कट्टरपंथीयांची दुनिया न्यारी

    26-Sep-2024   
Total Views |

Islamic
 
आपण इस्लामिक बिझनेस ग्रुप आहोत, असे सांगणार्‍या ‘ग्लोबल इखवान सर्विसेज अ‍ॅण्ड बिझनेस होल्डिंग्स’च्या धार्मिक वसतिगृहामध्ये बालकांचे शोषण होते, अशा तक्रारी मलेशियाच्या पोलिसांकडे आल्या. पोलिसांनी ’ग्लोबल इखवाना’च्या २० धार्मिक वसतिगृहांवर छापाही टाकला. ४०२ बालकांची सुटका केली. कोण आहेत ही बालक?
 
आपण इस्लामिक बिझनेस ग्रुप आहोत, असे सांगणार्‍या ‘ग्लोबल इखवान सर्विसेज अ‍ॅण्ड बिझनेस होल्डिंग्स’च्या धार्मिक वसतिगृहामध्ये बालकांचे शोषण होते, अशा तक्रारी मलेशियाच्या पोलिसांकडे आल्या. पोलिसांनी ’ग्लोबल इखवाना’च्या २० धार्मिक वसतिगृहांवर छापाही टाकला. ४०२ बालकांची सुटका केली. कोण आहेत ही बालक?
 
सुटका केलेल्यांमध्ये वयवर्षे एक ते १७ पर्यंत २०१ मुले आणि २०१ मुली आहेत. त्यांची शारीरिक आणि मानसिक स्थिती खूपच नाजूक होती. त्यांच्यावर वर्षानुवर्षे शारीरिक अत्याचार होत होता, हे आरोग्य तपासणीतून समजले. मुलांनी सांगितले की, या धार्मिक वसतिगृहातील बालके ही कितीही आजारी पडली, तरीसुद्धा त्यांच्यावर उपचार केले जात नसत. अगदीच जिवावर बेतले की, मग त्यांना दवाखान्यात नेले जात असे. बालकांवर लैंगिक अत्याचार केला जायचा. शोषित बालकांनी दुसर्‍या बालकावर अत्याचार करावा, यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जायचा. त्यांनी तसे केले नाही, तर त्यांना सर्वप्रकारचा त्रास दिला जायचा.
 
बालकांचे शोषण, हिंसा, अपहरण वगैरे वगैरे गुन्हांसाठी मलेशियन पोलिसांनी या वसतिगृहाशी संबंधित १७१ आरोपींना अटक केली. त्यामध्ये एका व्यक्तीला चार पत्नी आणि ३४ मुले होती. पण, ३२ मुले कुठे आहेत, ते त्याला माहिती नाही, असे त्याने सांगितले. त्याच्यासारख्या अनेक व्यक्ती होत्या की, ज्यांना चार-चार बायका होत्या, अनेक मुले होती. पण, या मुलांपैकी एक-दोन मुलेच त्यांच्यासोबत होती. बाकी, मुले कुठे आहेत हे त्यांना माहिती नव्हते, असे त्यांनी सांगितले.
 
या लोकांची मुले ‘ग्लोबल इखवाना’च्या धार्मिक वसतिगृहामध्ये डांबून ठेवण्यात आली होती, असे मलेशियन पोलिसांचे म्हणणे. त्यासाठी आता या मुलांची आणि कंपनीच्या कर्मचार्‍यांची ’डीएनए’ टेस्ट करण्याचाही त्यांचा विचार आहे.
 
अशाप्रकारचे भयंकर धार्मिक वसतिगृह चालवणार्‍या ‘ग्लोबल इखवान सर्व्हिसेस अ‍ॅण्ड बिझनेस होल्डिंग्स ग्रुप्स’चे वास्तव काय? हा ग्रुप स्वत:ला ‘इस्लामिक बिझनेस ग्रुप’ म्हणतो. जगभरात त्यांचे किराना बेकरी हॉटेल, पोल्ट्री फॉर्म असे अनेक उद्योग आहेत. या बिझनेस ग्रुपची स्थापना अशारी मोहम्मद या व्यक्तीने केली होती. त्यालाही पाच बायका आणि ४० मुले. त्याचे म्हणणे की, अल्लाने त्याला विशेष शक्ती दिली असून, तो मोहम्मद पैगंबरांना प्रत्यक्ष भेटू शकतो. मलेशियातील मुस्लीम नागरिकांचे समर्थन मिळावे, म्हणून तो स्वत:च सांगे की, अल्लाने त्याला मलेशियाच्या राजसत्तेबद्दलही सांगितले आहे. पुढे, अशारी इस्लामच्या कट्टरतेबद्दल लोकांना सांगू लागला. त्याने आधुनिक कोणतीही व्यवस्था नाकारली. इस्लाममध्ये जे सांगितले, तसेच प्रत्येकाने जगावे, इस्लामसाठी प्राण द्यायलाही तयार असायला हवे, असे तो सांगे. त्याचे प्रस्थ वाढत गेले. त्याने १९६८ साली ‘अल अक्रम’ नावाचा धार्मिक संप्रदाय सुरू केला. पण, मूळ इस्लामशी प्रतारणा करतो, या गुन्ह्यासाठी अशारीला अटक करण्यात आली आणि १९९४ साली त्याच्या ‘अल अक्रम’ संप्रदायावर बंदी टाकण्यात आली. २०१० साली तुरूंगातच त्याचे निधन झाले. मात्र, ग्रुपवर बंदी टाकूनही कट्टरपंथीयांमुळे ‘ग्लोबल इखवाना ग्रुप’ची भरभराटच होत गेली. या कंपनीने स्वत:च जाहीर केले होते की, त्यांच्याकडे पाच हजारांपेक्षा जास्त कर्मचारी आहेत आणि एक हजार ६५६ कुटुंबाचे नेटवर्क आहे. या कुटुंबामध्ये ४६५ घरांतील पुरुषांना तीन-तीन, चार-चार पत्नी आहेत.
 
मलेशिया पोलिसांना आणि राजसत्तेला संशय आहे की, हा बिझनेस ग्रुप ‘अल अक्रम’चे तत्त्वज्ञान पुन्हा रूजवण्यासाठी त्यांच्या कर्मचार्‍यांचा वापर करतो. कर्मचार्‍यांना बहुविवाह करण्यास उदयुक्त करतो, त्यातून अनेक मुलांना जन्माला घातले जाते. ही मुले या वसतिगृहात ठेवली जातात. या बालकांना कठोरातले कठोर जगणे जगायला भाग पाडले जाते, त्यांच्यातली संवेदना माणुसकी मारून टाकली जाते. भयंकर! स्वत:च्याच मुलांना अशा ठिकाणी पाठवणारे आईबाबा. का? तर, त्यांचा विश्वास असलेला स्वत:ला कट्टर आणि खरा मुस्लीम संप्रदाय मानणारा ‘अल अक्रम’चे तत्त्वज्ञान जगभरात फोफावे म्हणून. लेशियाच्या राजसत्ता मुस्लीम धर्मसत्तेने या सगळ्याचा तीव्र निषेध केला आहे आणि यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, ग्रुप्सचे मलेशियातील अनेक कट्टरपंथ राजकीय नेत्यांशी आणि विचारवंतांशी सौख्य आहे. हजारो लोक आजही ‘अल अक्रम’चे समर्थन करतात. काय म्हणावे, कट्टरपंथीयांची दुनियाच न्यारी!
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.