मुंबई : शरद पवारांनी निवांत राहून हरिनामाचा जप करावा जेणेकरून त्यांच्या डोक्यात पुण्य काम करण्याची ईच्छा जागृत होईल, असा खोचक टोला भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे. तसेच पवारांनी ५०-६० वर्षे फक्त महाराष्ट्र लुटायचंचं काम केलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
गोपीचंद पडळकर म्हणाले की, "शरद पवार म्हणतात सत्ता हातात द्या महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल. पण मी त्यांच्या अर्ध्या विधानाशी सहमत आहे. महाराष्ट्रचा चेहरा बदलण्याची आवश्यकता देवेंद्रजींनी पूर्ण केली आहे. पवारांमुळे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅंन्सर झाला आहे. ५०-६० वर्षे पवारांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता होती. त्यावेळी त्यांनी फक्त महाराष्ट्र लुटायचंचं काम केलं आहे."
"छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिलेली तेजाची झळाळी एकट्या पवारांमुळे हरवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेला अठरापगड जातींचा महाराष्ट्र ५० वर्षे पवारांनी स्वत:ची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून चालवला. पवार अँड पवार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आता पवार अँड सुळे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झालाय. त्यावेळी जातीजातींमध्ये वाद लावून प्रस्थापितांची घरं भरण्याचं काम सुरु होतं. त्यामुळे याला कंटाळून महाराष्ट्रातील लोकांनी २०१४ मध्ये परिवर्तन केलं," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "पवारांचा शासनकाळ हा महाराष्ट्राच्या इतिहासाची काळी पानं आहेत. त्यांनी फक्त भ्रष्टाचार आणि जातीवाद केला. लोकांमध्ये भांडणं लावली. आता तुम्ही निश्चिंत आणि निवांत राहा. हरिनामाचा जप करा म्हणजे तुमच्या डोक्यात पुण्य काम करण्याची ईच्छा जागृत होईल. देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला देशात परकीय गुंतवणूकीत पहिल्या क्रमांकावर आणला आहे. पण महाराष्ट्राची प्रगती पवारांना खुपते आहे. आज महाराष्ट्राला सर्वसमावेशक विकासाचा चेहरा मिळाला आहे. तो बदलवून पवारांना पुन्हा महाराष्ट्राl जातीवाद निर्माण करायचा आहे का? महाराष्ट्राला दुबळं करायचं आहे का? दलित ओबीसी अत्याचाराचे नवे अध्याय लिहायचे आहेत का?" असा सवाल गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना केला आहे.