काश्मीरची तरुणाई आणि ३ कुटुंबांच्या घराणेशाहीविरोधात लढा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डोडा येथे प्रचारसभा
14-Sep-2024
Total Views | 21
नवी दिल्ली, दि. १४ : विशेष प्रतिनिधी : 'काँग्रेस', 'नॅशनल कॉन्फरन्स' आणि 'पीडीपी' या तीन घराणेशाह्यांनी जम्मू – काश्मीरचे मोठे नुकसान केले आहे. मात्र, यंदाची विधानसभा निवडणूक ही काश्मीरमधील तरुणाई आणि तीन कुटुंबांच्या घराणेशाहीविरोधात लढली जाणार आहे; असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी डोडा येथील प्रचारसभेत केले आहे.
यावेळी जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुका तीन कुटुंब आणि जम्मू-काश्मीरमधील तरुण यांच्यात होणार आहेत. एक कुटुंब काँग्रेसचे, एक कुटुंब नॅशनल कॉन्फरन्सचे आणि एक कुटुंब पीडीपीचे आहे. जम्मू-काश्मीरमध्ये या तिन्ही कुटुंबांनी मिळून जे काही केले ते पापापेक्षा कमी नाही. पंतप्रधान म्हणाले की, दिवस मावळताच येथे अघोषित कर्फ्यू लागू करण्यात येत असे. परिस्थिती अशी होती की, काँग्रेस केंद्र सरकारचे गृहमंत्री लाल चौकात जायलाही घाबरत होते. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद आता शेवटचे श्वास मोजत आहे. गेल्या १० वर्षात येथे झालेला बदल स्वप्नापेक्षा कमी नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
काश्मिरी हिंदूंबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले, "काश्मीरी जनतेच्या विश्वासामुळेच जम्मू-काश्मीर भाजपने तुमच्यासाठी अनेक संकल्प केले आहेत. आज आम्ही टिकलाल टपलू यांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तीन दशकांपूर्वी त्यांना दहशतवाद्यांनी शहीद केले होते. या दिवशी त्यांच्या हत्येनंतर काश्मिरी पंडितांवर अत्याचाराची न संपणारी मालिका भाजपनेच उठवली आणि त्यांच्या हितासाठी टिकलाल टपलू योजना जाहीर केली यामुळे काश्मिरी हिंदूंना त्यांचे हक्क मिळवून देण्याची प्रक्रिया वेगवान होईल," असेही पंतप्रधानांनी नमूद केले आहे.