कानसाईचे तरंगते विमानतळ

    06-Sep-2024
Total Views |
 
.kansai airport
 
 
जपानमधील कानसाई हे समुद्रातील आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षमता आणि प्रवाशांचा अनुभव सुधारण्यासाठी नूतनीकरण करत आहे. २०२६ सालापर्यंत विमानतळाची क्षमता वार्षिक ४० दशलक्ष प्रवाशांपर्यंत वाढवण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. हा विस्तार गेल्या पाच दशकांतील या प्रदेशातील सर्वात लक्षणीय नूतनीकरणाच्या प्रयत्नांपैकी एक आहे.
 
कानसाई आंतरराष्ट्रीय विमानतळाने नुकताच 30वा वर्धापन दिन साजरा केला. जपानमधील तिसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक व्यस्त अशा या विमानतळाचे दि. ४ सप्टेंबर १९९४ रोजी लोकार्पण झाले होते. हा प्रकल्प उभारण्यासाठी त्याकाळी सुमारे २० अब्ज डॉलर्स इतका खर्च आला. हा प्रकल्प सुरुवातीला जपानमधील कोबेजवळ बांधण्यात येणार होता. मात्र, या भागात स्थानिकांच्या विरोधानंतर कानसाई विमानतळ समुद्राच्या मध्यभागी बांधण्यात आले. हे विमानतळ खाडीत बांधल्याचा फायदा म्हणजे विमानतळ २४ तास मुक्तपणे काम करू शकते. विमानतळ पूर्ण होण्यास सात वर्षे लागली. या विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे काम १९७८ मध्ये सुरू झाले.
 
‘एरोटाईम’च्या मते, कानसाई विमानतळ हळूहळू बुडत आहे. त्यांच्या मते, २०५६ सालापर्यंत हे विमानतळ पूर्णपणे समुद्राखाली जाऊ शकते. याचे कारण देताना सांगितले जाते की, अभियंत्यांनी विमानतळ बांधण्यासाठी खाडीतील २० मीटर (६६ फूट) खोल लाखो लीटर पाणी उपसून नंतर एक समुद्री भिंत बांधली. मातीच्या समुद्रतळावर पाच फूट खोल वाळू घातली गेली आणि नंतर पाया मजबूत करण्यासाठी सुमारे १६ इंच व्यासाचे २.२ दशलक्ष उभ्या पाईप्स पायथ्यामध्ये नेण्यात आल्या. पण, तरीही पाया ओल्या स्पंजचा आहे आणि तो बांधल्यापासून २०१८ मध्ये ३८ फुटांनी बुडाला होता. त्यांच्या मते, विमानतळाचा पाया १९९४ मध्ये २० इंच आणि२००८ मध्ये तीन इंचांनी बुडाला आहे. पाय बुडण्याचा वेग वाढत असल्याचेही अभ्यासकांचे म्हणणे आहे.
 
आंतरराष्ट्रीय उड्डाणांची क्षमता वाढविण्याच्या आणि प्रवाशांचा अनुभव सुधारण्याच्या उद्देशाने विमानतळाच्या टर्मिनल-1चे नूतनीकरण आणि विस्तार करण्यासाठी सध्या मोठी कामे सुरू आहेत. विमानतळ तंत्रज्ञानाच्या मते, हा विस्तार गेल्या 50 वर्षांमध्ये या प्रदेशात हाती घेतलेल्या आजपर्यंतचे नूतनीकरणाचे सर्वात लक्षणीय काम आहे. मे २०२१ मध्ये हे विस्तारीकरणाचे काम सुरू झाले. ऑक्टोबर २०२२मध्ये टर्मिनलच्या दुसर्‍या मजल्यावर नवीन स्थानिक क्षेत्राचे, त्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये नवीन आंतरराष्ट्रीय निर्गमन क्षेत्राचे उद्घाटन करण्यात आले. चौथ्या मजल्यावर नवीन सुरक्षा स्क्रीनिंग क्षेत्र, तिसरा मजला आंतरराष्ट्रीय विश्रामगृहांसह २०१५ सालच्या वसंत ऋतूमध्ये उघडणे अपेक्षित आहे, तर विस्तारीकरणाचे सर्व काम २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. अनेक आव्हाने असूनही ओसाका कानसाई विमानतळाला सिव्हिल इंजिनिअरिंगमधील आश्चर्य म्हणून ओळखले जाते.
 
जपानमधील सर्वाधिक आधुनिक विमानतळांप्रमाणे कानसाई हे जपानच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी रेल्वेने तसेच रस्तेमार्गाने जोडलेले आहे. जपान ट्रॅव्हलनुसार, मध्य ओसाका येथून रेल्वेचा प्रवास ३० मिनिटांपेक्षा जास्त आहे. जेआर लिमिटेड एक्सप्रेस आणि रॅपिड ट्रेनद्वारे ही सेवा दिली जाते. शिन-ओसाकाच्या बुलेट ट्रेन हबपासून प्रत्येक ५० मिनिटांनी रेल्वे धावते. ओसाकाला जाणार्‍या गाड्यांमध्ये आरक्षित आणि अनारक्षित जागांसाठी वेगवेगळे किमतीचे पर्याय आहेत. इतर साधनांमध्ये बस आणि टॅक्सी यांचा समावेश आहे. रहदारीवर अवलंबून, डाऊनटाऊन ओसाकाला जाण्याची वेळ ४० ते ५० मिनिटे आहे. टोकियो-हानेडा आणि टोकियो -नारिता हे जपानचे मुख्य आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वार आहेत, तर उत्तर अमेरिकेपासून कानसाईपर्यंत काही थेट उड्डाणे आहेत. ‘हवाईयन एअरलाईन्स’ होनोलुलु येथून उड्डाणे चालवते. ‘युनायटेड एअरलाईन्स’ कंसाई ते गुआम, सॅन फ्रान्सिस्को म्हणजेच ‘जपान एअरलाईन्स’देखील लॉस एंजेलिसला या छोट्या अमेरिकन प्रदेशासाठी उड्डाणे चालवते.