‘मधूर’ सजावटीचा ‘अमृता’नुभव...

    29-Sep-2024   
Total Views |
 
Madhur Amrute
 
गणेशोत्सव मंडळाप्रमाणेच काही घरगुती गणेशोत्सवातदेखील अनेक आकर्षक सजावट करतात. बाप्पांसाठी आकर्षक सजावटी आणि देखावे निर्माण करणार्‍या डोंबिवलीच्या मधूर अमृते यांच्याविषयी...‘अमृता’नुभव...
 
मधूर हे डोंबिवली पश्चिमेतील नवापाडा परिसरात वास्तव्यास आहे. मधूर यांचे बालपण अत्यंत कष्टात गेले. शालेय जीवनापासूनच त्यांच्या आयुष्यात एक संघर्ष होता. लहान वयातच त्यांना पेपर टाकण्याचे काम करावे लागत होते. त्यानंतर लहान मुलांना, शाळेत ने-आण करण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या घरी दरवर्षी दीड दिवसाचा गणपती बाप्पा बसत असे. त्यावेळी बाप्पांच्या सजावटीसाठी थर्माकोलपासून मखर तयार करण्याचे काम, मधूर करत असत. मधूर यांच्या अंगात मूळातच कला होती. त्यामुळे मखरांमध्ये त्यांनी स्वकल्पनेतूनदेखील काही बदल केले. मधूर यांच्या मखरांचे कुटुंबीयांकडून आणि त्यानंतर नातेवाईकांकडून कौतुक होऊ लागले. मधूर यांच्या घरातील गणपती बाप्पांची मूर्ती जेमतेम दोन फूट उंचीची असायची. पण, काही मोठे मखर करण्याची कल्पना मधूर यांच्या मनात रुजली. दरम्यानच्या काळात त्यांची ओळख अरूण जाधव यांच्याशी झाली. त्यांच्यात मैत्री वाढत गेली. अरूण देखील कलेचे चाहतेच होते. मधूर यांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला येताना अरूण यांनी, मधूर यांची सजावट पाहिली. पुढील वर्षी काहीतरी वेगळे करायची सहज चर्चा मोदक खाता-खाता दोघांमध्ये रंगली. त्यानंतरच्या प्रत्येक गणेशोत्सवात सजावटीच्या सेटची थीम काय असेल, तो कसा उभारायचा, त्यासाठी काय साहित्य वापरायचे, या सगळ्या गोष्टींवर मधूर आणि अरूण हे दोघहीे ही जूनपासून चर्चा करू लागले. जसे संगीतकार आधी गाण्याची चाल तयार करतो, आणि मग गीतकार गाणे लिहितो, अगदी तसेच मधूर आधी मखर काय करायचे हे ठरवायचे, आणि मग बाप्पाच्या मूर्तीची निवड करायला जायचा.
 
मधूर यांच्या घरापासून काही अंतरावरच भरत वझे कुटुंब वास्तव्याला आहे. त्यांच्याकडे एकत्र कुटुंब पद्धतीत गणेशोत्सव साजरा होतो. त्यांच्या घरी गणेशोत्सवात विविध विषयावरील भव्य मखर दरवर्षी साकारले जाते. मधूर त्यांच्या घरी जाऊन बारकाईने या देखाव्याचे निरीक्षण करत असत. अरूण आणि मधूर २०१६ सालापासून एकत्र येऊन गणपती बाप्पांची सजावट करायला लागले. त्यांनी दोघांनी मिळून पहिल्यांदा राजस्थानातील एका पुरातन मंदिराची प्रतिकृती उभारली. थर्माकोलमध्ये कोरीव काम करून
केलेल्या या मंदिराच्या प्रतिकृतीची उंची तब्बल १२ फूट झाली. कागदावर आधी चित्र साकारून, एक सेमी म्हणजेच, प्रत्यक्षात एक फूट या प्रमाणात त्यांनी २०१७ सालामध्ये अंबारीचे १२ फुटी मखर तयार केले. यात एका भल्या मोठ्या हत्तींच्या पाठीवर गणपती बाप्पाची मूर्ती बसवली होती. मखराला आधार देण्यासाठी त्यांनी प्लायवूडच्या पट्ट्यांचा लिलया वापर असा केला की, समोरून पाहणार्‍या व्यक्तीला प्रश्न पडायचा की , एवढा मोठा हत्ती उभा कसा राहिला असेल? या मधूर यांच्या कलाकृतीचा फोटो एका आघाडीच्या दैनिकाने पहिल्या पानावर छापला. त्यामुळे मधूर यांच्या घरी जाऊन अनेक अनोळखी लोकांनी या देखाव्याचे, आणि बाप्पांचे दर्शन घेतले. २०१९ आणि २०२० ही दोन वर्ष मधूर यांच्यासाठी महत्त्वाची ठरली. मधूर एक कलाकार म्हणून अधिकच चर्चेत आले. मधूर यांनी २०१९ मध्ये कपडे धुवायच्या शेकडो किलो पिवळ्या साबणापासून, ९ फूट उंच बालाजी प्रवेशद्वार, तर २०२० सालामध्ये लाखो टूथपीक वापरून साकारलेला ‘लंडन ब्रीज’ डोंबिवलीमध्ये चर्चेचा विषय ठरला. मधूर दोन महिने अपार मेहनत घेऊन हे देखावे तयार जरी करत असले, तरी त्यांच्या घरी दीड दिवसांचा गणपती असल्यामुळे सर्वांनाच देखावा पाहता येत नसे. त्यामुळे मित्र परिवाराच्या आग्रहास्तव मधूर दहा दिवस हा देखावा पाहण्यासाठी घरात तसाच ठेवून देत असत.
 
मधूर यांच्या कलेची दखल काही मराठी वृत्तपत्रांनी घेतली, आणि त्यांच्यवर घरगुती गणपती सजावट स्पर्धेच्या मुख्य परिक्षकांची जबाबदारी सोपविण्यात आली. यामध्ये देखील अरूण हे मधूर सोबत होते. अनेक मित्रांनी त्यांना मखर सजावटीचा व्यवसाय का करत नाही? असा प्रश्न विचारला. त्यावर मधूर नम्रपणे उत्तर देत असत की, मी माझ्या घरच्या बाप्पाच्या श्रध्देपोटी करतो. बाप्पाच माझ्या हातून हे करवून घेतो.
 
मधूर यांनी आतापर्यंत श्रीराम मंदिर, मिनाक्षी मंदिर, सोमनाथ मंदिर, सूर्य मंदिर, आणि हत्तीसिंह मंदिर आदी देखावे साकारले आहेत. गेल्यावर्षी त्यांनी आठ फुटी मंदिर प्रवेशद्वार साकारले होते. मधूर यांच्या छोट्या मुलीलादेखील सजावटीच्या कामात रूची निर्माण झाली आहे. छोट्या आर्वीच्या जन्मानंतर, मधूर यांनी घरचा बाप्पा पाच दिवस ठेवायला सुरूवात केली आहे. यावर्षी तर आपला बाप्पा झोपाळ्यात बसलेला पाहिजे असा हट्ट मुलीने धरल्याने, सात फूट उंचीच्या छताला टांगलेला झोपाळा तयार करून त्यात, गणपतीची मूर्ती विराजमान केली होती. ‘कलेला भाषा नसते, भावना असतात’ हे मानणारे मधूर, दरवर्षी या भावनाच्या आधारे विविध कलाकृती साकारत आहे. पुढील वर्षी काय करणार असा प्रश्न विचारला असता, मधूर यांनी मिश्किल हास्य करत उत्तर दिले ‘जे बाप्पा ठरवेल ते.’ आपला काम धंदा, कुटुंब सांभाळून आपल्या कलेची जोपासना करणार्‍या मधूर यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’ तर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.