भारतभूमीला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. प्रत्येक संतांनी साहित्यामध्येही मोठे योगदान दिले. कोणाचे अभंग, तर कोणाची गवळण, तर कोणी श्लोक अशा विविध काव्यपद्धतींचा वापर करत, या देशात भक्तीचा मळा फुलवत, समाजाला उपदेशही केला. त्यापैकीच ‘दोहा’ हा काव्यप्रकार म्हटले की, आपल्या चटकन लक्षात येतात ते संत कबीर महाराज. सामान्यांना सहज उमजेल अशी लहान लहान दोह्यांची रचना हे कबीर महाराजांच्या काव्याचे वैशिष्ट्य. कबीर महाराजांनी लाभलेल्या दीर्घायुष्यात निर्गुणाची उपासना केली. तरीही त्यांचे रामरंगातच न्हाऊन निघाले होते. संपूर्ण उत्तर भारतात रामनामाच्या प्रसाराचे कार्य करणार्या रामकाज करण्यास कायम तत्पर असलेल्या संत कबीर महाराज यांच्याविषयी..
त्तर भारतातील गोस्वामी तुलसीदास यांच्या नंतरचे थोर संत म्हणजे, महात्मा कबीर होय! कबीरदासांना सगुण भक्तीपेक्षा,निर्गुण ब्रह्माची उपासना-भक्ती अधिक प्रिय होती. त्यामुळे त्यांना निर्गुणोपासक संत मानले जाते. महाराष्ट्रात जसे ‘तुका म्हणे’ ही नाममुद्रा सर्वजनप्रिय आहे, तशीच हिंदी भाषिकांमध्ये ‘कहे कबीर सुनो भाई साधो।’हा नाममुद्रावजा दोहा सर्वोतोमुखी आहे. काशीमध्ये जन्मलेले कबीर हे पू.रामानंदांचे शिष्य होते. गुरू रामानंदांकडूनच त्यांना रामनामाची दीक्षा प्राप्त झालेली होती. कबीर दीर्घायुषी होते. त्यांना १२० वर्षांचे भक्तीजीवन लाभलेले होते. विवेकाधिष्ठित डोळस भक्ती, हे कबीरांच्या नामसाधनेचे सार आहे. “रामनाम हीच माझी खरी धनदौलत आहे, रामनाम हेच माझे जीवनसर्वस्व आहे,” असे कबीर म्हणतात.
मैं बऊंरी मेरा रामु भतारू। रचि रचि ताकऊं करूऊं सिंगार।
भले निंदऊं, भले निंदऊं लोगू। तनु मनु राम पिआरे जोगू॥
महात्मा कबीरदास यांचे हे पद, उत्तर भारतात सर्वत्र ऐकू येते. रामभक्तांच्या भाविकांच्या बोलण्यात, या कबीरवाणीचा सहज वापर आढळून येतो. कबीर हे थोर निर्गुर्णोपासक रामभक्त म्हणून ओळखले जातात. उत्तर भारतात जे अनेक पंथ संप्रदाय आहेत, त्यामध्ये सगुणोपासक आणि निर्गुणोपासक अशा दोन भक्तीधारा आहेत. गोस्वामी तुलसीदास हे सगुणोपासक भक्तीपरंपरेचे पुरस्कर्ते मानले जातात, तर संत कबीर निर्गुणोपासकांचे अग्रणी मानले जातात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे वैशिष्ट्य म्हणजे, मराठी संतपरंपरेने ‘सगुण-निर्गुण एक गोविंदु रे।’ म्हणत, समन्वयाचा मार्ग प्रशस्त केलेला आहे.
कबीरदास यांच्या सर्व जीवनाबद्दल अभ्यासकांमध्ये मतभिन्नता आहे. त्यांचा जन्म, जन्मकाळ, माता-पिता, जात-धर्म, गुरू हे सारे विषय वादग्रस्त आहेत. असो! पण, इ. स. १३९८ ते १५१८ असा १२० वर्षांचा त्यांचा कार्यकाळ मानला जातो. त्यांच्या आईवडिलांची माहिती ज्ञात नाही, म्हणून ते अनाथ होते असे मानले जाते. कोष्टी विणकर समाजातील नीमा नावाची महिला, कबीर यांचा सांभाळ करते. काशी येथे ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिनी त्यांचा जन्म झाला. १२० वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य त्यांना लाभले होते. इ. स. १५१८ मध्ये मगहर येथे त्यांचे निर्वाण झाले. थोर संत, रामानंद यांचे कबीर शिष्य होते, असे मानले जाते. त्यांच्या गुरू अनुग्रहाची एक लोकश्रुती प्रसिद्ध आहे. गुरू रामानंदांकडून रामनामाची दीक्षा त्यांना प्राप्त झाली होती.
मध्यकालीन भारताच्या सांस्कृतिक इतिहासात, भक्तीकाळातील ‘भक्ती आंदोलना’चे अपूर्व योगदान आहे. त्या भक्तीकाळात जे महान संत, सुधारक होऊन गेले, ज्यांनी भक्तीच्या जोरावर सारा समाज एक करून स्वत्वाचे, स्वाभिमानाचे जागरण केले, त्यामध्ये संत कबीर हे एक प्रमुख संत होते. त्यांचे साहित्य जेवढे गूढ, रहस्यवादी आहे, तेवढेच त्यांचे जीवन अनेक चमत्कार कथा-आख्यायिकांनी भरलेले आहे. कबीर समजणे फार अवघड आहे. थोर तत्त्वज्ञ गुरूदेव रानडे यांनी कबीरांची, नेमक्या समर्पक शब्दात मिमांसा केलेली आहे. कबीर विचाराचा प्रभाव सर्वदूर झालेला आहे. डॉ. आंबेडकरांचे वडील रामजी हे कबीर पंथी होते आणि डॉ. आंबेडकरांवरही कबीरांच्या दोह्यांचा खास प्रभाव होता. “कबीरांचे काव्य, तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक अनुभूतीचा अपूर्व संगम आहे,” असे गुरुदेव रानडे म्हणतात.
“विवेकाधिष्ठित डोळस श्रद्धा, भक्ती हे कबीरांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य होते. ते धर्म पंथ निरपेक्ष, सगुणनिर्गुणातीत अशा ईश्वरी शक्तीचे उपासक व पुरस्कर्ते होते. त्यांच्या नावावर ६३ काव्यग्रंथ-साहित्यकृती आहेत. त्यापैकी सहा ग्रंथ मुख्य आहेत,” असे क्षितीमोहन सेन यांचे मत आहे. ‘बीजक’, ‘साखी संग्रह‘, ‘शब्दावली’, ‘दोहावली’, ‘ग्रंथावली’ आणि ‘कबीरसागर’ हे ते प्रमुख ग्रंथ होत. कबीर बहुभाषिक होते. त्यांच्या काव्यरचना दोहा, चौपाई, गेयपद छंदात असून, ‘ब्रजभाषा’, ‘पूर्वी बोली’, ‘राजस्थानी-पंजाबी’ संयुक्त ‘खडी बोली’ अशा विविध भाषेत आहेत. कबीर हे साक्षर नव्हते. त्यांचे काव्य मौखिक रूपातच होते. ते शिष्यांनी संग्रह करून ग्रंथबद्ध केले आहे. कबीरांचे ‘दोहे’ आणि ‘साखी’ पोथीनिष्ठांना, अंधश्रद्धाळूंना केलेला विवेक बोध आहे. ‘साखी’ म्हणजे साक्षीभाव, अनुभूती. ‘मैं कहता औखन की देखी । तू कहता कागज की लेखी ।’ हा उद्गार, आध्यात्मिक उच्चकोटीच्या अनुभूतीचे बोल आहेत. मराठी संत नामदेवांबद्दल कबीरांनी गुरूभावाने लिहिले आहे. बहुतेक सर्व मराठी संतांनी कबीरगौरव गायलेला आहे.
राम मोहि सतगुरू मिले अनेक
कबीरांच्या या वचनात ‘राम’ हे नाव गुरू रामानंदांचे आहे, असे काही अभ्यासक म्हणतात. तर काहींच्या मते, समर्थ रामदासांप्रमाणे प्रत्यक्ष प्रभू राम हेच कबीरांचे गुरू होते. कबीरांचे एकूण जीवनच राममय होते. “रामनाम हीच माझी खरी दौलत आहे,” असे ते म्हणत. कबीर काव्यात, ‘राम’ शब्द सर्वाधिक वेळा येतो. त्यानंतर ‘हरि’ हे ईश्वरवाचक नामही अनेक वेळा आहे. ते धर्मपंथातील फकीर होते. त्यामुळे ‘राम-हरि’प्रमाणे, अल्ला-रहिम (दयाळू) हे शब्दही आढळतात. कबीर सामाजिक एकता व सौहार्दाचे पुरस्कर्ते होते. कोणत्याही प्रकारचा भेदाभेद त्यांना मान्य नव्हता.
कबीर सांगे कुणी नीच नसे । ‘रामनाम’नीचमुखी न वसे ।
कबीर वाणीमध्ये, रामाप्रमाणेच पंढरपूरचा ‘विठ्ठल’ आणि द्वारकेचा राणा ‘कृष्ण’ यांचाही श्रद्धेने उल्लेख आहे. कबीर पुत्र ‘कमाल’ची, कबीर गौरव करणारी अनेक पदे आहेत. ‘कमाल’ने एका पदामध्ये, नामदेवांचा, विठ्ठलाचा आणि कबीरांचा ‘रामचरन का बंदा’ असा गौरव केला आहे.
दक्खनम्याने नामा दरजी, उनोका बंदा विठ्ठल है ।
उत्तरम्याने भयो कबीरा, रामचरण का बंदा है ।
‘जो बोले तो रामहि बोलि ।’ (जे बोलाल ते राम बोला)
‘ऐसा मन राम नाम बेधिला ।’ (राम नामाने असे मन वेधले )
‘कबीर सुमिरन सार है और सकल जंजाल ।
जा दिन तेरो कोई नही ना दिन राम सहाई ।’
राम नाम हे कलियुगी सर्वात मोठा आधार आहे. राम नाम हेच माझे सर्वस्व आहे, म्हणत कबीरांनी राम नाम साधनेचा वारंवार उपदेश केलेला आहे. शेवटी थोडक्यात कबीरांचा राम हा ‘आत्माराम’ होता.
॥ जय श्रीराम ॥
विद्याधर ताठे
९८८१९०९७७५
(पुढील अंकात : दशम गुरू गोविंदसिंह यांचे ‘रामावतार’)