पुण्यात ७ नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती; अजित पवारांची घोषणा
शहराचा वाढता विस्तार पाहता प्रशासनाचा निर्णय
15-Sep-2024
Total Views | 23
मुंबई : पुणे (Pune) शहरातील वाढती गुन्हेगारी, तसेच शहराचा वाढता विस्तार हे लक्षात घेता नवीन पोलीस ठाण्यांची स्थापना करण्याची घोषणा पुण्याचे पालकमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यानुसार पुण्यात ७ नवीन पोलीस ठाण्यांची तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ४ पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
चाकण येथील एका कार्यक्रमात गुरुवारी उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत नव्याने एकूण ११ पोलिस ठाण्यांना मंजुरी दिल्याचे म्हटले आहे. पवार यांच्या घोषणेनंतर नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीच्या रखडलेल्या प्रस्तावास गती मिळणार आहे.
आंबेगाव, नांदेडसिटी, बाणेर, खराडी, वाघोली, फुरसुंगी आणि काळेपडळ ह्या नवीन सात पोलीस ठाण्यांची नावे प्रस्तावित आहेत. शहरातील भारती विद्यापीठ, सिंहगड रोड, चतुःश्रृंगी, लोणीकाळभोर, लोणीकंद, हडपसर, वानवडी आणि कोंढवा या पोलिस ठाण्यांचे विभाजन करून, तर हवेली आणि हिंजवडी या पोलिस ठाण्यांचा काही भाग समाविष्ट करून या नवीन सात पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार आहे.
नवीन पोलीस ठाण्यांची आवश्यकता का ?
सध्या पुणे शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत ३२ पोलिस स्टेशन्स असून, हा कारभार पाच परिमंडळामध्ये विभागला गेला आहे. तेथे दाखल होणाऱ्या तक्रारींचे प्रमाण इतर पोलिस ठाण्यांच्या तुलनेत चार ते पाच पटीने आहे. शहराचा विस्तार वाढत असून, अनेक नवी गावे शहराशी जोडली जात आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणेवरील ताण वाढत आहे. शिवाय वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्याचा विचार करून शहरातील ३२ पोलिस ठाण्यांत आणखी नव्याने ७ पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. या नवीन ७ पोलिस ठाण्यांच्या निर्मितीमुळे यापुढे शहरात तब्बल ३९ पोलिस ठाणी राहतील.
सात पोलिस ठाणी निर्माण करण्याबाबत आम्ही शासनाला प्रस्ताव दिला होता. त्याबाबत गृहमंत्री आणि वित्तमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. सात पोलिस ठाणी सुरू होण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. त्याला या महिन्याअखेर मंजुरी मिळेल अशी आशा आहे. तर विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी सात पोलिस ठाण्यांचा विषय मार्गी लागण्याची शक्यता आहे.