कासवांच्या तस्करीवर कारवाई

    23-Sep-2024   
Total Views |
 
 
Trafficking turtles
 
आग्नेय आशियातील सर्वात मोठ्या कासवांच्या तस्करी सिंडिकेटमधील ’निंजा टर्टल गँग’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या तस्करांचे धक्कादायक संबंध भारतीय तपास यंत्रणांनी उघडकीस आणले आहेत. हा शोध मलेशियन अधिकार्‍यांनी गेल्या महिन्यात वन्यजीव तस्करीवर केलेल्या कारवाईतून लागला. या कारवाईत अनेक टोळी सदस्यांना अटक करण्यात आली,
 
आग्नेय आशियातील सर्वात मोठ्या कासवांच्या तस्करी सिंडिकेटमधील ’निंजा टर्टल गँग’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या तस्करांचे धक्कादायक संबंध भारतीय तपास यंत्रणांनी उघडकीस आणले आहेत. हा शोध मलेशियन अधिकार्‍यांनी गेल्या महिन्यात वन्यजीव तस्करीवर केलेल्या कारवाईतून लागला. या कारवाईत अनेक टोळी सदस्यांना अटक करण्यात आली, ज्यामुळे मलेशिया आणि थायलंडसारख्या आग्नेय आशियाई देशांमध्ये वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भारतातील कासव आणि इतर सरपटणार्‍या प्राण्यांच्या अवैध व्यापाराबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे. ’वाइल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो’(WCCB)ने ही धोक्याची घंटा वाजवली आणि आता सीमाशुल्क, रेल्वे संरक्षण दल (RPF), सरकारी रेल्वे पोलीस (GRP) आणि वन विभागांना सतर्क करण्यात आले आहे. गेल्या महिनाभरात अधिकार्‍यांनी पाच वेगवेगळ्या घटनांमध्ये तामिळनाडूमध्ये जवळपास दोन हजार स्टार कासव आणि इतर प्रजातींच्या कासवांची तस्करी थांबवली आहे. हे प्राणी मलेशियामध्ये तस्करीसाठी आण्यात आले होते. या घटनांपैकी तीन प्रकरणांमध्ये चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सतर्क कस्टम अधिकार्‍यांनी तस्करीचे प्रयत्न यशस्वीपणे हाणून पाडले. इतर दोन घटनांमध्ये चेन्नईच्या कोलाथूर परिसरातील एका घरातून आणि तामिळनाडूमधील पुदुक्कोट्टई येथील बस स्थानकातून या कासवांची प्राण्यांची सुटका करण्यात आली.
 
तस्करीच्या वाढीमुळे भारतीय अधिकार्‍यांना सुरक्षा उपाय कडक करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ’निंजा टर्टल गँग’ ही कोणतीही सामान्य गुन्हेगारी टोळी नाही. आग्नेय आशियातील अत्यंत किफायतशीर विदेशी पाळीव प्राण्यांच्या बाजारपेठेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका यांसारख्या देशांतून सरपटणार्‍या प्राण्यांची तस्करी करणारे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी वर्तुळ आहे. हे नेटवर्क मोठ्या प्रमाणावर पसरलेला आहे, ज्यामुळे कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींना ते रोखणे कठीण होते.
 
तथापि, जुलै २०२४ मध्ये मलेशियन अधिकार्‍यांनी केलेल्या छाप्यामुळे सिंडिकेटला मोठा धक्का बसला आहे. या टोळीतील सहा सदस्यांना अटक करण्यात आली. त्यात, चार मलेशियन आणि दोन कंबोडियन नागरिकांचा समावेश होता आणि मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथील एका घरातून २०० कासवांची सुटका करण्यात आली. बरेच लोक तारेतील कासवांना पाळीव प्राणी म्हणून पाळतात, तर काही जण त्यांच्या कथित औषधी गुणधर्मांसाठी त्यांचे सेवन करतात. इतर प्रजातींमध्ये ‘ट्रायकेरिनेट हिल टर्टल’, ‘ब्राह्मणी रिव्हर टर्टल’ आणि ‘ब्लॅक पॉन्ड टेरापिन’ यांचा समावेश आहे.
 
सरपटणार्‍या प्राण्यांचा अवैध व्यापार अत्यंत पद्धतशीरपणे केला जातो. कासवांची तयारी झाल्यानंतर त्यांना बसेस किंवा ट्रेनमधून आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या शहरांमध्ये नेले जाते. तस्कर स्लीपर क्लास किंवा अनारक्षित ट्रेनच्या डब्यांचा वापर करतात, ज्यामुळे ते इतर प्रवाशांमध्ये सहज मिसळून जातात. कासवांना न दिसणार्‍या पिशव्या किंवा सुटकेसमध्ये लपवले जाते. शहरात पोहोचल्यावर, कासवांना सुरक्षित घरांमध्ये ठेवले जाते. अशाच एका ठिकाणी ११ ऑगस्ट रोजी कोलाथूर येथे छापेमारी करण्यात आली. तिथे प्राण्यांना सुटकेसमध्ये पॅक केले जात होते. या सुटकेस नंतर प्रशिक्षित कुरियरकडे पाठवल्या जातात. जे त्यांना मलेशिया किंवा इतर देशांमध्ये घेऊन जातात. भारतीय स्टार कासवांची तस्करी ही वन्यजीव तस्करीतील एक गंभीर समस्या. तस्करीच्या वाढत्या प्रमाणामुळे या प्रजातींच्या जीवाला धोका वाढला आहे. विशेषत: पाळीव प्राण्यांची मागणी आणि पारंपरिक औषधांमुळे सरपटणार्‍या प्राण्यांचे शोषण होऊ लागले आहे. त्याचा परिणाम म्हणून अनेक प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.
 
भारतीय अधिकार्‍यांनी तस्करीचे पुढील प्रयत्न रोखण्यासाठी आपले प्रयत्न वाढवले आहेत. ’WCCB’ने विशेषत: नैऋत्य पावसाळ्यात तस्करीचा धोका जास्त असल्याने विमानतळावरील सीमाशुल्क अधिकार्‍यांना अधिक सतर्क राहण्यास सांगितले आहे. तसेच, ‘आरपीएफ’, ‘जीआरपी’ आणि वन अधिकार्‍यांना रेल्वे आणि बसमध्ये कोणतीही संशयास्पद हालचाल शोधण्यासाठी सतर्क ठेवले आहे. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे, जागरूकता वाढवणे, आणि विमानतळावर कडक तपासणी करणे, हे आवश्यक. तस्करीचे अनेक प्रयत्न थांबवण्यात यश मिळाले असले तरी, तस्करांचे आव्हान कायम आहे.
 

उमंग काळे

पर्यावरण प्रतिनिधी, वन्यजीव छायाचित्रकार.
 
जंगलात फिरून विविध जीव कॅमेरात कैद करण्याची आवड, मध्य भारतातील बहुतांश जंगलात फिरण्याचा अनुभव. रामनारायण रुईया महाविद्यालयातून 'बी. एम. एम.' पदवी प्राप्त करून पर्यटन शास्त्रात पदव्युतर शिक्षण. आणि नाविन्याचा ध्यास.