कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचे नातू राजाभाऊ गायकवाड हे, संविधानाच्या शक्तीने अभिभूत झालेल्या समरस समाजासाठी कार्य करतात. त्यांच्या विचारकर्तृत्वाचा घेतलेला हा मागोवा...
तथागत गौतम बुद्धांच्या विचारांप्रमाणे कोणाचे वाईट होईल असे कृत्यच नव्हे तर ,कोणाचे मन दुखेल असे बोलणेही टाळावे, ते पाप आहे. माझ्यामते ही समरसता आहे. या समरसतेच्या विचारांसाठी मी काम करतो,” असे राजेंद्र गायकवाड ऊर्फ राजाभाऊ यांचे म्हणणे. राजाभाऊ सध्या महाराष्ट्रभर सुरू असलेल्या ‘संविधान जागर यात्रे’चे समन्वयक आहेत. संविधान बदलणार असून मनूचे राज्य येणार, हुकूमशाही येणार असा प्रचार काँग्रेस, उबाठा आणि शरद पवार गटाने लोकसभेच्या निवडणुकीत केला होता. त्यामुळे खरेच संविधान इतके तकलादू आहे का? याबद्दल राजाभाऊंच्याच मनात प्रश्न निर्माण झाले. त्यामुळे समविचारी सामाजिक कार्यकर्त्यांसोबत मिळून, सध्या ते ‘संविधान जागर यात्रे’त समाजसंवाद साधत आहेत. राजाभाऊ हे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, गावचे माजी पोलीस पाटील, आंंबे दिंडेारी विहित कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये, सलग एक दशक बिनविरोध निवडून आलेले, माजी संचालक आहेत. त्यांनी किसान नागरी सहकारी पंतसंस्थेचे अध्यक्षपद भूषवले असून, ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड विचारमंचाचे संस्थापक सचिव आहेत.
राजाभाऊ हे मुळचे नाशिकमधल्या आंबे दिंडोरी गावचे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे राजाभाऊंचे चुलत आजोबा. गायकवाड कुटुंब हे एकाच छताखाली राहायचे. सगळेजण एकत्र गुण्यागोविंदाने राहायचे, राजाभाऊ यांचे वडील दामोदर हे शेती करायचे, तर आई सोनूबाई या गृहिणी होत्या. 1966 साली जन्मलेल्या राजाभाऊंच्या मातोश्री धार्मिक वृत्तीच्या. देवळासमोरून जाताना ती राजाभाऊंना म्हणे, “राजा, देवाकडे विद्याधन माग.” तर त्यांचे बाबा दामोदर म्हणत, “राजा, विद्याधनापेक्षा चांगला माणूस व्हायचे, हेच तू देवाकडे माग.” त्यामुळे मोठेपणी आपल्याला चांगला माणूस व्हायचे आहे हे, राजाभाऊंच्या मनात लहाणपणापासून रूजले. एकदा दामेादर यांनी राजाभाऊंना दादासाहेबांची आठवण सांगितली. दादासाहेबांनी कंत्राटाच्या सर्व अटी पूर्ण करणार्या, समाजातील दोन गुणवान तरुणांना कंत्राट मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले. हे समजल्यावर एक नातेवाईक दादासाहेबांना म्हणाला, “मी तुमचा नातेवाईक असताना, तुम्ही त्या दोन व्यक्तींना का बरं मदत केली? मला का कंत्राट मिळवून दिले नाही?” यावर दादासाहेब म्हणाले, “बरं झालं तू मला सांगितलेस की, तू माझा नातेवाईक आहेस. मला तर वाटले की, सगळा समाजच माझा आहे. अरे, जोपर्यंत आपणच समाज म्हणून एकमेकांना स्वार्थविरहित सहकार्य करत नाही, तोपर्यंत समाजाची प्रगती कशी होणार? बाबासाहेबांचे स्वप्न कसे पूर्ण होणार?”
अशा संस्कारांत राजाभाऊंचे बालपण समृद्ध होत होते. त्यांनी वाणिज्य शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असताना, त्यांचा संपर्क नाशिकच्या बाजारपेठेशी झाला. त्यांना बाजारपेठेचे तंत्र अवगत झाले. शेतकर्यांकडून शेतमाल घेऊन तो व्यापार्यांना विकायचा, असा व्यवसाय त्यांनी सुरू केला. कर्मवीरांचा पदवीधर नातू भाजी खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो, याबद्दल काहीजणांना आश्चर्य वाटले. मात्र, यावर गायकवाड कुटुंंबाचे म्हणणे असे होते की, “पूर्वजांच्या नावावर आयते बसून खाण्यापेक्षा, मुलगा प्रामाणिक कष्टाने भाकरी मिळवतोय, ही आनंदाची गोष्ट आहे.”
राजाभाऊ यांच्याही आयुष्यात संघर्ष आलाच. राजाभाऊंना नोकरीच्या संधीसाठी एक न्यायालयीन लढा लढावा लागला. गावात पोलीस पाटलासाठी रिक्त जागा होती. राजाभाऊंनी परीक्षाही दिली. लेखी परीक्षेत ते पहिलेही आले. मात्र, तोंडी परीक्षेत परीक्षकांनी पदाचा गैरवापर केला. त्यामुळे राजाभाऊंऐवजी दुसर्याच व्यक्तीला नोकरी मिळाली. भ्रष्ट कारभारामुळे राजाभाऊंची नोकरीची संधी गेली. राजाभाऊ गप्प बसले नाहीत. दोन वर्षे त्यांनी न्यायालयीन लढा दिला. शेवटी लढ्यात त्यांना यश मिळाले, आणि नोकरी मिळाली. या सगळ्या काळात राजाभाऊ हे सामाजिक कार्यही करत होते. त्यांनी वाचले होते की, देहविक्री करणार्या आणि कचरावेचक भगिनींसाठी, डॉ. बाबासाहेबांना उर्वरित आयुष्यात काम करायचे होते. मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे देहविक्री करणार्या, तसेच कचरावेचक महिलांच्या मुलांनी समाजाच्या मूळ प्रवाहात यावे, शिकून सवरून आयुष्यात स्थिर व्हावे, यासाठी राजाभाऊ काम करतात.
हे सगळे करताना राजाभाऊ पाहत होते की, समाजात बदल करण्याचा काही लोक प्रयत्न करत होते. बाबासाहेबांच्या नावावर काहीही खोटेनाटे खपवून, समाजाला संविधानाच्या चौकटीबाहेर भरकटवण्याचे प्रयत्न ते करत होते. हे लोक धर्मभेद करत, समाजातील युवकांना हिंसात्मक आंदोलनात ओढत होते. राजाभाऊ यांनी ठरवले की, “समरसतेचे कार्य करणार्यांनी कधीही माझी जात विचारली नाही. उलट मी समाजदेशीप्रेमी आहे, बाबासाहेबांच्या विचारांचा पाईक आहे, म्हणून मला बंधूच मानले. ही एकत्वाची भावना समाजात रूजवायची आहे. समरस समाजाच्या विकासासाठी आणि संविधानासंदर्भातील जागृतीसाठी काम करायचे. तसेच समाजातील तरुणांच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे.” राजाभाऊ गायकवाड त्यासाठीच अहोरात्र कार्य करत आहेत. पूर्वजांचा वारसा स्वार्थासाठी वापरणारे आज महाराष्ट्रात अनेक आहेत. मात्र, आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व, वैचारिक वारशाचा जागर समाजाच्या एकतेसाठी करणारे राजाभाऊ समाजासाठी आदर्श आहेत.
9594969638