इतिहासातील साधने ही अभ्यासाच्या दृष्टीने फार महत्त्वाची, इतिहाच्या साधनांमुळे त्याकाळातील अनेक घटकांचे पुरावेच अभ्यासकासमोर येत असतात. त्यातूनच काळाचा पट अभ्यासकासमोर उभा राहून, त्यातून सत्य समोर येत असते. अशा इतिहासाच्या साधनांमध्ये नाण्यांचे महत्त्व फार. मराठ्यांच्या इतिहासाचे मुख्य केंद्र असलेल्या पुण्यातील नाण्यांचा घेतलेला हा आढावा...
सर्वप्रथम सर्व वाचन प्रेमींना मनापासून नमस्कार! दरवर्षीप्रमाणे ‘लँग्वेजटेक टीम’ ही एक नवीन विषय घेऊन येते आणि यावर्षीचा विषय आहे, ‘पुणे शहर व शहराची माहिती.’ याच विषयाच्या अनुशंगाने, आज आपण पुणे शहराची वेगळीच माहिती या लेखात पाहणार आहोत. ही माहिती आहे, पुण्याच्या नाण्यांविषयी.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावरचा. याच पुण्यनगरीत, बालपणी महाराजांना संस्कारांचे आणि पराक्रमाचे बाळकडू मिळाले. १३व्या शतकापासून ते १६व्या शतकापर्यंत, दिल्ली सलतनत, बहामनी सलतनत, विजापूर सलतनत या इस्लामी शासनकर्त्यांच्या अधिपत्याखाली पुणे शहर राहिलेले आपल्याला दिसून येते. १६३५ सालच्या सुमारास, मालोजी राजांचे पुत्र व शिवाजीचे महाराज यांचे वडील शहाजी राजांनी पुणे हे आपल्या प्रदेशाचे मुख्यालय बनवले. १७व्या शतकादरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात मराठ्यांनी स्वतंत्र राज्याची पायाभरणी केली. नंतरच्या काळात पेशव्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार केला व आपले साम्राज्य पुण्यासारख्या शहरात प्रस्थापित केले आणि पुण्याला आपली राजधानी केली. दि. १७ नोव्हेंबर १८१८ रोजीपर्यंत, किरकीच्या लढाईनंतर इंग्रजांना शरण येईपर्यंत पुणे हे पेशवे सरकारचे स्थान राहिले.
शिवकाळातील नाणी
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७४ साली स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचे शासक म्हणून आपले सार्वभौमत्व घोषित केल्यामुळे, त्यांनी राज्याभिषेक समयी आपले ‘होन’ नावाची सोन्याची नाणी आणि ‘शिवराई’ नावाची तांब्याची नाणी रायगडावरील टांकसाळेमध्ये अर्थात नाणी पाडण्याच्या कारखान्यात पाडली होती. इथूनच महाराजांच्या स्वराज्याच्या नाण्यांचा प्रवास चालू झाला. ही नाणी १९व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत वापरात होती. या काळातील चलनावर, छत्रपती शिवाजी महाराज (शिव), छत्रपती संभाजी महाराज (शंभु), छत्रपती शाहू महाराज (शाहू), छ. राजाराम महाराज, छ. रामराजा महाराज यांची नावे आपल्याला नाण्यांवर पाहायला मिळतात.
पुणे येथील नाण्याची सुरुवात
१७व्या शतकात औरंगजेबाने पुण्यावर विजय मिळवल्यानंतर, त्याने १६८८ साली त्याच्या अधिकार्याला पुणे शहराचे पुनर्वसन करण्यासाठी पाठवले. त्याने १७०३ साली त्याच्या सैन्यासह या परिसरात तळ ठोकला. छत्रपती शिवाजी महाराजांचे निवासस्थान असलेल्या आणि मासाहेब जिजाऊ यांनी वसवलेल्या पुणे प्रदेशावरील विजयाच्या स्मरणार्थ, तसेच त्यांनी नातवाच्या अकाली मृत्यूच्या स्मरणार्थ पुण्याचे नाव बदलून ‘मुहियाबाद’ असे ठेवले. पुण्याच्या इतिहासात प्रथमच चांदीच्या नाण्यांचा रुपया पाडण्यात आला. १७०१-०२ साली काढलेली नाणी ही त्याच्या कारकिर्दीचे ४५वे राजनयिक वर्ष म्हणून पाडण्यात आली.
छत्रपती शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर, सातारा येथील टांकसाळ बंद झाली आणि पुण्यात नवीन टांकसाळ स्थापन झाली. खासगी टांकसाळ मालकांनी फक्त परवाना शुल्क भरून टांकसाळ चालवायची, असे ठरले आणि हा खासगी व्यवसाय पुढे सार्वजनिक व्यवसाय झाला.
पेशवाईच्या काळात नाण्यांचा तुटवडा होत असल्यामुळे, राज्य कारभारासाठी, युद्धसामग्रीसाठी, सैनिक आणि कारागीर यांच्या पगाराची मागणी पुरवण्यासाठी नाण्यांचा तुटवडा त्या काळात भासत होता. ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी खासगी मालकांना टांकसाळ चालवण्याचे कंत्राट दिले.
पेशवाईच्या काळात चालू असलेली नाणी
पेशवाईच्या काळात चलनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले नाही. पेशव्यांनी बहुतेक नाणी जी चालत आली होती, तीच पुढे चालू ठेवली. त्यांनी स्वतःच्या नावावर नाणी काढली नाहीत. त्यांनी त्यांच्या काळात ‘गणपती’, ‘श्रीशिक्का’, ‘हाली शिक्का’, ‘अंकुशी’ आणि ‘चांदवड’ रुपयांची नाणी काढली. या काळातील मराठा चलनावर छत्रपती शिवाजी महाराज (शिव), छत्रपती संभाजी महाराज (शंभु), छत्रपती शाहू महाराज (शाहू), छ. राजाराम महाराज, छ. रामराजा महाराज यांची नावे न लिहिता, मोगल बादशाहाचे नाव दिसते. त्या काळातील परंपरा होती ती त्यांनी तशीच सुरू ठेवली. या परंपरांशिवाय पेशव्यांनी नवीन टांकसाळ स्थापन केल्या आणि जुन्या टांकसाळी सुधारल्या.
पुणे येथे तीन तर चिंचवड व चाकण येथे प्रत्येकी एक टांकसाळ होती. या टांकसाळी वेगवेगळ्या कंत्राटदारांनी चालवल्या होत्या. पण, त्या पेशवे सरकारच्या मालकीच्या होत्या. या टांकसाळीत सोन्याची, चांदीची नाणी व तांब्याची नाणी पाडण्यात येत असे. ‘श्रीशिक्का’, ‘अंकुश रुपये’, ‘हालीसिक्का’ या प्रकारची त्यांनी स्वतःची नाणी काढायला सुरुवात केली. पेशव्यांनीही ठिकठिकाणी अनेक टांकसाळ स्थापन केल्या.
पुणे/चाकण/चिंचवड येथील टांकसाळीचे चिन्हे
वेगवेगळ्या परवानाधारकांची नियुक्ती करून, ही टांकसाळ सरकारनेच चालवली होती. धारवाड आणि नाशिक टांकसाळ ही सरकारी टांकसाळ होती. अहिल्यानगर, चांदवड, चिंचवड, घोटवडे, रहिमतपूर, मलकापूर, पुणे, वाई, तळेगाव, सातारा, नाशिक, जुन्नर, मिरज, भाटवडे इत्यादी ठिकाणी टांकसाळ होती, तर कर्नाटकात धारवाड, सावनूर, लक्ष्मीस्वर, बागलकोट इत्यादी ठिकाणी टांकसाळी होती.
पुणे टांकसाळीचा हाली सिक्का (नागफणी रुपया)
इसवी सन १८१० पर्यंत पुण्याच्या टांकसाळीत, ‘हाली सिक्का’ ही नाणी पाडण्यात आली. ‘हाली सिक्का’ नाण्याच्या उलट बाजूस एक खूण आहे, ज्याचे वर्णन ‘चष्मा’, ‘कात्री’ किंवा ‘नागाच्या डोक्याचे प्रतीक’ म्हणून चिन्ह उमटवलेले दिसते. हे चिन्ह प्रत्यक्षात काय दर्शवते, याबद्दल खूप अनिश्चितता दिसते. परंतु, अनेक नाणी संग्राहक या नाण्याला ‘नागफणी’ रुपया नाणे म्हणून ओळखतात.
‘हाली सिक्का’ हे पहिले नाणे (थोरले) माधवराव पेशवे यांनी, सन १७६४ मध्ये पाडले होते. हे नाणे शाह अली गौहरच्या नावाने काढण्यात आले होते. (शाह अली गौहर हे शाह आलम २ चे दुसरे नाव होते) या काळातील नाण्यावर एका बाजूस बादशाहाचे नाव, हिजरी तारीख तर दुसर्या बाजूस त्यांचे राज्यवर्ष, टांकसाळ चिन्ह, टांकसाळ नाव दिसून येते.
खाली दिलेल्या नाण्याच्या पुढील बाजूवर उर्दूमधील : ‘सिक्का मुबारक’, ‘बादशाह गाझी’, ‘शाह अली गौहर (शाह आलम ॥)’ ‘भाषांतर : शुभ नाणे (चे)’, ‘विजयी सम्राट’, ‘शाह अली गौहर’ उलट बाजूवर उर्दूमधील ‘जरब मुहिबाद पूना’, ‘सनाह जलूस भाषांतर’, ‘शांत समृद्ध राजवटीमधील मुहियाबाद पूना.’
ब्रिटिशकालीन नागफणी रुपया
‘हाली सिक्का’ इ. स. १८१८ पर्यंत पेशव्यांच्या सरकारने पाडला असावा. त्यानंतर इ. स. १८२० मध्ये ब्रिटिशांनी पुणे ताब्यात घेतल्यावर, ते बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या प्रशासनाखाली ठेवण्यात आले होते. इ. स. १८२०-४४ ची ही नाणी, इ. स. १८१८ मध्ये युद्ध संपल्यानंतर एखउ (एरीीं खपवळर उेारिपू)द्वारे जारी केली गेली व मुघल सम्राटाच्या नावाने ही नाणी जारी करण्यात आली. जेणेकरून स्थानिक लोक त्यांची नाणी स्वीकारतील. नाण्यामधील मुख्य बदल म्हणजे, मराठी अंकांमध्ये फसली वर्ष हे नागफणी चिन्ह्याच्या खाली लिहिलेले आढळते. १८३४-३५ सालापर्यंत पुणे येथील टांकसाळ बंद पडेपर्यंत, त्यांनी ही नाणी दरवर्षी पाडली.
पुणे टांकसाळीचा अंकुशी रुपया
‘अंकुशी’ किंवा ‘चिनसुरी’ रुपयाची निर्मिती, पश्चिम भारतातील मराठा प्रदेशातील अनेक टांकसाळीत झाली. पहिले पेशवे नारायणरावांनी चिंचवडला आणि पुण्यात ही नाणी पाडली. त्यानंतर बेलापूर, भातोडी, कुलाबा, कमलगड, फुलगाव, टेंभुर्णी आणि चंबागोंडा यासह विविध ठिकाणी, शुद्धतेच्या विविध अटींमध्ये नाण्यांचे उत्पादन केले गेले.
‘अंकुश’ चिन्ह असलेली चांदीची नाणी, मराठा काळातील सर्वात सामान्य, मोठ्या प्रमाणात हाताळली जाणारी नाणी होती. महादेव रानडे, प्रिन्सेप आणि व्हॅलेंटाईननुसार ही नाणी, वाई आणि पुण्यातील जुन्नर येथे पाडली गेली. परंतु, इतर काही विद्वान जसे की, डॉ.जी.एच. खरे, मुनिरा खातू यांना वाटते की, त्यांना पुणे, बागलकोट, वाई, चिंचवड आणि भातोड या ठिकाणी पाडली असावीत. घडानी रुमालनुसार ही नाणी नाशिक, चिंचवड, पुणे शहर येथे चिन्हांकित केली गेली होते.
नाणी सतत हाताळणार्या अधिकारी, बँकर्स आणि मनी चेंजर्स यांच्या असे लक्षात आले आहे की, यापैकी काही रुपयांवर वेगवेगळ्या ठिकाणी ठिपके आहेत. हे ठिपके नाण्याची टांकसाळ ओळखण्यासाठी मदत करत असावेत. जेथे नाणे पाडले गेले होते आणि बहुधा सरकारी अधिकार्याच्या आदेशानुसार हे बिंदू मारले गेले असावेत. अंकुशी रुपया, मिंट-मुहियाबाद (पुणे), हे नाणे शाह अली गौहरच्या नावाने काढण्यात आले होते.
भातोडी टांकसाळीतील अंकुशी रुपयावर अरेबिक क्रमांकात तारीख
१८१५ ते १८१९ या काळात हा रुपया पाडण्यात आला. ते फारसी आणि देवनागरी अंकांच्या मिश्रणात असलेल्या तारखा फासली युगातील आहेत. जेव्हा योग्यरित्या दिनांकित नाणे असणे योग्य वाटले, हा प्रकार योग्यरित्या पार पडला. आढळलेल्या नमुन्यांच्या संख्येवरून असे दिसते की, या अंकुशी प्रकारचे रुपयाचे उत्पादन विपुल नव्हते.
या नाण्याच्या उपस्थित असलेल्या ‘सान’ किंवा वर्षामुळे, ती ब्रिटिश अंकुशी म्हणूनही ओळखली जात होती. १८२० ते १८३४ पुण्यातील टांकसाळी या ब्रिटिश अधिकार्यांच्या देखरेखीखाली होत्या. स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी, नवीन अधिग्रहित केलेल्या प्रदेशात मराठा नाणे चालू ठेवणार्या ईस्ट इंडिया कंपनीचा हा मुद्दा अधिक योग्य आहे.
चाकण टांकसाळीचा श्री सिक्का
जी. एच. खरे यांनी तपासलेल्या कागदपत्रांनुसार ही नाणी, सुमारे १७९३ ते १८०० सालापर्यंत कार्यरत होती. तेथे दोन प्रकारचे रूपयांचे उत्पादन होते. ‘चांदवड (चांदोरी)’ आणि ‘श्री सिक्का.’ खरे यांनी घेतलेल्या पेशव्यांच्या नोंदीवरून असे म्हटले आहे की, पुणे, वाफगवा आणि इतर प्रदेशात ‘चांदवडी’ रुपया मोठ्या प्रमाणावर चालू होता. मात्र, इतर सर्व प्रकारचे रूपये वापरात नव्हते. ‘चांदवडी’ रुपया कमी पडला. त्यामुळे रुपयाचा तुटवडा निर्माण झाला आणि ‘हाली सिक्का’ रुपयाची किंमत कमी झाली म्हणून, चाकण येथे एक नवीन टांकसाळ स्थापन करण्यात आली आणि ‘चांदवडी’ रुपयाच्या समान गुणवत्तेचे नाणे काढण्याचा आदेश देण्यात आला.
चाकण येथे ‘श्री सिक्का’ रुपयाची टांकसाळ झाली हे निश्चित आहे. कारण, खरे यांना सुदैवाने, मराठा रेकॉर्डमध्ये दोन दस्तऐवज सापडले. ज्यामध्ये १७९३ ते १८०० दरम्यान, ‘श्री सिक्का’ रुपयांची संख्या नोंदवली गेली.
चिंचवड टांकसाळीचा परशु रुपया
चिंचवड ज्याला चिंचोरे म्हणूनही ओळखले जाते, हे पुण्याच्या उत्तर-पश्चिमेस सुमारे १६ किलोमीटर अंतरावर, पुणे जिल्ह्यातील पूर्वीच्या हवेली तालुक्यातील एक गाव आहे. ‘अंकुशी’ रुपया प्रथम चिंचवड व नंतर पुणे येथे प्रचलित झाल्याचे, क्लून्सने लिहिले आहे. रानडे यांच्या म्हणण्यानुसार, १७६७-६८ साली दोन सोनारांना पुण्याजवळ चिंचवड येथे टांकसाळ उघडण्यासाठी, परवाने देण्यात आले. चलनात येणारा रुपया जयनगरी किंवा फलचरी रुपयासारखा असावा. हा रुपया तात्काळ ओळखला जाऊ शकतो. कारण, त्याला चिंचस किंवा चिंचोरे असे टांकसाळीचे नाव आहे. तसेच, त्यावर युद्धाची कुर्हाड (परशु) आहे. फलचारीचा अर्थ परशु (फुर्शीला भ्रष्ट) म्हणजे युद्धाची कुर्हाडी असाच असू शकतो. फर्शी, फुर्शी किंवा फोर्शी ही संज्ञा सामान्यतः हे चिन्ह असलेल्या रुपयाला लागू होते.
पुणे पैसा
पुण्याचे श्रेय निश्चितपणे सांगता येईल, अशा तांब्याच्या नाण्यांचा एकच प्रकार समोर आला आहे. त्याचे पुनाह नाव आहे. कदाचित त्याच्या आधी मुहियाबाद, जर संपूर्ण पाहिले, तर या नाण्यांवर तारखा सामान्यतः दिसत नाहीत. परंतु, हा प्रकार बहुधा एकापेक्षा जास्त टांकसाळीवर मारला गेला होता. कारण, शैली लक्षणीयरित्या बदलते आणि काहींवरील कॅलिग्राफी अत्यंत क्रूड आहे. त्यांच्या वजनावरून ते टक्का किंवा दुप्पट पैसे असल्याचे समजते.
अभिजीत भुजबळ
(लेखक नाणे संग्राहक आणि अभ्यासक असून,वरील लेखातील संपूर्ण नाणी ही अभिजीत भुजबळ यांच्या खासगी संग्रहातील आहेत.)
संदर्भ :-
भांडारे, शैलेंद्र, ‘पेशवाईतील नाणेपद्धती’, संशोधक, राजवाडे संशोधन मंडळ, धुळे यांचे त्रैमासिक
ग. ह. खरे, मंडळातील नाणी
मराठा मिंटस् अॅड कॉईनेज के. के. महेश्वरी, केनेथ डब्ल्यू, विगिन्स्
श्री शिवछत्रपतींचे चलन, चिं. ना. परचुरे
महाराष्ट्रातील चलनाचा इतिहास: पद्माकर प्रभुणे
मराठा कॉईन्स ऑफ पुणे, रीजन गणेश नेने
ऐतिहासिक नाणी, प्रशांत भा. ठोसर