मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Dattatray Hosbale in Assam) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी आसामच्या हाफलाँग येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थी आणि शाळेतील मंडळींशी संवाद साधला. "आपण सर्वांनी देशभक्त नागरिक बनले पाहिजे आणि भारत मातेला उंच शिखरावर नेण्याचा संकल्प केला पाहिजे. यासाठी आपल्या जीवनात एक स्पष्ट ध्येय ठेवले पाहिजे.", असे म्हणत त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
हे वाचलंत का? : अल्लाहू अकबरच्या घोषणा देत गणेश मंडळावर धर्मांधांची दगडफेक
सुरुवातीला दत्तात्रेय होसबळे यांनी शाळेच्या आवारात असलेल्या श्रीरामाच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आशीर्वाद घेतले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदांची पुस्तके वाचून त्यांचे आदर्श जीवनात अंगीकारण्याची प्रेरणा दिली. शाळा व वसतिगृहाची पाहणी केल्यानंतर तेथील व्यवस्थेचे कौतुक केले. त्यांनी विद्यार्थी आणि शालेय कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि शिक्षणासोबतच मूल्यांचे महत्त्व पटवून दिले. यावेळी विद्या भारती ईशान्य क्षेत्राचे संघटन मंत्री डॉ.पवन तिवारी, विद्या भारती दक्षिण आसाम प्रांताचे संघटन मंत्री महेश भागवत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आसाम प्रदेश प्रचारक वशिष्ठ बुजारबरुआ व इतर अधिकारी उपस्थित होते.
विद्या भारतीच्या योजनांतर्गत कृष्णचंद्र गांधी यांच्या प्रयत्नातून हाफलाँगच्या दिमाहसाओ जिल्ह्यात असलेल्या वनवासी भागांसाठी स्थापन करण्यात आलेली सरस्वती विद्या मंदिर शाळा ही सुसंस्कृत आणि दर्जेदार शिक्षण देण्यात अग्रेसर आहे. सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र म्हणून शाळेने विशेष नावलौकिक मिळवला आहे.