द्रविडी ‘ब्रिगेडी’

    26-Sep-2024   
Total Views |
 
Dravidi Brigadi
 
एकीकडे हिंदूविरोध आणि दुसरीकडे जिहादी मानसिकता, चर्चला पायघड्या घालणे म्हणजेच ‘पेरियारवाद’ असल्याचे दिसून येते. तामिळनाडू हे एकप्रकारे हिंदूविरोधाचे प्रमुख केंद्र बनले आहे का, अशी शंका निर्माण होते. अर्थात, हे केवळ तामिळनाडूमध्येच घडते असे नाही. महाराष्ट्रातही ब्रिगेडने अशाच प्रकारची देशविघातक विचारसरणी जन्मास घालून त्याचे पालनपोषण सुरू केले आहेच.
 
मिळनाडूमध्ये तीन जणांनी २४ वर्षीय तरुणाने परिधान केलेले जानवे कापून फेकून दिल्याची घटना तिरुनेलवेली येथे नुकतीच घडली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे. ही घटना २१ सप्टेंबर रोजी घडल्याचे पोलिसांनी एक निवेदन जारी केले. पलायमकोट्टई येथे संध्याकाळी अखिलेश नामक तरुण भजनात भाग घेण्यासाठी ब्राह्मण समाजाद्वारे चालवल्या जाणार्‍या स्थानिक आस्तिक समाजाकडे जात होता. यावेळी अखिलेशने केवळ धोतर परिधान केले होते. तो आपल्या गंतव्यस्थानी जात असताना मोटरसायकलवरून तीन लोक आले आणि त्यांनी अखिलेशला थांबवून चहुबाजूंनी घेरले. त्यानंतर, त्यांनी अखिलेशवर शिव्यांचा वर्षाव करून त्याचे ‘पुनुलू’ अर्थात जानवे कापून टाकले आणि पुन्हा त्याने ते परिधान करू नये, असेही धमकावले. सदर तरुणाने हा प्रकार आपल्या कुटुंबीयांना आणि सहकार्‍यांना सांगितल्यावर ‘हिंदू मुन्नानी’ आणि ‘आस्तिक समाज’ या हिंदुत्ववादी संघटनांनी २१ सप्टेंबर रोजी रात्री पेरुमलपुरम पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. अर्थात, तामिळनाडूमधील पेरियारवादी सरकारचा पूर्वेतिहास पाहता, पोलिसांनी आरोपींचा शोध घेणे, आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल होऊन न्यायालयात खटला उभा राहणे अशी अपेक्षा करणे म्हणजे, अपेक्षाभंगास निमंत्रण देणेच ठरणार आहे.
 
तामिळनाडूमध्ये घडलेल्या या घटनेविषयी अतिशय सोयीस्करपणे मौन इकोसिस्टीमकडून बाळगण्यात आले आहे. त्याचे कारण म्हणजे, अर्थातच पीडित व्यक्तीचे हिंदू असणे हेच आहे. आपल्या धर्माचे पालन करणारा आणि शांतपणे आपापले व्यवहार करणारा हिंदू या इकोसिस्टीमला कधीही बघवत नाही. अर्थात, हिंदूही जमेल तेवढा काळ शांत राहतो आणि कधीतरी मग 1992 सालाप्रमाणे ढाँचा उद्ध्वस्त करून भल्याभल्यांना घाम फोडतोच. असो. तर या घटनेविषयी मौन बाळगून घटनेचे महत्त्व कमी करण्याचा हा नेहमीचा प्रयत्न आहे. याउलट मुस्लिमांवर गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यांची अथवा चर्चवर झालेल्या हल्ल्यांच्या खोट्या प्रकरणांवर गावगन्ना बोंब मारून हिंदू समाज हा हिंसक आहे, हा ‘नॅरेटिव्ह’ पसरविण्याचा खेळ देशात ठराविक अंतराने खेळला जात असतो. असो. तर, तामिळनाडूमध्ये घडलेला प्रकार नेमका कोणी घडविला हेदेखील अद्याप गुलदस्त्यात आहे. अर्थात, यामागे पेरियारप्रणित कथित द्रविडी विचारसरणीचे पालन करणारे असण्याची शक्यता असल्याचा संशय घेण्यास जागा आहे. अर्थात, पेरियारप्रणित द्रविडी विचारसरणीचे पालन करणारे असा प्रकार मुस्लिमांविरोधात करण्याची हिंमत दाखवू शकणार नाही. कारण, त्यांनी तसे केल्यास तातडीने ‘सर तन से जुदा’चा फतवा निघेल, याची त्यांना जाणीव आहे. त्याचप्रमाणे, असा प्रकार ख्रिश्चिन धर्मियांविरोधात केल्यास चर्चचे दबावतंत्रही झेपणारे नाही, हेदेखील त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे, पेरियारवाद्यांची कथित मर्दुमकी केवळ शांततेत जगणार्‍या हिंदू समुदायापुढेच चालते हे विशेष!
 
तर, तामिळनाडूमध्ये हिंदूविरोधाचे विष पेरणार्‍या पेरियार महोदयांची ओळख करून घेणे आवश्यक ठरते. हे महान गृहस्थ नेमके कोण, याविषयी देशाचे पहिले पंतप्रधान, महान लोकशाहीवादी आणि उदारमतवादी, इकोसिस्टीमचे लाडके असे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दि. ५ नोव्हेंबर, १९५७ रोजीच तत्कालीन मद्रास प्रांताचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. कामराज यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
 
पंडितजी आपल्या पत्रात म्हणतात, “ई. व्ही. रामास्वामी नायकर यांच्या सततच्या ब्राह्मणविरोधी मोहिमेमुळे मी अत्यंत व्यथित झालो आहे. काही काळापूर्वी मी तुम्हाला याबद्दल लिहिले होते आणि त्यावेळी मला सांगण्यात आले होते की, हे प्रकरण विचाराधीन आहे. मात्र, रामास्वामी नायकर पुन्हा तेच बोलताना आणि लोकांना योग्य वेळी चाकूने वार करून मारण्यास सांगत असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. ते जे बोलत आहेत ते फक्त गुन्हेगार किंवा वेडेच बोलू शकतात. ते नेमके काय आहेत हे मला माहीत नाही. पण, एक गोष्ट माझ्यासाठी स्पष्ट आहे की, अशा गोष्टींचा देशावर खूप निराशाजनक परिणाम होतो. सर्व समाजकंटक आणि गुन्हेगारी घटकांना वाटते की, ते अशाप्रकारे कार्य करू शकतात. त्यामुळे, या प्रकरणाला सामोरे जाण्यास विलंब होऊ नये, असे मी सुचवितो. नायकर यास वेड्यांच्या इस्पितळात (नेहरूंचा शब्द - लुनाटिक असायलम) आणि त्याच्या विस्कळीत मनावर उपचार केले पाहिजेत. खून प्रत्यक्षात घडल्याशिवाय कायदा आम्हाला कारवाई करण्यास परवानगी देत नाही, असे मला सांगणार्‍या लोकांचे आश्चर्य वाटते. कायदा बर्‍याचदा खूप मूर्ख असतो. परंतु, खुनाला चिथावणी देण्याच्या मोहिमेला परवानगी देण्याइतकाही कायदा मूर्ख नाही.
 
अशाप्रकारे, पेरियार हा द्वेषाने वेडा झालेला, हत्येची चिथावणी देणारा आणि समाजात दुही पसरविणारा मनोरुग्ण असल्याचे मत पंडित नेहरू यांचे झाले होते, असेच या पत्रातून स्पष्ट होते. स्वातंत्र्यपूर्व काळात काही काळ पेरियार यांनी काँग्रेसमध्येही काम केले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडून स्वत:ची जस्टीस पार्टी स्थापन केली (याचेच रुपांतर पुढे द्रविड कळघममध्ये होऊन आताचे द्रमुक आणि अद्रमुक उदयास आले). पेरियार यांनी ते नास्तिक असल्याचे म्हटले. मात्र, प्रत्यक्षात ते हिंदूविरोधी असल्याचे दिसते. आपल्या देशात जातीचा नाश होणे म्हणजे देव, धर्म, धर्मग्रंथ आणि ब्राह्मणांचा (ब्राह्मणवाद) नाश होय, असे पेरियार यांचे मत होते.
 
त्याचप्रमाणे, रामायणासह हिंदू देव-देवतांवरही ते अश्लाघ्य टीका करत असत. त्यांच्या या समाजविघातक कृत्यांमुळे १९५७ सालामध्ये, तिरुचीपल्ली येथील विशेष दलाच्या निरीक्षकाने पेरियार विरुद्ध एफआयआर दाखल केला. या एफआयआरमध्ये ‘आयपीसी’चे ‘कलम ११७’ (दहापेक्षा जास्त व्यक्तींच्या गटाला गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे) लावण्यात आले होते. त्यावेळी पेरियार ७८ वर्षांचे होते. कल्पना करा, या वयातही त्यांच्यात इतके विष भरले होते की, त्यांनी ब्राह्मणांचा नरसंहार करण्यासाठी चिथावणी दिली होती.
 
तामिळनाडूमध्ये प्रामुख्याने करुणानिधींच्या द्रमुक पक्षाने याच पेरियारवादाला मुक्त वाव दिल्याचे स्पष्ट दिसते. राजाश्रयामुळे पेरियारवाद्यांची मजल एवढी वाढली होती की, हिंदूंच्या मंदिरांबाहेर पेरियारच्या मूर्ती स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यातील बहुसंख्य मूर्ती आजही कायम आहेत. द्रमुकचे सध्याचे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांचे पुत्र उदयनिधी हे सध्या हिंदूविरोधी विधानांमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या या हिंदूद्वेषाचे मूळ हे पेरियारच्या हिंदूविरोधी विचारांमध्ये आहे. तामिळनाडूमध्येही आजही द्रविडी विचारसरणी जिवंत असणे, सातत्याने देशविरोधी विचार प्रसारित होण्यामागेदेखील पेरियारचे विचारच असल्याचे स्पष्ट होते. अर्थात, या पेरियारवादास आता आव्हान देणारे नेतेही उभे राहिले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी या पेरियारवादास थेट शिंगावर घेण्याचे धोरण स्वीकारले आहे.
 
एकीकडे हिंदूविरोध आणि दुसरीकडे जिहादी मानसिकता, चर्चला पायघड्या घालणे म्हणजेच ‘पेरियारवाद’ असल्याचे दिसून येते. तामिळनाडू हे एकप्रकारे हिंदूविरोधाचे प्रमुख केंद्र बनले आहे का, अशी शंका निर्माण होते. अर्थात, हे केवळ तामिळनाडूमध्येच घडते असे नाही. महाराष्ट्रातही ब्रिगेडने अशाच प्रकारची देशविघातक विचारसरणी जन्मास घालून त्याचे पालनपोषण सुरू केले आहेच. त्यामुळे, मराठी असो की द्रविडी, ब्रिगेडी विचारसरणीस समाजाने विरोध करत राहणे हेच देशहिताचे आहे.