पुणे : पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून परवानगी मिळाली आहे. या विमानतळाचे नाव बदलून ‘संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे’ असे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे विमानतळ पुण्यातील लोहगाव येथे आहे. त्यामुळे या विमानतळाला ‘लोहगाव विमानतळ’ म्हणून सुद्धा ओळखले जाते. संत तुकारामांचे बालपण सुद्धा लोहगावातच गेले. त्यामुळे लोहगाव आणि संत तुकाराम यांचे खास नाते आहे. शिवाय संत तुकाराम यांचे वारकरी साहित्यात आणि मराठी भाषेच्या प्रवासात मोठे योगदान आहे. मराठी साहित्यात तुकारामांच्या अभंग–गाथेने अढळ स्थान मिळविले आहे. आज इतकी दशके उलटून गेल्यानंतरही संत तुकाराम यांचे साहित्य महाराष्ट्राला मार्गदर्शक ठरते. या विमानतळाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून मंजूर झाला असून तो केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे आणि केंद्र सरकार त्यावर निर्णय घेणार आहे.