ब्रिगेडियर अमिताभ झा यांचे आंतरराष्ट्रीय शांततेसाठी महत्त्वपूर्ण योगदान

    12-Jan-2025   
Total Views | 16
Amitabh Jha

सीरियामध्ये शांततेसाठी संयुक्त राष्ट्रांच्या ‘शांतीरक्षा’ कार्यात मोलाची कामगिरी करणार्‍या ब्रिगेडियर अमिताभ झा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने नुकतेच निधन झाले. देशाच्या दृष्टीने ही एक मोठीच हानी. भारताने, कायमच जागतिकशांततेसाठीच्या अनेक उपक्रमात योगदान दिले आहे. संयुक्त राष्ट्रांचा ‘शांतीरक्षा’ उपक्रम हा त्यापैकीच एक होय! भारताच्या सैनिकांनी जगभरातील अनेक संघर्षात्मक परिस्थितीमध्ये स्वत:ला मानवतेच्या आणि जागतिक शांततेच्या रक्षणासाठी झोकून दिले आहे. हुतात्मा ब्रिगेडियर अमिताभ झा यांच्या कार्याचा आणि भारतीय सैनिकांच्या ‘शांतीरक्षा’ उपक्रमातील योगदानाचा घेतलेला आढावा...

सीरियातील हिंसाचार जगाला रोज नवे हादरे देत आहे. गेल्या दीड वर्षांपेक्षाही अधिक काळ सीरियातील शांततेसाठी झटणारे भारताचे ब्रिगेडियर अमिताभ झा यांचे, सेवारत असताना दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

ब्रिगेडियर अमिताभ झा हे एक भारतीय लष्करी अधिकारी होते, ज्यांनी सीरियातील गोलन हाइट्स येथे, संयुक्त राष्ट्राच्या निर्सैनिकीकरण दलाचे (युएनडीओएफ) डेप्युटी फोर्स कमांडर म्हणून, काम केले. ब्रिगेडियर झा यांनी भारतीय लष्करात गोरखा रायफलचे अधिकारी म्हणून सेवा केली. भारतीय लष्करात खडतर परिस्थितीत सेवा दिलेल्या ब्रिगेडियर झा यांचा लष्करी मुत्सद्देगिरी, भूराजकीय प्रश्न, पारंपरिक युद्धनीती या विषयांवर सखोल अभ्यास होता.

सियाचेन ग्लेशियर येथे काम करताना त्यांनी, आपल्या खंबीर नेतृत्वाने आदर्श घालून दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या अनेकांनी, पुढे विविध स्तरांवर नेतृत्वाची धुरा सांभाळली. ते एक अनुभवी आणि खंबीर अधिकारी होते.

गोलान हाइट्स येथील संयुक्त राष्ट्रांच्या निर्सैनिकीकरण दलाचे डेप्युटी फोर्स कमांडर

गोलन हाइट्स ही इस्रायल आणि सीरियामधील एक वादग्रस्त सीमा आहे. १९६७ सालच्या युद्धानंतर, इस्रायलने या भागावर ताबा मिळवला. १९७३ साली झालेल्या युद्धानंतर, संयुक्त राष्ट्रांनी या भागात ‘युएनडीओएफ’ची स्थापना केली. या दलाचे काम इस्रायल आणि सीरियामधील शस्त्रसंधीचे निरीक्षण करणे आहे.

दि. १४ एप्रिल २०२३ रोजीपासून, ब्रिगेडियर झा सीरियातील गोलान हाइट्स येथील संयुक्त राष्ट्रांच्या निर्सैनिकीकरण दलाचे (युएनडीओएफ) डेप्युटी फोर्स कमांडर म्हणून रुजू झाले. पुढे त्यांच्यावर ‘अ‍ॅक्टिंग फोर्स कमांडर’ पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. गोलान हाइट्स हा इस्रायल आणि सीरियामधील, खूप पूर्वीपासूनचा बफर झोन आहे. योम किप्पूर युद्धानंतर १९७३ साली, इस्रायल आणि सीरियामध्ये ‘निर्सैनिकीकरण करार’ झाला. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी, गोलान हाइट्स हा बफर झोन असल्याचे आणि तो युएनडीओएफच्या देखरेखीखाली राहील, असे घोषित केले.

इस्रायल-सीरिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर, गेल्या काही महिन्यात तेथील तणाव वाढला. सीरियातील बंडखोर गटांच्या वाढत्या हिंसाचारामुळे, येथील परिस्थिती संवेदनशील झाली असून, परिणामी शांतता दले आणि स्थानिक जनतेसाठी तेथील वातावरण अतिशय असुरक्षित ठरले आहे. सततचा बॉम्ब वर्षाव, प्रचंड प्रमाणात रक्तपात आणि अस्थिर वातावरणात काम करतानाही, ब्रिगेडियर झा यांनी आपल्या कर्तव्याप्रति असलेल्या कटिबद्धतेचा, कधीही विसर पडू दिला नाही. त्यांनी आपल्या कार्यकाळात, युद्धबंदी कराराची अंमलबजावणी, मानवतावादी दृष्टिकोनातून साहाय्य, युद्धसदृश परिस्थितीत अडकून पडलेल्या सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेणे इत्यादी जबाबदार्‍या सक्षमपणे पार पाडल्या. अतिशय गुंतागुंतीची नाजूक परिस्थिती असतानाही, त्यांची कर्तव्याप्रतिची निष्ठा कायम राहिली. गोलान हाइट्स येथे नेमणूक होण्यापूर्वी ते ‘डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉन्गो’मध्ये, संयुक्त राष्ट्रांच्या शिष्टमंडळात लष्करी निरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी स्थानिक लोकसंख्येला मदत करण्यासाठी, मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य केले.

ब्रिगेडियर झा यांचे निधन, हे भारतीय लष्कर आणि संयुक्त राष्ट्रांसाठी एक मोठी हानी आहे. ते एक समर्पित आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी होते, ज्यांनी आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षिततेसाठी आणि स्थैर्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

ब्रिगेडियर झा यांच्या गोलन हाइट्सवरील कामगिरीचे विश्लेषण
  • ब्रिगेडियर झा यांच्या नेतृत्वाखाली ‘युएनडीओएफ’ने, गोलन हाइट्समध्ये शांतता आणि स्थिरता राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

  • ब्रिगेडियर झा यांनी, इस्रायल आणि सीरियाच्या अधिकार्‍यांशी संवाद साधून, तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला.

  • ब्रिगेडियर झा यांनी, स्थानिक लोकसंख्येस मदत करण्यासाठी, सामाजिक व मानवतावादी कार्य मोठ्याप्रमाणत केले.

  • ब्रिगेडियर झा हे एक खंबीर आणि अनुभवी अधिकारी होते. त्यांनी कायमच त्यांच्या सहकार्‍यांचे मनोबल वाढवले.

  • एकंदरीत, ब्रिगेडियर अमिताभ झा यांनी गोलन हाइट्सवर संयुक्त राष्ट्राच्या मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी केली.
ब्रिगेडियर अमिताभ झा यांना, विविध खेळांतही रुची होती. ते अनेक सांघिक खेळ खेळत. पर्वतांमध्ये ट्रेकिंग करत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आणि मृत्यूची खात्रीच असलेल्या प्रदेशातही, जागतिक शांततेसाठी प्रत्येक संकटाला नेटाने तोंड देण्याविषयीची त्यांची निष्ठा प्रेरणादायी आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या ‘शांतीरक्षा’ अभियानात भारतीय सैन्याचे योगदान

भारतीय सैनिकांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देताना, १७९ सैनिकांनी आपले प्राण गमावले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरमध्ये, सुरक्षा परिषदेला आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी संयुक्त कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. ‘संयुक्त राष्ट्र शांती सेना’१९४८ साली लॉन्च केले गेले.

संयुक्त राष्ट्रांच्या (युएन) ‘शांतीरक्षा’ अभियानात, भारताचा एक गौरवशाली इतिहास आहे. भारत संयुक्त राष्ट्रांचा एक संस्थापक सदस्य आहे आणि तेव्हापासून जागतिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी वचनबद्ध आहे.

सैनिकी योगदान: भारत संयुक्त राष्ट्रांच्या ‘शांतीरक्षा’ अभियानात, सर्वाधिक सैनिक पाठवणार्‍या देशांपैकी एक आहे. भारतीय सैनिकांनी कोरिया (१९५०-१९५३), काँगो (१९६०-१९६४), सायप्रस (१९६४), सोमालिया (१९९२-१९९४), रवांडा (१९९४-१९९६), सिएरा लिओन (१९९९-२०००), आणि लेबेनॉन (२००६) यांसारख्या अनेक देशात सेवा बजावली आहे.

विविध भूमिका: भारतीय सैनिक केवळ लढाऊ भूमिकेतच नव्हे, तर वैद्यकीय, अभियांत्रिकी, आणि लॉजिस्टिक सपोर्टमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. भारतीय लष्कराच्या महिला तुकड्यांनीही संयुक्त राष्ट्रांच्या अभियानात प्रशंसनीय काम केले आहे.
जागतिक शांतता आणि सुरक्षा: भारतीय सैनिकांनी जगभरातील संघर्षग्रस्त क्षेत्रांमध्ये, शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यात मोलाची मदत केली आहे.

मानवतावादी मदत: भारतीय सैनिकांनी संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार, मानवाधिकारांचे संरक्षण केले आहे. त्याचप्रमाणे युद्धग्रस्त लोकांना वेळोवेळी मदतही पुरवली आहे. भारतीय सैनिकांनी स्थानिक लोकांना मदत करण्यासाठी, मोठ्या प्रमाणात मानवतावादी कार्ये केली आहेत. यामध्ये वैद्यकीय शिबिरे, बांधकाम आणि पुनर्वसन कार्य, आणि आपत्कालीन मदत यांचा समावेश आहे.

प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण: भारत संयुक्त राष्ट्रांच्या ‘शांतीरक्षा’ कार्यासाठी, इतर देशांच्या सैनिकांना प्रशिक्षण देतो. ‘सेंटर फॉर युनायटेड नेशन्स पिसकिपिन्ग’ (उणछझघ) या संस्थेद्वारे, भारतीय लष्कर संयुक्त राष्ट्रांच्या मानकांनुसार शांतीसैनिकांना तयार करते.

भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा: संयुक्त राष्ट्रांच्या शांतीरक्षा कार्यातील सक्रिय सहभागामुळे, भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर एक जबाबदार आणि शांतताप्रिय देश म्हणून प्रतिमा उंचावली आहे.

भारताला संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेतील योगदानाचा समृद्ध वारसा आहे आणि जगात शांतीरक्षक पाठवण्यात भारताचा वाटाही मोठा आहे. भारताने आतापर्यंत, अशा शांतता मोहिमांमध्ये सुमारे २.७५ लाख सैनिकांचे योगदान दिले आहे आणि त्याचे ५ हजार, ९०० सैनिक सध्या १२ संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमांमध्ये तैनात आहेत. ज्यात महिला कर्मचारी, अधिकारी आणि लष्करी निरीक्षकांचाही समावेश आहे. ज्यात कॉन्गोमधील ‘युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन फॉर स्टॅबिलायझेशन मिशन’ (चजछणडउज) आणि ‘युनायटेड नेशन्स इंटरिम मिशन इन अबेई’ यांचाही समावेश आहे. १९५० साली कोरियामध्ये भारतीय सैनिकांच्या पहिल्या वचनबद्धतेपासून, भारतीय सैनिकांनी त्यांच्या व्यावसायिक उत्कृष्टतेसाठी सार्वत्रिक प्रशंसा मिळवली आहे. तसेच, शांतता मोहिमांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी देखील केली आहे. अनेक भारतीय सैनिकांनी, ‘युनायटेड नेशन्स मिशन’मध्ये शौर्य गाजवले आहे.

लेफ्टनंट जनरल प्रेम सिंग ज्ञानी: लेफ्टनंट जनरल प्रेम सिंग ज्ञानी यांनी १९६४ साली, सायप्रसमध्ये युनायटेड नेशन्स पिसकिपिन्ग फोर्सचे कमांडर म्हणून काम केले. त्यांना ‘परम विशिष्ट सेवा पदक’ (झतडच) आणि ‘अति विशिष्ट सेवा पदक’ (अतडच) मिळाले.

जनरल कोडंडेरा सुबय्या थिमय्या: जनरल कोडंडेरा सुबय्या थिमय्या: यांनी १९५०-१९५४ सालच्या कोरिया युद्धात, भारतीय सैन्याचे नेतृत्व केले. त्यांना ‘पद्मभूषण’ आणि ‘महावीर चक्रा’ने सन्मानित करण्यात आले.

मेजर जनरल दीवान प्रेम चंद: यांनी नामिबियामध्ये, ‘युनायटेड नेशन्स ट्रान्झिशन असिस्टन्स ग्रुप’चे (णछढअॠ) फोर्स कमांडर म्हणून काम केले.

लेफ्टनंट जनरल सतीश नांबियार मिशनचे माजी प्रमुख आणि युएन सुरक्षा दलाचे फोर्स कमांडर हे ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित आहे.

निष्कर्ष

भारतीय सैन्याने संयुक्त राष्ट्रांच्या ‘शांतीरक्षा’ अभियानात, अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या शौर्य, समर्पण आणि व्यावसायिकतेची जगभरात प्रशंसा झाली आहे. भारताने नेहमीच जागतिक शांतता आणि सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतीरक्षा कार्यात सक्रिय सहभाग, हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. संयुक्त राष्ट्रसंघ शांतीरक्षकांचा आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी दि. २९ मे रोजी ऑपरेशन्समध्ये सेवा करणार्‍या सैनिकांच्या समर्पण आणि धैर्याचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो.

हेमंत महाजन

लेखक निवृत्त ब्रिग्रेडियर असून भारतीय सैन्य दल, राष्ट्रीय सुरक्षा तसेच भारताचे परराष्ट्रीय संबंध या विषयांवर त्यांचा खास अभ्यास आहे. ‘आव्हान चिनी ड्रॅगनचे’, ‘नक्षलवादाचे आव्हान-चीनचे भारताशी छुपे युद्ध’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121