मुंबई : राहूल गांधींनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. आता राहूल गांधींच्या वक्तव्याची सारवासारव करण्यासाठी आता उबाठा गटाचे नेते संजय राऊत पुढे सरसावले आहेत. राहूल गांधींनी आरक्षण रद्द करू असं कोणतंही वक्तव्य केलं नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, "आरक्षणासंदर्भातील राहूल गांधींचं वक्तव्य भाजपने नेहमीप्रमाणे मोडून तोडून समोर आणलं आहे. आरक्षण रद्द करू अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य राहूल गांधींनी केल्याचं माझ्या ऐकण्यात नाही. मी त्यांची पूर्ण मुलाखत ऐकली. भाजपला पूर्ण ऐकण्याची सवय नाही. ते त्यांना हवं तितकंच ऐकतात आणि बाकीचं मोडून तोडून फेकून देतात," असे ते म्हणाले.
"काँग्रेस पक्षाची भूमिका मला माहिती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाविषयी भूमिका काय आहे हेही मला माहिती आहे. जोपर्यंत समाजात विषमता आहे, समान न्यायाचे तत्व लागू होत नाही, दुर्बल समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आरक्षण सुरु राहिल, अशी आमची भूमिका आहे," असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राहूल गांधींच्या वक्तव्याच्या विरोधात सध्या राज्यभरात भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, राहूल गांधींची पाठराखण करण्याकरिता विरोधी पक्षातील नेते पुढे सरसावले आहेत. अशातच आता संजय राऊतांनीही राहूल गांधींचं समर्थन करत भाजपवर टीका केली आहे.