड असूया आणि सुडाच्या भावना जागृत होतात. या सगळ्याचा गैरफायदा, चंद्रविलास मात्र घेतो आणि मग सुरू होतो भामिनी आणि धैर्यधर यांच्यातील मान-अपमानाचा खेळ. आता यात कोण बाजी मारतो आणि शेवटी विजय ध्वज कुणाच्या हाती येतो? हे जाणून घेण्यासाठी ‘संगीत मानापमान’ चित्रपट एकदा तरी पाहावा.
मुळात ‘संगीत मानापमान’ या नाटकाची व्याप्ती आणि त्याची मुळे इतकी खोलवर रुजली आहेत की, त्याचे चित्रपटात माध्यमांतर करावसे वाटणे यासाठी दिग्दर्शक आणि अभिनेता सुबोध भावे यांचे नक्कीच कौतुक करावेसे वाटते. चित्रपटाचा मूळ गाभा संगीत असून, त्याचे भान राखत प्रसंगानुरुप गाणी चित्रपटात चित्रित करण्यात आली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला, प्रमुख पात्रांची ओळख करुन देणारे संगीत ते धैर्यधर आणि भामिनी यांच्या मनात एकमेकांबद्दल विष कालवण्यासाठी चंद्रविलासने गाण्यातून, एकमेकांची केलेली चुगली या प्रत्येक दृष्यांमध्ये संगीत एक वेगळाच अनुभव देऊन जातो. अर्थात ‘संगीत मानापमान’ या नाटकाच्या फारसा जवळपास हा चित्रपट जाऊ शकला नाही. परंतु, संगीत दिग्दर्शक शंकर-एहसान-लॉय, गायक, दिग्दर्शक, लेखक आणि कलाकार यांनी या अजरामर नाटकाला चित्रपटाच्या स्वरुपात दिलेली ही मानवंदना नक्कीच म्हणता येईल. अर्थात मूळ नाटकातील सर्वच गाणी ही आजही प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. मात्र, ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ घेत, चित्रपटात बहुसंख्य गाणी बदलण्यात आली आहेत. त्यापैकी काही मोजकीच मूळ नाटकातील गाणी चित्रपटात घेतली असून, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
चित्रपटात धैर्यधर या योद्ध्याची कथा असल्यामुळे अनेक अॅक्शन सीन्स आहेत. शिवाय, भव्य चित्रपट कसा असतो, एखासे भव्य राज्य दाखवायचे म्हणजे काय, या कल्पनेच्या जवळपास पोहोचवणारा हा चित्रपट आहे. तर, चित्रपटातील अॅक्शन सीन्स पाहताना, काही दाक्षिणात्य चित्रपटांमधील अॅक्शन सीन्सचा आधार घेतल्याचे भासते. अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास सुबोध भावे, सुमित राघवन, वैदेही परशुरामी, उपेंद्र लिमये, नीना कुलकर्णी या सगळ्याच प्रमुख पात्रांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. शिवाय, नव्या आणि जुन्या पिढीला संगीतामार्फत जोडण्याचा ‘संगीत मानापमान’ चित्रपटातील प्रयत्न बर्यापैकी यशस्वी झाला आहे. पण, तरीही मूळ ‘संगीत मानापमान’ नाटकातील पदे चित्रपटात घेतली असती, तर अधिक रंजकता वाढली असती, असेही वाटते.
चित्रपट : संगीत मानापमान
दिग्दर्शक : सुबोध भावे
कलाकार : सुबोध भावे, वैदेही परशुरामी, सुमित राघवन, उपेंद्र लिमये, निवेदिता सराफ, नीना कुलकर्णी
रेटिंग : ***