ठाणे, दि.११ : प्रतिनिधी : सामाजिक समस्येवर प्रबोधन करणारे देखावे सार्वजनिक गणेशोत्सवात सादर केले जातात. ठाण्यातील जिजामातानगर येथील चैतन्य मित्र मंडळाने गणेशोत्सवाच्या देखाव्यातून "वेळीच ओळखा... नशेचा विळखा" हा विषय घेत नशेच्या आहारी जाणार्या तरुणाईला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. आजची तरुणाई नशेच्या आहारी जाऊन आपलं अस्तित्व, कुटुंब सर्वच गमावून बसते. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. म्हणूनच चैतन्य मंडळाचा हा देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
आज समाजात अंमली पदार्थ, दारू, चरस, गांजा, सिगारेट, तंबाखू, ड्रग्स आणि विविध नशेचे पदार्थ खुलेआमपणे तर काही लपून छपून बेकायदेशीररीत्या उपलब्ध होत आहे. काही वेळापुरती कोणतीही नशा खोटा आभासी आनंद मिळवून देते परंतु कायमस्वरूपी आत्मिक आनंद कधीही देऊ शकत नाही. याउलट कोणत्याही नशेच्या आहारी गेल्यामुळे परिस्थिती अधिक अडचणी निर्माण करीत माणसाच्या विनाशाची वाटचाल सुरू होते. लहान वयातच मुलांचा ’नशा’ या गोष्टीं बरोबर कसा संपर्क होतो, अनेक कुटुंब कशी उध्वस्त होतात, या नशाकारक अंमली पदार्थांची सवय कशी वाढत जाते, आपला निश्चय दृढ आणि पक्का असेल तर आपण या नशेच्या विळख्यातून कसे सावरू शकतो, हे दाखवण्याचा व समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. समाजात निरोगी आणि सुदृढ पिढी निर्माण होण्यासाठी वेळीच हा नशेचा विळखा सर्वांनी ओळखावा हेच या वर्षीच्या देखाव्या मागील उद्दिष्ट आहे.
’बघता सोडुनी नशा.. ना कधी उरे निराशा.. बदलुनी सर्व दशा... जन्मास येईल नव आशा’ असा समाजिक संदेश जिजामातानगरच्या चैतन्य मित्र मंडळाने दिला आहे.