मुंबई : सर्वत्र सध्या केवळ एकाच चित्रपटाची चर्चा आहे ती म्हणजे ‘पुष्पा २ : द रुल’. २०२४ हे वर्ष अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा २’ ने तुफान गाजवलं. बॉक्स ऑफिसवर १०००' कोटींच्या पुढे कमाई करत या चित्रपटाने एक नवा इतिहास रचला. पण तुम्हाला माहित आहे का भारतात आत्तापर्यंत सर्वाधिकवेळा पाहिला गेलेला चित्रपट ‘पुष्पा’ किंवा ‘बाहूबली’ नसून वेगळाच आहे आणि त्या चित्रपटाची तब्बल २५ कोटींची तिकिटं विकली गेली होती.
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ हा असा एक चित्रपट आहे ज्याने अलौकिक कामगिरी करत प्रेक्षकांच्या मनात अनन्यसाधारण महत्व आणि जागा निर्माण केली आहे. ७०च्या दशकातील ‘शोले’ चित्रपट पाहिला नसेल असा एकही प्रेक्षक सापडणं जरा कठीणच. धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, जया बच्चन आणि संजीव कुमार स्टारर हा चित्रपट १९७५ मध्ये प्रदर्शित झाला होता. महत्वाची बाब म्हणजे त्याकाळी ‘शोले’ची २५ कोटी तिकिटं विकली गेली होती आणि भारतीय चित्रपटाच्या सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या चित्रपटांच्या यादीत आजही ‘शोले’ चित्रपटाचा आवर्जुन समावेश केला जातो. तसेच, ६ वर्ष ‘शोले’ चित्रपटाचे शो चित्रपटगृहात सुरु होते. तसेच, भारताशिवाय युरोप, उत्तर अमेरिका आणि मध्य पूर्व या देशांमध्येही शोलेची प्रचंड क्रेझ होती. १९७५ साली प्रदर्शित झालेल्या शोले चित्रपटाचा रेकॉर्ड अजूनही ‘बाहुबली’, ‘पुष्पा २’, ‘जवान’, ‘पठाण’, ‘आरआरआर’ किंवा अन्य कोणतेही चित्रपट मोडू शकले नाही आहेत.
१५ ऑगस्ट २०२५ रोजी ‘शोले’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन ५० वर्ष पुर्ण होतील. या चित्रपटाची कथा, गाणी, संवाद, प्रत्येक प्रसंग हा प्रेक्षकांना आजही तोंडपाठ आहे. विशेष म्हणजे यातील एक-एक दृश्य आजही लोकांच्या मनात जीवंत आहेत. अमिताभ बच्चन यांनी साकारलेला जय, धर्मेंद्र यांनी साकारलेला वीरू, संजीव कुमार यांनी साकारलेला ठाकूर, अमजद खान यांनी साकारलेला गब्बर, हेमा मालिनी यांनी साकारलेली बसंती आणि जया बच्चन यांनी साकारलेली राधाची भूमिका भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरल्या आहेत.