काश्मीर रेल्वे : महाराजा प्रताप सिंह यांची स्वप्नपूर्ती

    12-Jan-2025
Total Views | 93
Kashmir Railway

एकेकाळी दहशतवादाने ग्रस्त असलेल्या काश्मीरमध्ये, नवनवीन विकासकामे होताना दिसत आहेत. गेली कित्येक वर्ष प्रलंबित असलेले, काश्मीरचे रेल्वेचे स्वप्न देखील आता सत्यात उतरले आहे. यामुळे नक्कीच विकसित भारताच्या यात्रेमध्ये काश्मीर महत्वाची भुमिका बजावेल. महाराजा प्रताप सिंह यांच्या काश्मीरच्या रेल्वेच्या स्वप्नाची पूर्ताता होताना काश्मीर रेल्वेच्या प्रवासाचा घेतलेला आढावा...

एकेकाळी दहशतवाद या शब्दाचा समानार्थी असलेला जम्मू-काश्मीर गेल्या काही वर्षांत रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीसह, विविध क्षेत्रांमध्ये प्रगती करत असलेल्या प्रदेशात रूपांतरित होत आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माननीय लेफ्टनंट गव्हर्नर श्री मनोज सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली, हा प्रदेश आता काही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विक्रम मोडण्यासाठी गणला जात आहे, त्यापैकी एक म्हणजे, उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक (णडइठङ)! चिनाब नदीवरील पूल, अनेक बोगदे, अत्यंत आव्हानात्मक भौगोलिक प्रदेश, वातावरण या सर्वांवर, जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकी चमत्कारांनी मात करून तयार केलेला हा रेल्वेमार्ग आहे.

जम्मू आणि काश्मीर हे राज्य, इ.स. १८४६ ते इ.स. १८५८ पर्यंत, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसोबत आणि इ.स १८५८ पासून इ.स. १९४७ मध्ये भारताची फाळणी होईपर्यंत, ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होते. पूर्वीच्या उत्तर पश्चिम रेल्वेचा एक भाग असलेल्या सुचेतगड-जम्मू सिटी रेल्वे मार्गावर काम सुरू झाल्यापासून, या प्रदेशातील रेल्वेचा प्रवास ऑक्टोबर १८८८ सालापासून सुरू होतो. जम्मू-सियालकोट रेल्वेमार्ग पूर्वीच्या उत्तर पश्चिम रेल्वे विभागांतर्गत येत असून, यामध्ये पंजाबमधील वजिराबाद जंक्शनपासून, सियालकोट जंक्शनमार्गे जम्मूपर्यंत जाणारी रेल्वेची ४३ किमी ब्रॉडगेज शाखा येत होती. इ.स. १८९० मध्ये, महाराजा प्रताप सिंह यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आलेला हा जम्मू आणि काश्मीर राज्यातील पहिला रेल्वे मार्ग होता. इ.स. १८९० मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला हा १७ मैलांचा मार्ग, नंतर राज्य सरकारने विकत घेतला आणि इ.स. १९४७ मध्ये देशाच्या फाळणीमुळे तो विस्कळीत होईपर्यंत, या दुव्याने दोन भिन्न भौगोलिक प्रदेश जोडले होते.

तथापि, १८९९ मध्ये, महाराजा प्रताप सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष सभा झाली, ज्यामध्ये राजा अमर सिंह, राजा राम सिंह आणि राय बहादूर भग्रामजी उपस्थित होते. त्यानंतर कोलकाता येथे व्हाइसरॉय यांच्या भेटीदरम्यान, महाराजांनी जम्मू ते काश्मीरपर्यंत हलकी इलेक्ट्रिक ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव ठेवला. जम्मू आणि श्रीनगरमधील दुर्गम भागांना जोडणे, व्यापाराला चालना देणे आणि माता वैष्णोदेवीसारख्या धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचणे हे त्यांचे ध्येय होते.

हा दृष्टिकोन पुढे नेण्यासाठी, महाराजा प्रताप सिंग यांनी राजा अमरसिंग यांच्यासह नेदरसोल या अभियंत्याला कोलकाता आणि दार्जिलिंगला पाठवले. नेदरसोल आणि त्यांच्या टीमने, डोंगराळ प्रदेशातील रेल्वे मार्गांचे, सर्वेक्षण करण्याचा अनुभव घेत सर्वसमावेशक अभ्यास केला. अभ्यासांती प्रकल्पाची किंमत अंदाजे दोन कोटी रुपये प्रस्तावित केली. त्यावेळी राज्याकडे फक्त ५० लाख रुपये होते, सरकारी विनंत्या, खासगी रेल्वे एजन्सींशी वाटाघाटी आणि रियासीच्या लोखंडाच्या खाणी भाडेतत्त्वावर देण्याच्या माध्यमातून, निधी उभारण्याचे करण्याचे प्रयत्न करूनही आर्थिक अडचणींमुळे प्रकल्प रखडला. चार वर्षांमध्ये सर्वेक्षण करून, चार संभाव्य रेल्वे मार्गांचा शोध घेण्यात आला आणि ३७ स्थानके प्रस्तावित करण्यात आली. मात्र, खर्च जास्त असल्याने, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अपूर्णच राहिला.

ब्रिटिश भारताकडून उत्तर-पश्चिम रेल्वेचा वारसा मिळालेल्या, नव्या स्वतंत्र पाकिस्तानने ही रेल्वे सेवा दि. १८ सप्टेंबर १९४७ रोजी स्थगित करेपर्यंत हा रेल्वे मार्ग चालू होता. स्वातंत्र्यानंतर, जालंधर-मुकेरियन लाईन विस्तारून, या भागाला जोडण्यासाठी १९५२ साली सर्वप्रथम पठाणकोटपर्यंत सुमारे ४४ किमी लांबीचा रेल्वेमार्ग उभारण्यात आला. सन १९६६ सालापर्यंत, रेल्वेने कठुआ येथे पहिला प्रवेश केला होता. परंतु, ही फक्त एक सुरुवात होती. कारण, या प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक विकासाचे वाहन बनण्यासाठी रेल्वेला अजून बराच पल्ला गाठायचा होता. हीच बाब चांगल्या प्रकारे लक्षात आली आणि रेल्वेमार्ग राज्यात आणखी विस्तारण्याच्या नियोजनासाठी, मनापासून प्रयत्न केले गेले आणि १९६९ साली कठुआच्यापलीकडे जम्मूपर्यंत मार्गाचा विस्तार करण्याचा नवीन प्रकल्प सुरू करण्यात आला. अभियांत्रिकी कार्य आणि त्यासाठी निश्चित केलेली अंतिम मुदत या दोन्ही दृष्टीने, हा प्रकल्प अतिशय आव्हानात्मक होता. परंतु, हा प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन, कठुआ-जम्मू हा विभाग दि. २ ऑक्टोबर १९७२ रोजी प्रथम माल वाहतुकीसाठी आणि त्यानंतर दोन महिन्यांनी प्रवासी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. जम्मूला पोहोचणारी पहिली गाडी श्रीनगर एक्सप्रेस म्हणजे सध्याची झेलम एक्सप्रेस होती. जी दि. २ डिसेंबर १९७२ रोजी जम्मूला पोहोचली आणि गाडीचे औपचारिक स्वागत करण्यात आले. या गाडी व्यतिरिक्त, तीन इतर गाड्यादेखील सुरू करण्यात आल्या. ज्यापैकी काश्मीर ट्रेन म्हणजे आत्ताची जम्मू मेल आणि सियालदह एक्सप्रेस या अजूनही सर्वात लोकप्रिय आणि मागणी असलेल्या गाड्या आहेत.

जम्मू-काश्मीरसाठी या मार्गाचे महत्त्व उदघाटन समारंभावरून ठरवता आले असते. ज्यात जम्मू-काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री मीर कासिम यांच्याशिवाय, तत्कालीन रेल्वेमंत्री टी.ए. पै आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष यांच्या व्यतिरिक्त अनेक राजकीय व्यक्ती उपस्थित होते. १९७१ सालच्या भारत-पाक युद्धादरम्यानही काम थांबले नसल्यामुळे, या प्रकल्पाने कायमची छाप सोडली. या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी, व्हीआयपींचा एक गट यावेळी उपस्थित होता. या गटाने, जवळपास २५ वर्षांच्या अंतरानंतर जम्मूला पुन्हा रेल्वेच्या नकाशावर आणले.

हे तत्कालीन जम्मू आणि काश्मीर राज्याच्या जम्मू विभागाच्या मैदानी भागातील, काही जिल्ह्यांमध्ये रेल्वेच्या किमान प्रवेशाबाबत होते. जम्मू विभाग आणि संपूर्ण काश्मीर विभागातील डोंगराळ प्रदेशातील जिल्ह्यांसाठी, समान महत्त्वाची कारवाई झालेली नाही, हे स्पष्टपणे दिसून येते. भूप्रदेश, हवामान, लष्करशाही आणि निहित राजकीय हितसंबंधांच्या आव्हानांनी हे एक दूरचे स्वप्न बनले.
राजकीय अस्थिरता, दहशतवादाच्या काळात पूर्ण झालेला रेल्वेमार्ग जिहादी, आत्मघातकी स्फोटक हल्ल्यांसाठी सोपे लक्ष ठरला असता. जेव्हा रेल्वेमार्ग पूर्ण होईल, तेव्हा स्फोटकांच्या वापरासाठी प्रशिक्षित लहान बंडखोर गटाद्वारे हल्ला करण्याचे सोपे लक्ष्य होईल. जून २००४ साली जम्मू-श्रीनगर रेल्वे प्रकल्पावर काम करणार्‍या पुंडीर अभियंता बंधूंचे अपहरण आणि हत्या, हे केवळ एक उदाहरण होते. कल्पना करा की, जेव्हा साडेतीनशे किलोमीटरच्या रेल्वे ट्रॅकवरून गाड्या धावतील, तेव्हा तो खुला ठेवण्यासाठी भारतीय लष्कराच्या आणखी काही तुकड्या या मार्गावर पहारा देतील. सुरक्षा ठेवण्यासाठी लागणारे मनुष्यबळ प्रचंड असेल आणि त्यामुळे सुरक्षा दलांना गार्ड ड्युटी कमी होईल. हे अतिरेक्यांच्या हातात खेळण्यासारखे होते. रेल्वेलाईन प्रकल्पाचा विविध सरकारांनी विचार केला आणि तो गुंडाळून ठेवला. कारण, तो अभियांत्रिकीच्या दृष्टीने खूप महत्त्वाकांक्षी होता आणि अंदाजे सहा हजार कोटी रुपये आर्थिकदृष्ट्या शक्य नव्हते आणि सुरक्षेच्या परिस्थितीकडे लक्ष वळवले गेले. त्यानंतर एनडीएचे सरकार येईपर्यंत, कोणीही याचा विचार केला नाही.

अखेरीस, जम्मू-श्रीनगर रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रकल्प ज्या टप्प्यात हाती घेण्यात आला ते खालीलप्रमाणे आहे-

१. जम्मू-उधमपूर रेल्वे लिंक: २००५ साली पूर्ण झालेला, हा ५५ किमीचा भाग उर्वरित भारताशी या प्रदेशाला जोडण्याच्या दिशेने एक महत्त्वाची पहिली पायरी होती.

२. बनिहाल-काझीगुंड विभाग: २०१३ सालापासून कार्यरत, या विभागात पीर पंजाल बोगदा, भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा, ११.२ किमीचा समावेश आहे.

३. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL): हा जम्मू आणि काश्मीरमधील भारतीय रेल्वेचा प्रमुख प्रकल्प आहे. हा पूर्ण झाल्यावर, काश्मीर खोरे भारतीय रेल्वे नेटवर्कशी जोडेल. या प्रकल्पाचा एक भाग असलेला चिनाब पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आणि आधुनिक अभियांत्रिकीचा एक चमत्कार आहे.

४. काझीगुंड-बारामुल्ला लाईन: २००९ सालापासून कार्यरत, ही इंट्रा-व्हॅली लाईन काश्मीर खोर्‍यातील प्रमुख शहरांना जोडणारी स्थानिक प्रवाशांसाठी जीवनरेखा आहे.

५. अनंतनाग-बनिहाल लाईन: या विभागामुळे खोर्‍यातील प्रवास लक्षणीयरित्या सुलभ झाला आहे, विशेषत: रोजच्या प्रवाशांसाठी.

जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, चिनाब पूल, आयफेल टॉवरपेक्षा उंच उभा असून, हा भारतीय रेल्वेच्या तांत्रिक आणि पायाभूत शक्तीचे प्रतीक आहे, एकेकाळी जे अशक्य मानले जात होते. त्याच्या बांधकामाच्या सर्व प्रयत्नांवर दहशतवादी शेजार्‍यांकडून भडिमार होत होता, ते आता वास्तव आहे. हा पूल भारताच्या अभियांत्रिकी पराक्रमाचा आणि प्रगतीच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.
उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक (णडइठङ) प्रकल्प ही भारताची अभियांत्रिकी उत्कृष्टता दर्शवणारी ऐतिहासिक कामगिरी आहे. भारतातील पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल, अंजी खड्डा पूल आणि चिनाब नदीवरील प्रतिष्ठित कमान पूल, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल-हे असे चमत्कार आहेत. ज्यांची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे. हिवाळ्याच्या महिन्यात जेव्हा काश्मीरमध्ये मुसळधार बर्फवृष्टीमुळे बहुतांश रस्ते बंद असतात, तेव्हा विमान भाड्यात मोठी वाढ होते आणि लोकांना पाच हजार रुपयांची विमान तिकिटे २५ हजार रुपयांना खरेदी करावी लागतात. नवीन रेल्वे सेवेचा फायदा केवळ रेल्वेलाच होणार नाही. पण, मालवाहू गाड्यांच्या समावेशाने, व्यापार आणि उद्योगांना चालना मिळेल.

जुन्या पिढीतील अनेक स्थानिक नागरिकांनी कधी विचार केला नाही की, त्यांचे स्वप्न काश्मीरला ट्रेनने प्रवास करायचा त्यांच्या हयातीत खरे ठरेल. जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेले परिवर्तनशील रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्प, जम्मू आणि काश्मीरला राष्ट्रीय मुख्य प्रवाहाशी जोडण्यात आणि आर्थिक आणि सामाजिक प्रगतीला गती देण्यासाठी, त्यांची भूमिका अधोरेखित करतात. जम्मू रेल्वे विभागाची स्थापना हा केवळ एक लॉजिस्टिक मैलाचा दगड नसून, जम्मू आणि काश्मीरला भारताच्या आर्थिक विकासाच्या मार्गाशी जोडण्यासाठी, मोदी सरकारची वचनबद्धता याला दुजोरा देणारा आहे.

अलीकडे दि. ६ जानेवारी २०२५ रोजी जम्मू विभागाचे उद्घाटन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. जम्मू रेल्वे विभाग हा भारतातील ७०वा रेल्वे विभाग आहे. भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीतील, सहा रेल्वे विभागांपैकी एक आहे. जम्मू विभागाच्या कार्यक्षेत्रात जम्मू आणि काश्मीर, लडाख, पंजाबचा काही भाग आणि हिमाचल प्रदेशचा काही भाग समाविष्ट आहे.

विभागामध्ये एकूण ७४२.१ किमी रेल्वे नेटवर्क आहे. त्याच्या कार्यक्षेत्रात, पठाणकोट-जम्मू-उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला ४२३ किमी, भोगपूर-सिरवाल-पठाणकोट ८७.२१ किमी, बटाला (वगळून)-पठाणकोट ६८.१६ किमी या विभागांचा समावेश आहे. -जोगिंदर नगर (कांगडा घाटी रेल्वे नॅरो गेज विभाग, १६३.७२ किमी मार्ग किमी) जम्मू विभागाच्या निर्मितीपर्यंत, हे विभाग उत्तर रेल्वेच्या फिरोजपूर विभागांतर्गत होते. जम्मू रेल्वे विभाग फिरोजपूर विभागातून स्वतंत्र करण्यात आला आहे. ई. श्रीनिवास हे विभागाचे पहिले विभागीय रेल्वे व्यवस्थापक बनले आहेत.

जम्मू रेल्वे विभागाच्या निर्मितीमुळे, जम्मू आणि काश्मीरला भारताच्या इतर भागांमध्ये वाढीव प्रवेश मिळण्याची अपेक्षा आहे. हे पाऊल स्थानिक लोकसंख्येच्या दीर्घकाळ प्रलंबित आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, वाहतूक दुवे सुधारण्यासाठी आणि या प्रदेशात सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तयार केले गेले आहे. या प्रकल्पामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील, पायाभूत सुविधांमध्ये वाढ होईल आणि पर्यटनाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

नवीन जम्मू रेल्वे विभाग एक महत्त्वपूर्ण जंक्शन म्हणून काम करेल. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देत जलद प्रवासी आणि मालवाहतूक सुलभ करेल. जम्मू आणि काश्मीरमधील रेल्वे कनेक्टिव्हिटीचा व्यापक विस्तार, वंदे भारत गाड्यांचा परिचय आणि धोरणात्मकदृष्ट्या स्थित थांबे सार्वजनिक मागणीही पूर्ण करेल. महत्त्वाच्या सांगलदन जंक्शन्ससारखी छोटी स्थानके बनवण्याचे आगामी उपक्रम, दुर्गम भागातही अखंड कनेक्टिव्हिटी सक्षम करतील. जम्मूमधील पूंछ-राजौरी आणि काश्मीरमधील बारामुल्लापर्यंत रेल्वेमार्गाचा विस्तार करण्याची जबाबदारी, जम्मू रेल्वे विभागाची असेल. नवीन जम्मू रेल्वे विभागाचा फायदा केवळ जम्मू-काश्मीरच्या लोकांनाच होणार नाही, तर त्याचा फायदा हिमाचल प्रदेश, पंजाब आणि लडाखपर्यंतही होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्मू आणि काश्मीरमधील रेल्वे आणि रस्ते पायाभूत सुविधांबाबतच्या दूरदृष्टीने, या प्रदेशाला उत्तर भारतातील सर्वोत्तम कनेक्टेड स्थळांपैकी एक बनवले आहे. सुधारित कनेक्टिव्हिटी हा नेहमीच राष्ट्र उभारणीचा आधारस्तंभ राहिला आहे. जम्मू आणि काश्मीरला उर्वरित भारताशी अधिक जवळून समकलित करून, रेल्वे नेटवर्क एकता आणि आपलेपणाची भावना वाढवेल. हे एकाकीपणाची भावना कमी करण्यासाठीदेखील मदत करेल, ज्यामुळे या प्रदेशाला ऐतिहासिकदृष्ट्या पीडित केले आहे.

आज, संपूर्ण देश दिल्ली-जम्मू-श्रीनगर रेल्वे मार्गाच्या उद्घाटनाची आतुरतेने वाट पाहत असताना, जम्मूचे दूरदर्शी महाराजा प्रताप सिंग यांनी १२६ वर्षांपूर्वी या मार्गाचे स्वप्न पाहिले होते व पहिली योजना आखली, हे लक्षात ठेवणे प्रेरणादायी आहे. आता केवळ १३ तासांत दिल्ली ते काश्मीरला जोडणारी ‘वंदे भारत ट्रेन’ सुरू झाल्याने, महाराजा प्रताप सिंह यांनी जानेवारी १८९९ साली पाहिलेले स्वप्न अखेर साकार होणार आहे. या ऐतिहासिक मार्गाला ‘महाराजा प्रताप सिंह वंदे भारत एक्सप्रेस’ असे नाव देणे, ही एका शतकापूर्वी या जोडणीची कल्पना करणार्‍या दूरदृष्टी असलेल्या नेत्याला श्रद्धांजली ठरेल.

जम्मू-काश्मीर रेल्वेची कालरेखा

१८८८ सियालकोट जिल्ह्यातील सुचेतगढ़पासून जम्मूपर्यंत रेल्वेमार्ग विस्ताराचा कार्यारंभ आणि १९९० साली उद्घाटन

१९४२ महाराजा सर प्रतापसिंहांतर्फे अबोटाबाद-श्रीनगर, जम्मू ते श्रीनगर नॅरो गेज मार्गासाठी सर्वेक्षण

१९४७ जलंधर-मुकेरियन मार्गाच्या पठाणकोटपर्यंतच्या विस्तार कार्याचा आरंभ

१९६६ पठाणकोट रेल्वेमार्गाचा कठुआपर्यंत विस्तार

१९७१-रेल्वेचा जम्मूपर्यंत विस्तार आधी मालवाहतुकीसाठी आणि नंतर प्रवासी वाहतुकीसाठी मार्गाचा वापर

१९८३-जम्मू-उधमपूर मार्गासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याहस्ते कोनशिला बसवण्यात आली

१९९४-रेल्वेमंत्र्यांतर्फे जम्मू-बारामुल्ला रेल्वेमार्गाची घोषणा

१९९५-जम्मू-उधमपूर मार्गाच्या बांधकामास प्रारंभ

२००४-जम्मू-उधमपूर मार्गातील ५३ किमी विभाग खुला

२००८-चिनाब रेल्वेपूलाचे काम सुरक्षेच्या कारणास्तव थांबवण्यात आले

२००९-जम्मू-बारामुल्ला मार्गावरील राजवंशेर ते बारामुल्ला मार्गाचे उद्घाटन

२०१३-बनिहाल ते काझीगुंड मार्गाचे उद्घाटन

२०१४-उधमपूर-कटरा रेल्वेमार्गाचे उद्घाटन

२०१७-चिनाब रेल्वेपूलाचे कामकाज पुन्हा सुरू

२०२२-दि. १३ ऑगस्ट रोजी चिनाब रेल्वेपूलाचे उद्घाटन


रुचिता राणे
(लेखिका पॉलिसी ऍडव्होकसी रिसर्च सेंटर येथे जम्मू काश्मीर विभागाच्या प्रमुखा म्हणून कार्यरत आहेत.)
९८६९१७०७१७/८८२८२०५१५८
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121