बांगलादेशात हिंसाचार कायम

    02-Sep-2024   
Total Views |

Bangladesh violence
 
हसीना यांना सत्तेतून पायउतार केल्यानंतर तरी बांगलादेशात शांतता प्रस्थापित होईल, असे वाटत होते. त्यातच नोबेल पुरस्कारविजेते मोहम्मद युनूस यांनी सुत्रे संभाळल्याने बांगलादेशातील जनजीवन पूर्ववत होईल, आणि शांतता नांदेल असे वाटले खरे; पण प्रत्यक्षात मात्र तसे काहीही झालेले नाही. अद्यापही बांगलादेशमध्ये ठिकठिकाणी हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना समोर येत आहेत.
 
बांगलादेशात शेख हसीना यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्यानंतर, हसीना यांनी तूर्तास भारतात आश्रय घेतला आहे. बांगलादेशात सध्या मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार कार्यरत आहे. हसीना यांना सत्तेतून पायउतार केल्यानंतर तरी बांगलादेशात शांतता प्रस्थापित होईल, असे वाटत होते. त्यातच नोबेल पुरस्कारविजेते मोहम्मद युनूस यांनी सुत्रे संभाळल्याने बांगलादेशातील जनजीवन पूर्ववत होईल, आणि शांतता नांदेल असे वाटले खरे; पण प्रत्यक्षात मात्र तसे काहीही झालेले नाही. अद्यापही बांगलादेशमध्ये ठिकठिकाणी हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना समोर येत आहेत. मोहम्मद युनूस यांच्या कार्यकाळातही बांगलादेशमधील हिंसाचार पूर्वीसारखाच कायम असून, यामध्ये हिंदू धर्मियांनासुद्धा लक्ष्य केले जात आहे. आतापर्यंत बांगलादेशात हिंसाचारामुळे, तब्बल एक हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
 
बांगलादेशच्या अंतरिम सरकारमध्ये आरोग्य विभागाची जबाबदारी सांभाळणार्‍या नूरजहान बेगम यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांत बांगलादेशात हिंसाचारामुळे एक हजार लोकांच्या मृत्यूसह, तब्बल चारशेहून अधिक लोक अंध झाले आहेत. बांगलादेशात अंतरिम सरकार असतानाही रक्तपात काही थांबत नाही.
 
हसीना यांच्यानंतर बांगलादेशात मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार आल्यानंतर, शेख हसीना यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले वाढलेले आहेत. हसीना यांच्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास दिला जात असून, अनेक कार्यकर्त्यांच्या हत्यादेखील करण्यात आलेल्या आहेत. बदल्याच्या भावनेने बांगलादेशात हसीना यांच्या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना लक्ष्य केले जात आहे. बांगलादेशातील चितगावमध्ये अवामी लीगच्या दोन कार्यकर्त्यांची, हल्लेखोरांनी उघडपणे हत्या केली. यापूर्वी बांगलादेशच्या विविध भागांतून हिंदूंना मोठ्या प्रमाणावर लक्ष्य केले जात असल्याच्या बातम्या येत होत्या. हसीना यांच्या समर्थकांच्या हत्यांचे प्रमाण वाढत असताना, मोहम्मद युनूस मात्र निषेधाव्यतिरिक्त काहीही करू शकणार नाही. कारण, नशिबाने आणि अपघाताने पंतप्रधानपद मिळाले आणि तेही बांगलादेश लष्कराच्या कृपेने. त्यामुळे नामधारी पंतप्रधान आणि तेही अंतरिम, मग कारवाई तरी कशी करणार म्हणा. विशेष म्हणजे, हल्लेखोरांनी शेख हसीना यांना हटवण्यासाठी पोलिसांनादेखील मोठ्या प्रमाणावर लक्ष्य केले होते. सध्या अनेक पोलीस रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
 
बांगलादेशात जुलै २०२४ मध्ये सुरू झालेले विद्यार्थ्यांचे आरक्षणविरोधी आंदोलन ,काही दिवसांतच शेख हसीना सरकारच्या विरोधातील आंदोलनात रूपांतरित झाले. हे आंदोलन जमात-ए-इस्लामी आणि बीएनपीने हायजॅक केले होते. ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंत चाललेल्या या आंदोलनादरम्यान, बांगलादेशात पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले झाले. यावेळी इतर लोकांनाही लक्ष्य करण्यात आले. वाढत्या हिंसाचारानंतर, ५ ऑगस्ट २०२४ रोजी पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि भारतात आल्या. यानंतर मोहम्मद युनूस यांना बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख बनवण्यात आले. मात्र, हे सरकार आल्यानंतरही बांगलादेशात शांतता प्रस्थापित झालेली नाही. युनूस सरकार सत्तेवर येऊन आठवडे उलटले तरी, बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदूंविरुद्ध हिंसाचार सुरूच आहे. याशिवाय, शेख हसीना यांच्या पक्षाचे मंत्री आणि कार्यकर्तेही निशाण्यावर आहेत.
 
दरम्यान, नुकतीच मोहम्मद युनूस सरकारने, इस्लामिक कट्टरतावादी जमात-ए-इस्लामीवर घातलेली बंदी उठवली आहे. जमातच्या विद्यार्थी संघटनेवरूनही बंदी उठवण्यात आली आहे. या दोन संघटनांविरुद्ध दहशतवादाचा कोणताही पुरावा नसल्याचे, युनूस सरकारने म्हटले आहे. बांगलादेशात नुकत्याच झालेल्या सत्तापालटात जमातचा मोठा हात आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी ऑगस्ट २०२४ मध्येच त्यावर पूर्णपणे बंदी घातली होती. मात्र, असे असतानाही युनूस यांनी ही बंदी उठवली आहे. आता जमात-ए-इस्लामी बांगलादेशात उघडपणे सभा घेऊ शकणार आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांची शिबिरेही खुलेपणाने चालवता येतील. मुळात ही बंदी उठवली जाणार हे नक्की होते; मात्र नोबेलविजेत्या माणसानेही अशा पद्धतीने सरकार चालवावे, हेही तितकेच दुर्दैवी म्हणावे लागेल.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.