नागपूर : महाविकास आघाडीमध्ये १२५ जागांबाबत कुठलीही अडचण नसून तिन्ही पक्षांचं एकमत झालं आहे, अशी माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तसेच लवकरच मविआची पुढची बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला.
आगामी विधानसभा निवडणूकांच्या अनुषंगाने जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडी आणि महायूतीच्या बैठका सुरु आहेत. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याबाबत अद्याप कुठलीही माहिती पुढे आलेली नाही. मात्र, मविआचं १२५ जागांवर एकमत झाल्याची माहिती वडेट्टीवारांनी दिली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, "काही जागांवर अडचण नाही. अनेक जागांवर एकमत झालेलं आहे. आम्ही ज्या जागा मागितल्या त्या शरद पवार गटाने मागितल्या नाहीत. शरद पवार गटाने ज्या मागितल्या त्या शिवसेना उबाठाने मागितल्या नाहीत आणि त्यांनी ज्या मागितल्या त्या आम्ही मागितल्या नाही. अशा १२५ जागांवर कुठेही अडचण नाही. पुढची बैठक गणेश विसर्जनानंतर होणार आहे. त्यावेळी जागावाटपाचा प्रश्न बऱ्यापैकी निकाली निघालेला दिसेल," असे ते म्हणाले.