भात खाचरातून उगवलेला तारा!

    23-Sep-2024   
Total Views |
 
rice farming
 
प्रत्येक संघर्षाला प्रेरणा समजून परिस्थितीवर यशस्वी मात करणारे आणि गावासोबतच समाजासाठीही कार्य करणारे रोहिंजण गावचे रविंद्र पाटील. त्यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...
 
ऐंशीचे दशक पनवेलच्या रोहिंजण गावच्या काशीबाईंच्या यजमानांचे, पांडुरंग पाटील यांचे निधन झाले. घरची गरिबी. दोन एकरांत भात पिकवायचा. काही विकायचा आणि उरलेला भात वर्षभर स्वयंपाकासाठी वापरायचा. यावर्षीही भाताची कापणी केली. कापणी केलेला भात हारीने रचून ठेवला गेला. वर्षभर त्यावरच गुजराण होणार होती. पण, अचानक कापलेल्या भाताला आग लागली. भाताला आग लागली म्हणत, एकच कल्लोळ उठला. आग विझवली गेली. तरीही मोठ्या प्रमाणात भात जळून गेला होता. वर्षभर पाटील कुटुंबाला म्हणजे काशीबाई आणि त्यांच्या सहा मुलांना तो जळालेला तांदूळ खावा लागला. पर्यायच नव्हता. काशीबाईंचा लहान लेक रविंद्र यांना जळक्या तांदळाची पेज, भात खाताना घास घशात अडकत असे. लेकराची ही स्थिती पाहून बयेच्या म्हणजे रविंद्रच्या आईच्या डोळ्यात आसवे उभी राहायची. त्याचवेळी जेमतेम ११-१२ वर्षांचा असलेल्या रविंद्रने ठरवले की, ही परिस्थिती पालटायलाच हवी. आज तेच रविंद्र पांडुरंग पाटील हे पनवेल तालुका ’सहकारी भात गिरणी’चे चेअरमन आहेत. ’नामदेवबुवा कुटारेकर स्कूल’ तळोजाचे चेअरमन आहेत. खासगी कंपनीत मॅनेजर आहेत आणि हो, रोहिंजण गावचे माजी सरपंचही आहेत. तसेच, ’स्वराज्य सामाजिक संस्थे’चे सह खजिनदार आणि उत्कृष्ट मित्रमंडळाचे अध्यक्ष आहेत.
 
भाताला लागलेली आग रविंद्र यांच्या आयुष्यात महत्त्वाकांक्षेचे बीज रोवून गेली. मात्र, हा सगळा संघर्ष प्रवास सोपा नव्हताच. कारण, गरिबाघरी स्वप्न पाहणे जरी फुकटात असले तरीसुद्धा, त्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी मोठा संघर्ष अटळच असतो. रविंद्र पाटील यांनीही तो संघर्ष केला.
 
आगरी समाजाचे पाटील कुटुंब हे मुळचे पनवेलच्या रोहिंजण गावचेच. पांडुरंग आणि काशीबाई पाटील हे अत्यंत धार्मिक दाम्पत्य. कष्ट करावे, हरीनाम गावे, यात सुख मानणारे. उभयतांना सहा अपत्ये. त्यांपैकी एक रविंद्र. पांडुरंग यांची थोडीशी शेतजमीन होती. त्यात ते भात पिकवत, उन्हाळ्यात भाजीपाला पिकवत. काशीबाई पिकवलेली भाजी मुंबई उपनगरात नेऊन विकत. या अशा कष्टाच्या काळातही पांडुरंग हे धर्मकर्म जपत. घरी नवसाचा गणपती असे. मात्र, गावात ’एक गाव, एक गणपती’ प्रथा होती. पण, पांडुरंग यांची समाजशीलता आणि देवाधर्माची निष्ठा पाहून गावातल्या मानाच्या गणपतीसोबत पाटील कुटुंबाच्या घरच्या गणपतीची स्थापना करण्याची परवानगी गाववाल्यांनी दिली. दहा दिवस पांडुरंग आणि रविंद्र गणेश मंडपातच असत. देवाची आणि दर्शनाला येणार्‍या गाववाल्यांची सेवा करत. बाबाला असलेला गावातला मान पाहून रविंद्र यांनाही वाटे की, आपणही गावासाठी असेच सेवाकार्य केले पाहिजे. पांडुरंग रविंद्र यांना सांगत ”बाला शिक, मोटा हो. गावचं समाजाचं पांग फेड.” पण, दुर्दैव असे की, रविंद्र इयत्ता आठवीत शिकत असतानाच पांडुरंग यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. पाटील कुटुंबाच्या कष्टाला आता पारावर राहिला नाही. काशीबाई अपार कष्ट करत लेकरांना दोन वेळचे अन्न मिळेल, शिकायला मिळेल याची तजवीज करत. या सगळ्या काळात रविंद्र यांच्या मामांनी म्हणजे मुकुंद म्हात्रे यांनी खूप सहकार्य केले.दिवस असेच जात होते. ती घटना घडली.
 
रविंद्र यांच्या मामाचे लग्न होते. १२-१३ वर्षांच्या रविंद्र यांना मामाच्या लग्नात नवीन कपडे हवे होते. दररोजपेक्षा जास्त भाजीच्या खेपा महिनाभर विकत आईने पेसे उभे केले आणि मोठ्या दुकानातून रविंद्र यांना कपडे आणले. कपडे पाहून रविंद्र यांना आनंद झाला. पहिल्यांदाच नवे कोरे कपडे हातात घेतले. ते कपडे घालून बघितले. मन भरले नाही. पण, लक्षात आले कपडे तर मामाच्या लग्नाला घालायचेत. त्यांनी कपडे काढून ठेवले, पण, ते मळले होते. त्यामुळे ते कपडे धुतले. दुसर्‍या दिवशी मामाचे लग्न होते, पण कपडे सुकलेच नाही. तसेच कपडे घालताना पॅन्टीची चेन तुटली. आता काय करणार? ओले कपडे आणि चेन नसलेली पॅन्ट घालून पूर्ण विवाह सोहळ्यात रविंद्र सगळ्यांची नजर चुकवत राहिले. ही परिस्थिती कष्ट केल्याशिवाय पालटणार नाही, असा विचार केला. त्यामुळे मजूरी स्वरूपात भाजीच्या वाफ्यांना ५० वेळा कावडीने पाणी देऊन, कधी हेल्परचे काम करून, कधी मजुरी करून, रविंद्र यांनी शिक्षण पूर्ण केले.
 
गावच्या साध्या साध्या समस्या होत्या. पण, त्या सोडवण्यासाठी कुणी पुढाकार घेत नसे. त्यामुळे मग रविंद्र यांनी समविचारी मित्रांच्या मदतीने ’उत्कर्ष मंडळ स्थापन’ केले. राजकीय पक्षाच्या मदतीने गावाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. यानिमित्ताने त्यांचा संपर्क शेतकरी कामगार पक्षाशी आला. हे सगळे करत असताना ते, एका कंपनीत ‘हेल्पर’ म्हणून कामाला होते. मात्र, कामातली सचोटी आणि निष्ठा पाहून त्यांना ‘स्टोरकिपर’ म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पुढे काम करता करता त्यांनी ‘मटेरीयल मॅनेजमेंट’चे शिक्षण पूर्ण केले. ज्या कंपनीत ‘हेल्पर’ म्हणून नोकरी करत होते तिथेच, मॅनेजर म्हणून काम करू लागले.हा सगळा संघर्ष करताना त्यांना देवधर्माचे कधीही विस्मरण झाले नाही. राम मंदिर निधी संकलन असू दे की, राम लल्लांचे अक्षता वाटप करणे असू दे, रविंद्र पंचक्रोशीत सगळ्यात पुढेच असतात. पनवेलच्या कुशीत असलेल्या गावांमध्ये सध्या ‘लॅण्ड जिहाद’, ‘लव्ह जिहाद’च्या घटना घडताना दिसत आहेत. रविंद्र या विरोधात भूमिपुत्रासाठी संघर्ष करत असतात. ’समाजधर्मापुढे काही असूच शकत नाही,’ असे ते म्हणतात. रविंद्र पाटील यांचे विचारकार्य प्रेरणादायी आहे.
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.