मुंबई (विशेष प्रतिनिधी) - ठाणे वन विभाग आणि 'वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन'ने (डब्लूडब्लूए) वांद्रे टर्मिनस आणि क्राॅफर्ड मार्केट परिसरात धाड टाकून संरक्षित दर्जाचे ११५ वन्यजीव जप्त केले (wildlife trafficking in crawford market). यामध्ये वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित असलेल्या पोपट्याच्या काही प्रजाती आणि कासवांचा समावेश आहे (wildlife trafficking in crawford market). महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राच्या राज्यपक्ष्याच्या दर्जा मिळालेल्या पिवळ्या पायाची हरोळी म्हणजेच हरियाल या पक्ष्याचा देखील या तस्करीत समावेश होता. (wildlife trafficking in crawford market)
ठाण्यातील 'डब्लूडब्लूए' या संस्थेतील कार्यकर्त्यांना मेरठ ते वांद्रे टर्मिनस ट्रेनमधून वन्यजीवांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. रेल्वेमधील एका बंद कपाटामधून पोपटांचा आवाज येत असल्याची माहिती ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका सर्तक प्रवाशाने 'डब्लूडब्लूए'ला दिली. त्यानुसार संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वनधिकाऱ्यांच्या मदतीने वांद्रे टर्मिनस येथे धाड टाकली. रेल्वेमधून उतरणाऱ्या तस्करांना मुद्देमालसह पकडण्यात आले. त्यांच्याकडून पोपटांचे खरेदीदार कोण आहेत याची माहिती मिळविण्यात आली. यावेळी हे वन्यजीव क्रॉफर्ड मार्केटमध्ये जाणार असल्याची माहिती मिळाली. रेल्वेमधून आलेल्या या पोपटांना घेण्यासाठी क्रॉफर्ड मार्केटमधील एक व्यक्ती रेल्वे स्थानकात दाखल होताच त्याच्याही मुसक्या आवळण्यात आल्या. या इसमाकडून माहिती घेतल्यानंतर क्रॉफर्ड मार्केटमधील एका गोदामावर छापा टाकण्यात आला. त्याठिकाणी वनकर्मचाऱ्यांना मोठ्या संख्येने संरक्षित वन्यजीव सापडले.
गोदामावरील छाप्यामधून एकूण ७१ प्राणी-पक्षी पकडण्यात आले. यामध्ये लाल छातीचे पोपट, टोई पोपट, पोपट, करण पोपट, स्टार जातीची कासवे आणि हरियाल पक्ष्यांचा समावेश होता. या संपूर्ण धाड सत्रामधून ११५ वन्यजीवांना ताब्यात घेण्यात आले. हे सर्व जीव वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित आहेत. वैद्यकीय तपासणी आणि उपचारासाठी त्यांना ठाण्यातील 'एसपीसीए' संस्थेकडे हलविण्यात आले आहे. तस्करांना चौकशी आणि कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहे. क्राॅफर्ड मार्केट हे वन्यजीवांच्या तस्करीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे. या कारवाईमधून पकडण्यात आलेला क्राॅफर्ड मार्केटमधील विक्रेता हा यापूर्वी देखील अवैध वन्यजीवांच्या तस्करीबद्दल वन विभागाच्या जाळ्यात आला आहे.
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.