भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाची व्यवस्थापनाखालील निव्वळ मालमत्ता ऑगस्टमध्ये प्रथमच ६५ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेल्याचे ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया’च्याआकडेवारीवरून नुकतेच स्पष्ट झाले आहे. असा हा उद्योग देशात केवळ सामान्यांना बचतीची सवय लावणाराच नाही, तर राष्ट्रविकासालाही चालना देणारा ठरला आहे.
भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाची व्यवस्थापनाखालील निव्वळ मालमत्ता ऑगस्ट महिन्यामध्ये प्रथमच ६५ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे, असे ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया’च्याआकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. इक्विटी फंडांमध्ये ऑगस्टमध्ये ३८ हजार, २३९ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, जी जुलैमधील ३७ हजार, ११३ कोटी रुपयांच्या तुलनेत ३.०३ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या चार महिन्यांत सातत्याने ३४ हजार कोटी रुपयांच्या पुढे गेल्याने इक्विटी गुंतवणुकीत लक्षणीय वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, सकारात्मक इक्विटी प्रवाहाचा हा सलग ४२वा महिना आहे. लार्ज कॅप फंडांनीही या महिन्यात लक्षणीय गुंतवणूक आकर्षित केली, तसेच मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप श्रेणींमध्ये जोरदार गुंतवणूक झाली, ज्यामुळे व्यापक बाजारावरील गुंतवणूकदारांचा दृढ विश्वास दिसून आला. ही गुंतवणूक सलग ४२व्या महिन्यात सकारात्मक क्षेत्रात राहिली, हे विशेष. भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाने उल्लेखनीय वाढ नोंदवली आहे, त्याची व्यवस्थापनाखालील निव्वळ मालमत्ता ६५ लाख कोटींहून अधिक आहे. पद्धतशीर गुंतवणूक योजनांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे हा एक महत्त्वपूर्ण टप्पा म्युच्युअल फंड उद्योगाने गाठला आहे. हा मालमत्ता वर्गावरील गुंतवणूकदारांच्या वाढत्या विश्वासाचा दाखलाच म्हणावा लागेल. हा टप्पा गुंतवणूकदारांद्वारे म्युच्युअल फंडांवर सोपवलेल्या निधीच्या ओघात भरीव वाढ दर्शवतो. व्यावसायिक संपत्ती व्यवस्थापन उपायांकडे वळल्याचेही तो सूचित करतो.
भारतीय गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरतेमुळे म्युच्युअल फंड आणि त्यांच्या संभाव्य फायद्यांविषयी जागरुकता निर्माण झाली आहे. गुंतवणूकदार त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्याचे तसेच व्यावसायिक गुंतवणुकीचा सल्ला घेण्याचे महत्त्व ओळखून आहेत, असेही म्हणता येईल. ‘भारतीय सिक्युरिटीज अॅण्ड एक्सचेंज बोर्ड’ (सेबी)नेपारदर्शकता, गुंतवणूकदारांचे संरक्षण आणि म्युच्युअल फंड उद्योगाच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण सुनिश्चित करण्यासाठी विविध नियामक उपाय लागू केले आहेत. या नियमांमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला असून, त्यांच्या सहभागाला प्रोत्साहन मिळाले आहे. तसेच म्युच्युअल फंडांनी विशेषत: दीर्घकालीन चांगला परतावा दिला आहे. त्याने गुंतवणुकदारांना आकर्षित केले आहे. २०१६ मध्ये नोटाबंदी आणि २०१७मध्ये वस्तू आणि सेवा कर लागू केल्यानंतर, म्युच्युअल फंडांसारख्या आर्थिक साधनांना अधिक पसंती मिळाली.
गुंतवणूक योजनांनी म्युच्युअल फंड उद्योगाच्या वाढीला चालना देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ‘एसआयपी’ हा गुंतवणुकीसाठी एक शिस्तबद्ध दृष्टिकोन आहे. येथे गुंतवणुकदार नियमित अंतराने ठराविक रक्कम गुंतवतात. ही रणनीती विशेषत: किफायतशीर पद्धतीने गुंतवणूक करू इच्छिणार्या लोकांमध्ये अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. ‘एसआयपी’ गुंतवणुकीसाठी एक सोयीस्कर मार्ग देते, त्यामुळे मर्यादित आर्थिक संसाधने असलेल्या गुंतवणूकदारांनाही बाजारात सहभागी होता येते. ही गुंतवणूक चक्रवाढ पद्धतीचा फायदा देतात, त्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीचा दीर्घकालीन वाढीचा फायदा मिळतो. तसेच गुंतवणूकदारांना त्यांच्या खरेदी किमतीची सरासरी काढण्यात ती मदत करते. बाजारातील अस्थिरतेचा प्रभाव त्यामुळे कमी होतो. या गुंतवणुकीने ६५ लाख कोटींचा टप्पा ओलांडल्याने भारताच्या आर्थिक परिदृश्यात म्युच्युअल फंड उद्योगाचे वाढते महत्त्व अधोरेखित होते. तसेच या उद्योगाची वाढ वित्तीय बाजारपेठेतील गुंतवणूकदारांचाही वाढता सहभाग दर्शवते. मजबूत म्युच्युअल फंड उद्योग बचतीला प्राधान्य देणारा ठरत आहे. मजबूत आणि अधिक स्थिर वित्तीय प्रणाली स्थापन करण्यात तो मोलाचे योगदान देत आहे. दीर्घकालीन वाढ आणि संपत्ती निर्मितीवर उद्योगाचे असलेले लक्ष, गुंतवणूकदारांना त्यांची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करणारे ठरत आहे.
वाढत्या क्रयशक्तीसह विस्तारणारा मध्यमवर्ग म्युच्युअल फंड उद्योगात आणखी वाढ करेल, अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गुंतवणूक सेवांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वाढता अवलंब, नवीन गुंतवणूकदारांना आकर्षित करून सुलभता आणि सुविधा वाढवेल, अशी अपेक्षा आहे. आर्थिक साक्षरता आणि समावेशनाला चालना देण्याच्या उद्देशाने सरकारी उपक्रम उद्योगाच्या वाढीला चालना देतील. वाढती जागरूकता आणि शिक्षणामुळे, गुंतवणूकदार सजग झाले आहेत. ते वैविध्यपूर्ण गुंतवणुकीसाठीचे मार्ग शोधत आहेत. ही गुंतवणूक व्यावसायिक संपत्ती व्यवस्थापनात झालेला सकारात्मक बदल अधोरेखित करणारी आहे. तसेच देशाच्या आर्थिक परिदृश्यात या उद्योगाचे महत्त्व दाखवणारी आहे.
भारतातील म्युच्युअल फंड, अन्य देशांप्रमाणेच, विविध गुंतवणूकदारांकडून मालमत्तांच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पैसे जमा करतात. गुंतवणूकदारांकडून गोळा केलेला निधी अनेक प्रकारे वापरला जातो, ज्याचा मुख्य उद्देश गुंतवणूकदारांना परतावा निर्माण करणे हा आहे. म्युच्युअल फंडांचा महत्त्वाचा भाग सार्वजनिकपणे व्यापार करणार्या कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवला जातो. इक्विटी म्युच्युअल फंडांचे उद्दिष्ट विविध क्षेत्रांतील कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवलवाढीचे आहे. सरकारी रोखे, तसेच कॉर्पोरेट बॉण्ड्स, डिबेंचर आणि ट्रेझरी बिले यांसारख्या निश्चित-उत्पन्न सिक्युरिटीजमध्येदेखील गुंतवणूक केली जाते. डेट म्युच्युअल फंड ही नियमित उत्पन्न देण्यासाठी विशेषत्वाने आखली आहेत. सामान्यतः इक्विटी फंडांपेक्षा ती तुलनेने कमी धोकादायक मानली जातात. त्यानंतरच, स्थिर परतावा शोधणार्या गुंतवणुकदारांसाठी ती अधिक योग्य ठरतील.
काही म्युच्युअल फंड अल्पकालीन वित्तीय बाजारात गुंतवणूक करतात. या गुंतवणुकी सामान्यत: कमी जोखमीच्या असतात. तसेच अधिक तरलता प्रदान करतात. अल्प-मुदतीचे गुंतवणूक पर्याय शोधत असलेल्या गुंतवणूकदारांसाठी या योग्य पर्याय असल्याचे मानले जाते. त्याचवेळी सोने किंवा इतर वस्तुंमध्ये थेट किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंडद्वारे गुंतवणूक केली जाते. गोल्ड म्युच्युअल फंड गुंतवणुकदारांना सोन्याच्या किमतींमध्ये परतावा मिळवून देतात. अनेक म्युच्युअल फंड विदेशी समभाग तसेच रोख्यांमध्येही गुंतवणूक करतात. त्यामुळे गुंतवणूकदारांना आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये संपर्क साधता येतो. हे विविधीकरण देशांतर्गत बाजारातील चढउतारांशी संबंधित जोखीम कमी करण्यास मदत करणारे ठरते. रस्ते, पूल आणि ऊर्जा सुविधांसारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यावरही काहींचा भर असतो. भारतात आज पायाभूत सुविधांसाठी विक्रमी तरतूद केली जात आहे. त्याचा फायदा होणारच आहे. त्याशिवाय नवोद्योग, खासगी कंपन्या यांच्यातही गुंतवणूक केली जाते. म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या संधींचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या मालमत्तेचा एक भाग रोख किंवा रोख समतुल्य ठेवतात, हे फार महत्त्वाचे आहे.
म्युच्युअल फंड भारतीय अर्थव्यवस्थेत भांडवलनिर्मिती सुलभ करून, आर्थिक समावेशनाला चालना देत आहेत. एकूणच आर्थिक विकासात त्यांचे योगदान महत्त्वाचे असेच. बचतीला मिळणारी चालना ही आर्थिक समावेशनासाठी अत्यंत आवश्यक अशीच आहे. त्याशिवाय या उद्योगाच्या वाढीमुळे भारत हे विदेशी गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक ठिकाण बनले आहे. आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड आणि विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार, अनेकदा भारतीय म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करतात, ज्यामुळे विदेशी भांडवल आणले जाते. या उद्योगाच्या विस्तारामुळे वित्त, विपणन आणि तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांमध्ये नोकर्या निर्माण होत असून, ही रोजगारनिर्मिती सर्वांगीण आर्थिक विकासात योगदान तर देत आहेच, त्याशिवाय ती जीवनमानही सुधारते आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाला पाठिंबा देऊन, आर्थिक समावेशनाला चालना देऊन आणि दीर्घकालीन गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन हा निधी भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देत आहे, हे निश्चित.