जागतिक स्तरावर भारत सर्वाधिक नोकऱ्या देणार! नियुक्तीबाबत कॉर्पोरेट्स आग्रही
10-Sep-2024
Total Views | 26
नवी दिल्ली : जागतिक स्तरावर भारतीय कॉर्पोरेटमध्ये सर्वाधिक नोकऱ्या देणार असून भारत, सिंगापूर आणि चीनमध्ये रोजगाराचा दृष्टीकोन चांगला आहे, असा निष्कर्ष एका सर्वेक्षणातून समोर आला आहे. सर्वेक्षणानुसार, देशातील उत्तर प्रदेश ४१ टक्के संभाव्यतेसह नोकऱ्यांच्या मागणीत आघाडीवर आहे, अशी बाब 'ManpowerGroup Employment Outlook Survey
2024'ने जाहीर करण्यात आलेल्या पाहणी अहवालातून समोर आली आहे.
दरम्यान, वर्ष २०२४च्या चौथ्या तिमाहीत जागतिक स्तरावर भारतीय कॉर्पोरेट नियुक्तीची भावना सर्वात मजबूत आहे. देशाच्या आर्थिक स्थितीबद्दल कंपन्या उत्साही असून ३७ टक्के नियोक्ते त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा विचार करत आहेत. देशातील निव्वळ रोजगार दृष्टीकोन जागतिक स्तरावर ३७ टक्के इतका मजबूत आहे. यानंतर ३६ टक्क्यांसह कोस्टा रिका आणि ३४ टक्क्यांसह अमेरिका अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यात बदल झालेला नाही. नियोक्ते नियुक्त करण्याचा हेतू देशाच्या आर्थिक परिस्थितीचा सकारात्मक दृष्टीकोन प्रतिबिंबित करतो जो मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांच्या विकासामुळे बहुपक्षीय परराष्ट्र धोरणांमुळे आणि निर्यातीमुळे मजबूत झाला आहे. भारतात लोकसंख्याशास्त्रीय फायदा असल्याने जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मकतेला चालना मिळेल, असा अंदाज मॅनपॉवर ग्रुप एमडी संदीप गुलाटी यांनी वर्तविला आहे.