मुंबई : मविआच्या ‘खोटा फॅक्टरी’ला न्यायालयाची सणसणीत चपराक बसली आहे, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात न्यायालयाने संजय राऊतांना १५ दिवसांचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. यावर केशव उपाध्येंनी प्रतिक्रिया दिली.
केशव उपाध्ये म्हणाले की, "उबाठा सेनेचा भोंगा आणि महाविकास आघाडीचा स्वयंघोषित प्रवक्ता अशी दुतोंडी ओळख असलेल्या संजय राऊतांचे खोटेपणाचे पितळ उघडे पडल्यावर आता त्यांनी न्यायसंस्थेवरही ताशेरे ओढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांचा तोल पुरता ढळल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या जनतेस मूर्ख समजून मनाला येईल त्या खोट्या कंड्या पिकवण्याच्या राऊतांच्या कारखान्याला न्यायालयाने टाळे लावले आहे. त्यांना झालेली शिक्षा म्हणजे संपूर्ण महाविकास आघाडीच्या खोटे पसरवण्याच्या उद्योगाला मिळालेली चोख चपराक आहे."
"महाविकास आघाडी सरकार सत्तेतून गेल्यानंतर संजय राऊत सैरभैर झाले आहेत. त्यामुळे त्यांना महायुती सरकारच्या गतिमान विकास कामांमुळे सुरू असलेल्या प्रगतीची पोटदुखी जडली आहे. म्हणूनच सत्ता गेल्यानंतर संपूर्ण महाविकास आघाडीने फेक नॅरेटिव्ह पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा कट रचला. राज्यातून उद्योग परराज्यात गेल्याची अफवा, अटल सेतूला तडे गेल्याचा कांगावा, संविधान बदलण्याचा अपप्रचार, पुण्यात खासगी जागेत ट्र्क रुतला असताना रस्त्यातील खड्ड्यात ट्र्क घुसला असल्याचे वृत्त पसरवणे, महाराष्ट्राचा मणिपूर होणार अशी भाकिते करून नागरिकांमध्ये भय निर्माण करण्याचा कट, अशी अनेक कारस्थाने महाविकास आघाडीने करून पाहिली. ती सारी बिनबुडाची असल्याचे सिद्ध होऊन फसली. खोट्याच्या फॅक्टरीतून पिकणारे अफवांचे पीक राऊतांच्या डोक्यात उगवत होते आणि मविआचे अन्य नेते त्याला खतपाणी घालत होते," असा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, "याच सडक्या मानसिकतेतून राऊतांनी मेधा सोमय्या यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून सनसनाटी निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न आता त्यांच्या अंगाशी आला आहे. खोट्याच्या पाठीत सोटा या न्यायाने त्यांना त्याची फळे भोगावी लागणार असून महाविकास आघाडीने आतातरी यापासून बोध घेत आपली कातडी वाचवावी आणि राऊतांचा भोंगा बंद करावा," असेही केशव उपाध्ये म्हणाले.