मुंबई : (Fake Notice) राज्यात मागील काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात सायबर गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सायबर चोरटे फसवणुकीसाठी विविध प्रकारच्या क्लृप्त्या वापरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. अनेक नागरिकांना आयुक्तांच्या नावे सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप, ई-मेल, तसेच मेसेज व फोन करून कायदेशीर कारवाईचा धाक दाखवून अटक करण्याची धमकी दिली जात आहे. असे कॉल आल्यास अथवा मेसेजेस आल्यास न घाबरता थेट पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने केले आहे.
सायबर चोरटे मॅसेज तसेच कॉल करून नागरिकांची आर्थिक फसवणूक करीत आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक, क्रेडिट कार्ड, ऑनलाइन पार्सल या सारख्या माध्यमांतून फसवणूक केली जाते. नागरिकांच्या फोनवर काही लिंक पाठवून त्यावर क्लिक करायला भाग पडून बँकांतून थेट रक्कम लंपास करण्यात आल्याच्या अनेक घटना देखील उघडकीस आल्या आहेत यासंदर्भात पोलिसांकडे अनेक तक्रारी देखील प्राप्त झाल्या आहेत. अशातच मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी एक परिपत्रक काढलं आहे. फेक मॅसेज आणि नोटीस आल्यास मुंबईकरांनी सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी परिपत्रकातून केले आहे.
मुंबई पोलिस आयुक्तांकडून अटकेची नोटीस मिळाली का?
तुम्हालाही अशी अटकेची नोटीस आल्यास आमच्या निदर्शनास आणा. कुठल्याही भुलथापांना बळी पडू नका, आयुक्तांच्या तसेच मुंबई पोलिसांच्या वतीने प्राप्त झालेल्या मेल, व्हॉट्सॲप, एसएमएस किंवा फोन कॉलवर कोणत्याही बनावट अटक सूचनेवर विश्वास ठेवू नका किंवा प्रतिसाद देऊ नका, असे पोलीस आयुक्त विवेक फळसणकर यांनी एका फेक नोटीसीचा स्कीन शॉर्ट आपल्या अधिकृत X अकाउंटवरून शेअर करत म्हटले आहे.
फेक नोटीसमध्ये काय म्हटलंय?
सोशल मिडिया वापरकर्त्यांना अज्ञात व्यक्तीकडून पाठवण्यात आलेली फेक नोटीस इंग्रजी भाषेत आहे. या नोटीसीत प्राप्तकर्त्याला पोलीस आयुक्त कार्यालयात येण्यास सांगितले आहे. त्यामध्ये असाही दावा करण्यात आलाय की, तुम्ही पोर्नोग्राफीशी संबंधित प्रकरणात गुंतलेले आहात. विशेष बाब म्हणजे या नोटीसमध्ये सीबीआयचा देखील उल्लेख आहे. अशा प्रकारची नोटीस पाठवून अज्ञात व्यक्तीकडून तुमची फसवणूक होऊ शकते. त्यामुळे वेळीच सतर्क व्हा, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.
फसवणूक टाळण्यासाठी काय करावे ?
सायबर गुन्हेगारानी फोन करुन गुन्ह्यांत अडकण्याची भीती दाखवल्यास घाबरून जाऊ नये. कारवाईची धमकी दिल्यास थेट फोन बंद करावा. याबाबत घरच्यांना माहिती द्यावी. सायबर चोरट्यांनी पैशाची मागणी केली तर ते पैसे त्यांना न देता तातडीने पोलीसांना संपर्क साधून त्यांना याची माहिती द्यावी.