राहूल गांधी आरक्षणप्राप्त वंचितांची क्षमा मागणार का? पंकजा मुंडेंचा सवाल
13-Sep-2024
Total Views | 51
मुंबई : राहूल गांधी देशातील आरक्षणप्राप्त अनुसूचित जाती, जमातीतील वंचितांची क्षमा मागणार का? असा सवाल भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी केला आहे. शुक्रवारी, राज्यभरात राहूल गांधींच्या निषेधार्थ भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईत आशिष शेलार आणि पंकजा मुंडेंच्य नेतृत्वात आंदोलन सुरु आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, "हे आंदोलन प्रत्येकाच्या जनामनात, गल्लीबोळात सदैव सुरु राहणार आहे. जोपर्यंत काँग्रेस नेते राहूल गांधी स्पष्टीकरण देत नाहीत आणि ज्यांना आरक्षण मिळालं त्या वंचितांची क्षमा मागत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहील. देशात निवडणूक सुरु असताना भाजपच्या विरोधात फेक नरेटिव्ह तयार करून आणि लोकांना भूलथापा देऊन त्यांची मनं वळवण्याचा प्रयत्न केला होता. परंतू, आज त्यांच्या पोटातलं ओठात आलं आहे," अशी टीका त्यांनी केली.
त्या पुढे म्हणाल्या की, "प्रत्येत पक्षाच्या, प्रत्येक विचाराच्या, प्रत्येत जातीधर्माच्या माणसाने देशाबाहेर आपल्या देशाची गरिमा ठेवली पाहिजे. परंतू, राहूल गांधींनी आपल्या देशाची गरिमा कमी करण्याचं काम केलं आहे. आपल्या देशाच्या बाहेर गेल्यावर आपण भारतीय असतो. त्यामुळे त्यांनी भारतीय संविधानाचा अवमान करायला नको होता. त्यांनी याबाबतीत खुलासा करायला हवा. तसेच राहूल गांधींच्या या वक्तव्याशी त्यांचे मित्रपक्ष सहमत आहेत का, याबाबतीत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी," असेही त्या म्हणाल्या.