श्रीराममंदिर संकुलाचे बांधकाम ३० जून २०२५ पर्यंत पूर्ण होणार
14-Sep-2024
Total Views | 20
नवी दिल्ली, दि. १४ : विशेष प्रतिनिधी : ( Shri Ram Mandir )अयोध्येतील श्रीराम मंदिराची उभारणी निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी ट्रस्ट कटीबद्ध असून संपूर्ण मंदिर संकुलाचे बांधकाम ३० जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिली आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या मंदिर निर्माण समितीची बैठक शुक्रवारी झाली. बैठकीनंतर समितीचे प्रमुख नृपेंद्र मिश्रा यांनी बैठकीतील चर्चेची माहिती दिली. ते म्हणाले, "मंदिर संकुलाचे काम पूर्ण करण्यासाठी यापूर्वी डिसेंबर २०२४ पर्यंतचे लक्ष्य ठरविण्यात आले होते. मात्र, आता ते शक्य नाही. नव्या वेळापत्रकानुसार मंदिराच्या शिखराचे बांधकाम फेब्रुवारी २०२५ पर्यंत पूर्ण केले जाईल, त्याचप्रमाणे ऋषींच्या पुतळ्यांची स्थापना डिसेंबर २०२४ पर्यंत केली जाईल. संपूर्ण राम मंदिराचे काम ३० जून २०२५ पर्यंत पूर्ण केले जाईल," असे मिश्रा यांनी म्हटले आहे.
पहिल्या मजल्याचे काम पूर्ण करणे आणि त्याच स्तरावर सुरू असलेले फ्लोअरिंगचे काम यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. गर्भगृहाला पांढऱ्या संगमरवरी दगडांनी सुशोभित केले आहे, तर दुसऱ्या मजल्याचे बांधकाम सातत्याने सुरू आहे. सध्या १६०० हून अधिक समर्पित कामगार मंदिराच्या बांधकामात कार्यरत आहेत. रामजन्मभूमी संकुलात अपोलो हॉस्पिटलद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या आपत्कालीन आरोग्य सेवांच्या व्यवस्थापनाचे मूल्यांकन करण्यासाठी सखोल तपासणी करण्यात आली. नवरात्रीपासून रुग्णालयाचे कामकाज सुरू होणार आहे. श्रीरामजन्मभूमी संकुलातील सजावटीचे काम जीएमआर कंपनीस सोपविण्यात आले आहे, त्यांनी संकुलातील हिरवळ टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या योजनांची रूपरेषा देणारा सर्वसमावेशक अहवाल सादर केला, असेही मिश्रा यांनी नमूद केले आहे.
मंदिराची इमारत दर्शनी दिव्यांनी सुशोभित केली जाईल, परंतु संकुलाच्या इतर भागांमध्ये अशा प्रकारच्या रोषणाईचा वापर केला जाणार नाही. केवळ मंदिराच्या इमारतीत दर्शनी दिवे लावले जातील, जे तेथील वातावरण आणि उपासकांच्या भक्तीसाठी योग्य असेल. दर्शनीस भागातील रोषणाईसाठीची निविदा नोव्हेंबर अखेर निघणे अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले आहेत.