"राऊत नावाचा घरकोंबडा रोज आरोळी देतो... त्यानं मराठा आरक्षण पाठिंब्याचं पत्र जरांगेंना द्यावं!"
16-Sep-2024
Total Views | 83
सांगली : संजय राऊत नावाचा घरकोंबडा रोज आरोळी देतो. त्यांनी जरांगेंना मराठा आरक्षण पाठिंब्याचं पत्र लिहून द्यावं, असं आव्हान आमदार सदाभाऊ खोत यांनी दिलं आहे. सांगलीतील शिराळा येथे रयत क्रांती कार्यालयाचे उद्धाटन पार पडले. यावेळी ते बोलत होते.
सदाभाऊ खोत म्हणाले की, "सगळं दिल्यानंतरही राज्यातील काही लोक मराठा समाजात दुफळी माजवण्याचं काम करत आहे. महाविकास आघाडीच्या निव़डून आलेल्या लोकांनी एक पत्र सरकारला आणि एक पत्र जरांगेंना लिहावं. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यास माझा पाठिंबा आहे, असं त्यांनी या पत्रात लिहावं."
"संजय राऊत नावाचा घरकोंबडा रोज आरोळी देतो. त्या कोंबड्यालाही मी सांगतो की, रोज खुराड्यातून बांग देऊ नको. माझी उबाठा सेना मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करण्यास पाठिंबा देत आहे, असं एक पत्र लिहून मनोज जरांगेंना दे. बघूया तुझ्यात जोर आहे का ते," असे आव्हानच त्यांनी दिले आहे.
रोहित पवार विद्वान माणूस!
यावेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी रोहित पवार विद्वान माणूस आहे, असा खोचक टोलाही लगावला. ते पुढे म्हणाले की, "रोहित पवार, तुम्ही महाराष्ट्रात आग लावत सुटला आहात. तुम्हीसुद्धा लिहून द्या की, मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करायला माझा पाठिंबा आहे. महाराष्ट्रात आग लावण्याचं काम बंद करा. लोकसभेला जमलं म्हणून आतासुद्धा जमेल ही भावना सोडून टाका," असेही ते म्हणाले.