मोहम्मद बिन सलमान, न्योम आणि मी

Total Views |
 
 Mohammed Bin Salman
 
‘एमबीएस’ हा ‘दूध का धुला हुवा’ आहे, असा माझा गैरसमज अजिबात नाही. पण, त्याने जो प्रकल्प हाती घेतला आहे,
तो जवळपास अशक्यप्राय आहे.
 
गेल्या आठवड्याच्या ’विश्वसंचार’ स्तंभामध्ये मी सौदी अरेबियाच्या तांबडा समुद्र किनारपट्टीवरील न्योम या होऊ घातलेल्या अवाढव्य बंदर प्रकल्पाची माहिती दिली होती. तब्बल २६ हजार, ५०० चौ. कि. मी. परिसरात हे बंदर आणि पर्यटनस्थळ उभे राहात आहे. सौदी अरेबियाचा युवराज मोहम्मद बिन सलमान किंवा अमेरिकन भाषेत ‘एमबीएस’ याच्या डोक्यातून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा उगम झालेला आहे. याच्या डोळ्यांसमोर दुबईच्या पर्यटन व्यवसायाचा आदर्श आहे. लेखाच्या अखेरीस, आपण मोहम्मद बिन सलमानला शुभेच्छा देऊया, असे मी म्हटले होते.
 
नेहमीपेक्षा बर्‍याच जास्त प्रमाणात वाचकांनी माझ्याकडे याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काही नेहमी भेटणार्‍यांनी प्रत्यक्ष, तर काहींनी दूरध्वनीवरून, तर आणखी काहींनी व्हॉटसअ‍ॅपवरून. सगळ्यांच्या प्रतिक्रियांचा गोळाबेरीज आशय हा की, आपण मोहम्मद बिन सलमानला शुभेच्छा का द्याव्यात? तो साधा माणूस नाहीये. टीका करणारा पत्रकार जमाल खाशोगी याला प्रथम सौदी अरेबियातून पळून जावे लागले आणि नंतर इस्तंबूलच्या सौदी वकिलातीत त्याचा खून झाला. याचा वहीम अर्थातच ‘एमबीएस’वर आहे. जगद्विख्यात कलावंत लिओनार्दो-द-विंची याचे ’साल्वातोर मुंडी’ या नावाचे येशू ख्रिस्ताचे पेंटिंग या ‘एमबीएस’ने तब्बल ४५ कोटी डॉलर्सना विकत घेतले. म्हणजेच ‘एमबीएस’ हा जगभरच्या सर्व हुकुमशहांप्रमाणेच अनिर्बंध सत्ताधीश आहे. तेव्हा आपण त्याला कशाला शुभेच्छा द्यायच्या?
 
मी ज्या आस्थापनात नोकरी करत होतो, तिथली एक विशिष्ट परिभाषा होती. कार्यालयीन सहकारी मित्रांच्या, लंचमध्ये किंवा चहा पिताना ज्या गावगप्पा चालतात, त्यात एखादा मित्र एखाद्या राजकीय किंवा तत्सम नेत्याची जरा जादाच तरफदारी करायला लागला की, ऐकणार्‍यांतला एखादा बोलायचा, ’माल पोहोचलेला दिसतोय.’ म्हणजे त्या नेत्याकडून तुला काहीतरी मिळालेले दिसतेय. या जुन्या अड्ड्यातल्या एका मित्राने माझी फिरकी घेत सरळच प्रश्न केला, ’माल पोहोचलेला दिसतोय. पण, रियालमध्ये (सौदी चलन) की डॉलर्समध्ये?’
 
तर, प्रिय वाचक, हल्ली एखाद्या माणसाचा निरोप घेताना, ’टेक केअर, ऑल द बेस्ट’ असे म्हणण्याची फॅशन बोकाळत आहे. यात ना त्या माणसाबद्दल खरी काळजी असते, ना खर्‍या शुभेच्छा असतात, फक्त औपचारिकता असते. अगदी तशाच शुभेच्छा मी त्या ‘एमबीएस’ला दिल्या होत्या. ‘एमबीएस’ हा ’दूध का धुला हुवा’ आहे, असा माझा गैरसमज अजिबात नाही. पण, त्याने जो प्रकल्प हाती घेतला आहे, तो जवळपास अशक्यप्राय आहे. त्याच्या डोळ्यांपुढे दुबईचा आदर्श आहे. दुबई हा प्रदेश वाळवंटीय आहे, पण तो समुद्रसपाटीला आहे. तर प्रस्तावित न्योम बंदर समुद्रसपाटीपासून पाच हजार फूट उंचावर आहे आणि नफूद वाळवंट हे सौदीमधील अत्यंत भीषण वाळवंट न्योमच्या पाठीमागेच आहे. इतक्या भयंकर उष्म्यामध्ये माणसांना काम करता यावे, यासाठी अखंड ए.सी. प्लांटस् चालवायला हवेत. त्यासाठी विजेचा अखंड पुरवठा हवा. रेल्वे, रस्ते, विमानतळ यांची बांधकामे त्या भाजून काढणार्‍या उन्हात किती वर्षे टिकाव धरू शकतील? बरे, विज्ञान-तंत्रज्ञान, अफाट पैसा आणि प्रबळ राजकीय इच्छाशक्ती यांच्या जोरावर बंदर उभे राहीलही कदाचित, पण पर्यटनस्थळाचे काय? पर्यटन सुविधा म्हणजे जुगार, दारू आणि बाया आल्याच. सौदी राजघराण्यावर ज्या कडव्या सुन्नी वहाबी पंथाचा प्रभाव आहे, ते वहाबी मुल्ला-मौलवी या बाबतीत टोकाचे कर्मठ आहेत. ते ‘एमबीएस’ला असले धर्मबुडवे चाळे करू देतील? आता या सगळ्या अडचणी ओलांडून ‘एमबीएस’ने आपला प्रकल्प रेटलाच, तर मला वाटते, आपण आपल्या देशाचा स्वार्थ का पाहू नये? राजकीयदृष्ट्या सौदी हा भारताचा मित्र देश आहे. यामुळे न्योम बंदर उभारणीतली मिळतील ती कंत्राटे लोकांनी अवश्य आपल्या पदरात पाडून घ्यावीत. ‘एमबीएस’ला शुभेच्छा देण्यामागे एवढाच हेतू होता.
यावरून एक वात्रट किस्सा आठवला. आपल्याकडे एक मंत्री होते (अर्थातच काँग्रेसचे). कुणीही त्यांच्याकडे कसलेही काम घेऊन गेला की, त्यांचे उत्तर ठरलेले असायचे- ’तुमचा उपक्रम स्तुत्य आहे. आगे बढो. शासन तुमच्या पाठीशी आहे.’ नंतर या उत्तराचा इतका अतिरेक झाला की, एका विख्यात विनोदी पत्रकाराने लिहिले, ’काल मंत्रिमहोदय नेहमीप्रमाणे सकाळी ठीक 6 वाजता पहिल्या चहासाठी टेबलाशी येऊन बसले. यांच्या पत्नी यांना म्हणाल्या, घाईची लागल्येय. पटकन जाऊन येते आणि मग चहा देते. विचारांच्या तंद्रीत असलेले मंत्रिमहोदय उत्तरले, ’उपक्रम स्तुत्य आहे. शासन तुमच्या पाठीशी आहे.’ किस्सा ऐेकीव असल्यामुळे मी कुणाचीच नावे दिलेली नाहीत. पण, जाणते वाचक योग्य त्या डोक्यांवर योग्य त्या टोप्या ‘फिट्ट’ बसवतीलच!
 
लाल गव्हाचे मोदक
 
‘तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता, अवघ्या दीनांच्या नाथा, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा’ हे परेश शहा यांनी लिहिलेले आणि संगीत दिलेले नि प्रल्हाद शिंदे यांनी गायलेले गाणे गेली ५० वर्षे सर्वत्र लोकप्रिय आहे. याच्या एका कडव्याचे शब्द आहेत- ’नाव काढू नको तांदुळाचे, केले मोदक लाल गव्हाचे, हाल ओळख सार्‍या घराचे, दिन येतील का रे सुखाचे, सेवा जाणुनि गोड मानून, द्यावा आशीर्वाद आता, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा.’  यातल्या ’केले मोदक लाल गव्हाचे’ या ओळीला एका भीषण अस्मानी संकटाचा संदर्भ आहे. तो सांगणारी एक व्हिडिओ क्लिप सध्या समाजमाध्यमावर फिरत आहे.
 
एक बाप आपल्या मुलाला सांगतोय की, १९७२ साली अत्यंत भीषण दुष्काळ पडला होता. तांदळाच्या उकडीचे मोदक बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवायचे, तर तांदूळ मिळतच नव्हते. अमेरिकेच्या मेहेरबानीने लाल रंगाचा निकृष्ट प्रतीचा गहू लोकांना पुरवण्यात येत होता. म्हणून कवी बाप्पाला तळमवून सांगतोय की, ‘हाल ओळख सार्‍या घराचे.’
 
आज ते १९७२ साल आठवताना माझ्या डोळ्यांसमोर काही कमालीची विरोधी आणि कमालीची चटका लावणारी चित्रे येतात. मे १९७१ मध्ये अजित वाडेकरचा भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीजमध्ये कसोटी मालिका जिंकून परतला. पाठोपाठ ऑगस्ट १९७१ मध्ये त्याच संघाने इंग्लंडला यांच्याच भूमीत नमवून मालिका जिंकली. अजित वाडेकर, सुनील गावस्कर, एकनाथ सोलकर, गुंडाप्पा विश्वनाथ, चंद्रा-बेदी-प्रसन्ना यांच्याखेरीज लोकांच्या तोंडी दुसरी नावेच नव्हती. लगेच डिसेंबर १९७१ मध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानचा सणसणीत पराभव करून बांगलादेश स्वतंत्र केला होता. लोकांच्या तोंडी वरील क्रिकेटपटूंप्रमाणेच इंदिरा गांधी, शेख मुजिबूर रेहमान, जनरल सॅम माणेकशाँ यांची नावे खेळू लागली. विजयाच्या या एक प्रकारच्या धुंदीतच १९७२ साल उजाडले होते. आता लोकांचे लक्ष सिमला कराराकडे लागले होते. अखेर एकदाचा तो करार जुलै १९७२ मध्ये झाला. युद्ध डिसेंबरमध्ये १९७१ मध्ये संपले, मग करार व्हायला पुढे सात महिने का लागावेत, ही बाब लोकांच्या खिजगणतीतही नव्हती. दि. २ ऑक्टोबर १९७२ या दिवशी मुंबईत दूरदर्शन केंद्र सुरू झाले. पाठोपाठ घोषणा झाली की, इंग्लंडचा क्रिकेट संघ डिसेंबर १९७२ ते फेब्रुवारी १९७३ या कालखंडात भारतात येत असून, मुंबईतल्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन करणार आहे. लोकांना वेडे व्हायला नवीन निमित्त मिळाले. शिवाय, हिंदी चित्रपट हे जुने वेड होतेच. राजेश खन्नाचे ‘अमर प्रेम’, ‘अपना देश’, धर्मेंद्र-हेमा मालिनीचे ‘राजा जानी’, ‘सीता और गीता’, अशोक कुमार-प्राणचा ‘व्हिक्टोरिया नंबर २०३’, मीना कुमारीचा ‘पाकीझा’ असे चित्रपट कचाकच लागत होते आणि पतंगाने दिव्यावर झडप घालावी, तसे लोक यांच्यावर तुटून पडत होते.
 
निदान मुंबईत तरी असा सगळा जल्लोष चाललेला असताना निसर्गाने मात्र डोळे वटारले होते. जून ते सप्टेंबर १९७२ या पावसाळी मोसमात महाराष्ट्रात अत्यंत कमी पाऊस झाला. विशेषतः प्रवरा खोरे आणि गोदावरी खोरे म्हणजे नगर जिल्ह्यापासून पुढचा संपूर्ण मराठवाडा विभाग यांत पाण्याचा एक थेंबसुद्धा पडला नाही. इंग्रजांच्या काळात महाराष्ट्रात जे भीषण दुष्काळ पडत असत, त्यांचीच आठवण करून देणारा हा दुष्काळ होता. माणसे आणि गुरेढोरे यांना अन्न, चारा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे पाणी कसे उपलब्ध करून द्यावे, हा मोठाच प्रश्न होता. शासकीय यंत्रणा आपल्यापरीने कामाला लागली होती. पण, ती नेहमीप्रमाणेच अपुरी पडत होती.
अशा वेळी तत्कालीन सरसंघचालक पूजनीय गोळवलकर गुरुजी यांच्या आदेशाने रा. स्व. संघाची यंत्रणा पूर्ण भराने कार्यरत झाली. ’जनकल्याण समिती’ या नावाने एक स्वतंत्र यंत्रणा उभी राहिली. शासनाने दुष्काळपीडितांसाठी आखलेली ’रोजगार हमी योजना’ लोकांपर्यंत पोहोचवणे आणि शिवाय स्वतंत्रपणेही विविध कार्यांद्वारे दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याचे प्रचंड कार्य ‘जनकल्याण समिती’ने कसल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केले.
 
विशेष म्हणजे, ज्या पूजनीय गुरूजींच्या योजनेनुसार हे सर्व काम झाले, ते स्वतः यावेळेस कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाशी झुंज देत होते. एक दिवस माझ्या वडिलांकडे त्यांचे दोघे मित्र नेहमीसारखे गप्पा मारायला आले होते. प्रथम इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या. मग अचानक एका काकांनी माझ्या वडिलांचे दोन्ही हात धरले आणि अक्षरशः आक्रंदणार्‍या आवाजात ते उद्गारले, ’दादा, आपले गुरुजी चालले हो!’ हे बोलत असताना त्या दोन्ही काकांचे चेहरे विदीर्ण झाले होते. ते दोघेही टाटा हॉस्पिटलमध्ये गुरुजींच्या समाचाराला जाऊन आले होते. ते ऐकल्यावर माझ्या वडिलांचीही तीच स्थिती झाली होती. पण, वडीलकीच्या नात्याने यांनी स्वतःला आणि या दोघांनाही सावरले. पुढे दि. ५ जून १९७३ रोजी गुरुजी गेलेच. आज ५० वर्षांनंतर महाराष्ट्राला यातले काय माहीत आहे? काहीही नाही.
 

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.