महाराष्ट्र भाजप कार्यकारी अध्यक्षपदी रविंद्र चव्हाण
12-Jan-2025
Total Views | 35
नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी रविंद्र चव्हाण ( Ravindra Chavan ) यांची महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना संघटनात्मक बांधणीचे काम देऊन संघटन प्रभारी पद देण्यात आले होते. लवकरच ते मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून जबाबदारी स्वीकारतील.
शिर्डी येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय महाधिवेशनाआधी झालेल्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत रविंद्र चव्हाण यांची भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची जबाबदारी असल्याने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी रविंद्र चव्हाण यांच्याकडे दिले जाऊ शकते.
रविंद्र चव्हाण यांना याआधी संघटनात्मक बांधणीचे काम देऊन संघटन प्रभारी केले होते. यानंतर आता कार्यकारी अध्यक्षपदाची नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. सन २०२२ मध्ये बावनकुळे यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. तीन वर्षांसाठी ही नियुक्ती केली जाते.
याबद्दल रविंद्र चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत. ’प्रथम, त्यानंतर पक्ष व शेवटी स्वतः’ हा भाजप परिवाराचा मंत्र मनात ठेवूनच आजवर राष्ट्रसेवेचा वसा जपत आलो आहे. पक्षाने ज्या ज्या जबाबदार्या सोपवल्या त्यातील प्रत्येक जबाबदारी सर्वतोपरी यशस्वीरित्या पार पाडली. आज प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे. ती कोट्यवधी कार्यकर्त्यांच्या संघटन शक्तीच्या बळावर निष्ठापूर्वक पार पाडण्याचा प्रयत्न करेन, असे चव्हाण यांनी सांगितले.