मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शालेय इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमरे बसवण्यात येत आहेत. मुंबई शहर भागातील महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान आता मुंबई उपनगरातील शाळांवरही सीसीटीव्हीची नजर पाहायला मिळणार आहे. मुंबई उपनगरातील ३५६ शाळांच्या इमारतीवर सहा हजार सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येणार आहेत.
गेल्या वर्षी मुंबई शहर भागातील १२३ शाळांचे सर्वेक्षण करून २ हजार ८३२ सीसीटीव्ही शालेय इमारतींवर बसवण्यात आले. त्यासाठी मुंबई महापालिकेकडून निविदा प्रक्रिया ही राबवण्यात आली होती. त्यानुसार मुंबई शहर भागात कॅमेरे बसवण्याचे कामही सुरु आहे. मात्र मुंबई उपनगरातील शालेय इमारतींवर सीसीटीव्ही कॅमेर बसवण्यासंदर्भात कोणताही निर्णय न घेतल्याने पालिका प्रशासनावर टीका केली जात होती. त्यामुळे महापालिकेकडून शालेय इमारतीवर सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याला मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांच्याकडून तत्त्वत: मंजुरी मिळालेली आहे. हा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. ज्यामुळे मुंबई शहरासह उपनगरातही सीसीटीव्ही बसवण्यात येतील.