मुंबई : गोव्यातील पेडणे गावचे रहिवासी असलेले मकबूल माळगिमनी हे गेल्या सहा वर्षांपासून गणेशोत्सवाचा सण साजरा करत आहेत. मूळचे कर्नाटकातील हुबळीचे हे कुटुंब गोव्यात स्थायिक झालेले आहे. प्रत्येक वर्षी ते त्यांच्या कुटुंबीयांसह हा उत्सव मनोभावे साजरा करतात. त्यांच्या या निर्णयाला त्यांच्याच मुस्लीम समाजामधून विरोध करण्यात आला होता, परंतु मकबूल माळगिमनी यांनी गणेशोत्सव हा सर्वधर्मींयाचा सण आहे, असे आदरपूर्वक निक्षून सांगितले.
मकबूल माळगिमनी यांच्या घरी साजरा होणाऱ्या गणेशोत्सवामध्ये सर्वधर्मीय लोक सहभागी होतात आणि आपुलकीने या सणाचा आनंद लुटतात. हा उत्सव एकतेचे प्रतिक असल्याचे मकबूल माळगिमनी यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या उत्साही वातावरणात त्यांच्या घरी संगीत, नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यांच्या परिवाराने या सणाच्या परंपरेत कधीही खंड पडू दिला नाही. शिवाय, त्यांच्या या उपक्रमामुळे गोव्यातील इतर धर्मीयांनाही गणेशोत्सवाबद्दल आदर निर्माण झाला आहे. तसेच हा उत्सव समाजात सद्भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, हेही मकबूल माळगिमनी यांच्या कुटुंबियांनी दाखवून दिले आहे.
"मी मुसलमान आहे पण मी सगळ्या धर्मांना मानतो. माझे जे पीर आहेत त्यांच्या शेजारी कमलेश्वरजी आहेत जे या गावचे ग्रामदैवत आहेत त्यांचीही मी पूजा करतो. मुसलमान असूनही मी गणेशपूजन करतो म्हणून बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटतं परंतु याचं कारण म्हणजे आमचे पूर्वजही गणेशपूजन करत होते. गणेशोत्सव साजरा करण्याचा मी जेव्हा विचार केला तेव्हा माझ्याच मुस्लीम समाजाकडून यासाठी विरोध झाला होता परंतु माझ्यासाठी मानवता हा सर्वांत मोठा धर्म आहे, असे मकबूल माळगिमनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगतात. तसेच जातीपातीवरून जे दंगे होतात ते कुठेतरी थांबले पाहिजे. प्रत्येक धर्म हा पवित्र आहे, त्यामुळे सगळ्या धर्मांचा आदर करणे हीच खरी मानवता आहे असेही ते पुढे म्हणाले.