मुंबई, दि. १९ : (Nitesh Rane)“इस्लामिक कट्टरपंथींना आजच आवर घातला नाही, तर येत्या काळात हिंदूंचे सणही आपण सुखाने साजरे करू शकणार नाही. त्यामुळे अशा दगडफेक करणार्यांना, हिंदू सणांना गालबोट लावणार्यांना वेळीच ठेचावे लागेल,” असे प्रतिपादन भाजप आ. नितेश राणे यांनी केले. गुरुवार, दि. १९ सप्टेंबर रोजी तहसिलदार कार्यालय, ३२ शिराळ, सांगली येथे ‘सकल हिंदू समाजा’च्यावतीने हिंदू जनआक्रोष मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
‘सर्व धर्म समभाव’बाबत उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की, “फक्त हिंदूंनीच सहन करावे अशा पद्धतीचे वातावरण आज तयार झाले आहे. सर्व धर्म समभाव फक्त हिंदूंनीच पाळायचा का? देशात सर्व धर्म समभाव टिकवण्याचे काम फक्त हिंदूंनीच करायचे का? जे कायदे हिंदू धर्म पाळतो ते इतर धर्मीयांनाही पाळावेच लागतील. आता सर्व धर्म समभाव वगैरे नंतर, आधी हिंदूंच्या हितालाच प्राधान्य दिले जाईल,” असा इशाराच नितेश राणे यांनी दिला. आ. राणे पुढे म्हणाले, “देशात ११ ठिकाणी गणेश विसर्जनाच्या मिरवणुकींवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. राष्ट्रभक्त मुसलमान आमचे बांधव आहेत, हे आम्ही अभिमानाने सांगतो. विसर्जनाच्या मिरवणुकीवर इस्लामिक कट्टरपंथींनी केलेली दगडफेक त्यांनातरी पटली का? विसर्जन मिरवणुकीवरील हल्ले थांबले नाहीत, तर राज्यात ईदची मिरवणूक काढू देणार नाही,” असा इशाराच त्यांनी दिला. “हिरव्या जिहाद्यांची वळवळ छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राच चालू देणार नाही,” असे ठणकावताना त्यांनी हिंदू देव-देवता आणि स्वामी समर्थांचा अवमान करणार्या ज्ञानेश महाराव यांचा तिखट शब्दांत समाचार घेतला. तसेच महंत रामगिरी महारांजांविरोधात आवाज उठवणार्यांनाही खडेबोल सुनावले.