रत्नागिरीची समुद्रकन्या

    04-Sep-2024   
Total Views |
article on dr sayali nerurkar


सागरी संशोधनक्षेत्रात यशाची शिखरे गाठून समाजाभिमुख सागरी संशोधनाच्या दृष्टीने वाटचाल करणार्‍या रत्नागिरीच्या सागरी जीवशास्त्रज्ञ डॉ. सायली नेरुरकर यांच्याविषयी...

या समुद्रकन्येचे बालपण खाडीकिनारी गेले. त्यामुळे तिला किनार्‍याची ओढ निर्माण झाली. या ओढीचे पुढे आवडीत, आणि त्यानंतर ध्येयात रुपांतर झाले. महाराष्ट्रात दुर्लक्षित राहिलेल्या सागरी संशोधनासारख्या क्षेत्रात, तिने काम करण्याचा निर्णय घेतला. त्याला परिश्रम, जिद्द आणि चिकाटीची जोड दिली. शंखासारख्या जीवावर संशोधन करण्याच्या ध्येयाने, तिने अनेक समुद्र किनारे पालथे घातले आहेत. त्यामुळे भारताला शंखाच्या नवीन प्रजाती तर मिळाल्याच, सोबतच अनेक प्रजातींची देशात पहिल्यांदाच नोंद झाली. अशी ही समुद्रकन्या म्हणजे सागरी जीवशास्त्रज्ञ डॉ. सायली मुकूंद नेरुरकर.

सायली यांचा जन्म दि. 6 ऑक्टोबर 1986 रोजी पुण्यात आपल्या आजोळी झाला. मात्र, त्यांचे बालपण हे कोकणातील राजापूर तालुक्यातील साखर कोंबे या छोट्याशा गावात गेले. याच ठिकाणीच त्यांचे प्राथमिक शिक्षणही पूर्ण झाले. वडील संजय मावळंकर पेशाने शिक्षक. त्यामुळे प्राथमिक शिक्षणानंतरचा सायली यांचा शैक्षणिक प्रवास, हा कोकणातीलच वेगवेगळे तालुके आणि जिल्ह्यांमध्ये झाला. आठवीपर्यंतचे शिक्षण हे खेड तालुक्यातील लवेल येथे, आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण हे, राजापूर तालुक्यातील कोंड्ये येथे, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण हे देवरुखच्या काकासाहेब सप्रे महाविद्यालयामध्ये, पदव्युत्तर शिक्षण सावंतवाडीतील एस. पी. के. महाविद्यालयामध्ये, आणि पदव्युत्तर पदवीचे शिक्षण हे रत्नागिरीच्या गोगटे महाविद्यालयात पार पडले. शैक्षणिक गुणवत्ता उत्तम असावी आणि लेकीच्या गुणांना वाव मिळावा, म्हणून सायली यांच्या वडिलांनी त्यांचा असा शैक्षणिक प्रवास घडवला. सायली यांनीदेखील हा शीण देणारा प्रवास आवडीने केला, कारण त्यांना शिक्षणाची गोडी होती. त्यांचे साखर कोंबेमधील घर हे, जैतापूरच्या खाडीकिनारी होते. त्यामुळे लहानपणीच सायली यांच्या मनात किनारी परिसंस्थेविषयी आकर्षण आणि कुतूहल निर्माण झाले. प्राणी आणि वनस्पतींविषयी आवड निर्माण झाली. याच आकर्षणापोटी त्यांनी प्राणीशास्त्र या विषयामधूनच आपले, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

2010 साली सायली यांनी, रत्नागिरीच्या गोगटे महाविद्यालयामधून पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. हे शिक्षण खर्‍या अर्थाने सायली यांना, किनारी परिसंस्थेच्या जवळ नेणारे ठरले. शिक्षकांच्या पाठिंब्यामुळे त्यांनी ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’कडून (बीएनएचएस) रत्नागिरीच्या किनारपट्टीवर पार पडणार्‍या, जैवविविधता सर्वेक्षणात भाग घेतला. शिवाय जनजागृती कार्यक्रमांमध्येही स्वयंसेवक म्हणून काम केले. त्यामुळे त्यांच्या समोर, समुद्र किनारे, खाड्या अशा किनारी परिसंस्थेविषयीची कवाडे खुली झाली. शिक्षणानंतर सायली यांनी गोगटे महाविद्यालयामध्येच, 2010 ते 2011 या दोन वर्षांत प्राध्यापक म्हणून काम केले. 2012 मध्ये मुकूंद नेरुरकर यांच्याशी त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर करिअरच्या वाटेत, दोन वर्षांचा खंड पडला. मात्र, दोन वर्षांनंतर सायली जोमाने कामाला लागल्या. पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणादरम्यान, डॉ. दिपक आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केल्यामुळे, 2014 साली त्यांना ‘बीएनएचएस’मध्ये काम करण्याची संधी मिळाली. ‘बीएनएचएस’च्या रत्नागिरी उपकेंद्रातील सागरी विभागात त्या रुजू झाल्या. 2014 ते 2021 या सात वर्षांच्या कार्यकाळात त्यांना केवळ महाराष्ट्रामधीलच नाही तर, भारतातील अर्ध्याहून अधिक किनारी राज्यांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

राजापूर तालुक्यातील अणसुरे खाडीवर सायली यांनी आपल्या सहकार्‍यांसोबत, दीर्घकालीन अभ्यास केला. यामध्ये जैवविविधता नोंदींसह , खाडीवर अवलंबून असणारे सामाजिक आणि आर्थिक, अशा पैलूंचे त्यांनी सर्वेक्षणही केले. सिंधुदुर्गची किनारपट्टीचन त्यांनी पालथी घातली. गोवा, केरळ, तामिळनाडू, लक्षद्वीप आणि अंदमान इथल्या किनारपट्टीच्या जैवविविधतेचे सर्वेक्षणही त्यांनी केले. पुढच्या काळात त्यांनी ‘नासारिडी’ या दुलर्क्षित शंखांवर पीएचडी केली. डॉ. आपटे यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत केलेल्या या अभ्यासामधून, सायली यांनी आरे-वारेच्या कांदळवनांमधून ‘नॅसेरियस आरेवारेएन्सिस’ आणि मांडवीच्या वालुकामय किनार्‍यावरुन, ‘नॅसेरियस दिपकाआपटेई’ या शंखाच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावला. तर रत्नागिरी, गुजरात आणि खोल अरबी समुद्रामधून, भारतामध्ये पहिल्यांदाच आढळणार्‍या शंखांच्या प्रजातींची नोंद केली. विविध देशांमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय सागरी परिषदांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून, सादरीकरणदेखील केले.

2023 सालापासून सायली या पुण्यातील ’इकोलॉजिकल सोसायटी’मध्ये काम करत आहेत. या संस्थेचे संस्थापक डॉ. प्रकाश गोळे यांनी, 30 वर्षांपूर्वी कोकण किनारपट्टीच्या जैवविविधतेचे सामाजिक आणि आर्थिक अंगाने सर्वेक्षण केले होते. त्याअनुषंगाने आता 30 वर्षांनंतर या पैलूंमध्ये कशा प्रकारे बदल झाला आहे, हे अभ्यासण्याचे काम ‘कोस्टल 2.0’ या प्रकल्पाअंतर्गत, सायली आणि त्यांचे सहकारी करत आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील 25 ठिकाणी त्यांनी, सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. यासंबंधीचा अहवाल लवकरच प्रकाशित होणार असून, त्यामुळे कोकणातील सागरी जीवांचा खजिना, आणि त्यावर अवलंबून असणार्‍या समाजघटकांच्या अनेक पैलूंचाही उलगडा होणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे, 12 हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. सागरी परिसंस्थेमधील सूक्ष्म दुलर्क्षित प्रजातींवर तळमळीने काम करुन , समाजाभिमुख धोरणांची अंमलबजावणी करु पाहणार्‍या, सायली यांच्यासारख्या संशोधकांची आपल्या समाजाला नितांत गरज आहे. पुढील वाटचालीकरिता त्यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!



 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.