मुंबई : मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी बेस्ट बचाओ अभियानाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत यावर्षी ‘बेस्ट बचाओ’ या विषयाअंतर्गत संदेश दिला आहे. यामध्ये बेस्ट बसचा कमी होणारा ताफा आणि अल्पदरात मिळणाऱ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला लागणारे टाळे याबाबत जनजागृती करणारे बॅनर, देखावे करण्यात आले आहेत.
आयुष्यमान संपलेल्या बसगाड्यांच्या बदल्यात नवीन बसगाड्या विकत न घेतल्याने नोव्हेंबर २०२५ पर्यंत बेस्टच्या ताफ्यात फक्त २५१ गाड्या शिल्लक राहतील. परिणामी डिसेंबर २०२५ पर्यंत बेस्ट बससेवा बंद पडेल, अशी चिंता मागे बेस्ट बचाव अभियानाचे निमंत्रक शशांक राव यांनी व्यक्त केली होती. तसेच ‘बेस्ट बचाओ’चा संदेश जास्तीत जास्त मुंबईकरांपर्यंत पोहचवण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पाठिंबा देण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत मुंबईकरांना ‘बेस्ट बचाओ’ अशी साद घातली आहे.
‘बेस्ट बचाओ’ अभियानाचा देखावा शिवशक्ती मित्र मंडळ, कुर्ला तर्फे साकारण्यात आला आहे. त्याचप्रमाणे क्रांतीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (कुर्ला),सर्वादय मित्र मंडळ (बैलबाजार), तानाजी क्रिडा मंडळ, बजरंग सेवा संघ (कुर्ला), एकदंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (कौपरखैरणे), प्रगती नगर गणेशोत्सव मंडळ (माटुंगा) तसेच मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील अनेक मंडळांनी ‘बेस्ट बचाओ’ अभियानाचे बॅनर लावले आहेत.
इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवीचे शिक्षण पुर्ण केले आहे. सध्या साठ्ये महाविद्यालयात 'एमएसीजे'च्या प्रथम वर्षात शिकत आहेत. मुंबई विद्यापीठातून 'लोककला' या विषयात पदविका पूर्ण केली आहे. वक्तृत्व स्पर्धा, अभिनय स्पर्धांमध्ये अनेक परितोषिके प्राप्त.