गिरणी कामगारांच्या घरांचे एक वर्षाचे सेवाशुल्क माफ
07-Aug-2024
Total Views | 70
मुंबई :“पनवेलमधील कोन येथील गिरणी कामगारांच्या घरांसाठी 42 हजार, 135 रुपये इतके वार्षिक सेवाशुल्क आकारले आहे. हे सेवा शुल्क परवडणारे नसल्यामुळे ते कमी करावी,” अशी मागणी विजेत्या गिरणी कामगारांकडून वारंवार ‘म्हाडा’कडे करण्यात येत होती. याबाबत गृहनिर्माण विभागाने निर्णय घेतला असून एप्रिल 2024 ते मार्च 2025 या एका वर्षाचे शुल्क माफ करण्याबाबत मंजुरी दिल्याचे पत्र ‘म्हाडा’ला पाठविले आहे.
दरम्यान, ‘म्हाडा’ने यासंदर्भात दि. 15 जुलै रोजी गृहनिर्माण विभागाला ‘एमएमआरडीए’च्या कोन, पनवेल येथील ‘रेंटल हाऊसिंग योजने’अंतर्गत गिरणी कामगारांना मंजूर केलेल्या सदनिकांना आकारण्यात आलेल्या सेवाशुल्काबाबत पत्रव्यवहार करून गिरणी कामगारांच्या असणार्या मागणीबाबत पत्रव्यवहार केला होता. या प्रस्तावावर गृहनिर्माण विभागाने सकारात्मक निर्णय घेतला असून, ज्या गिरणी कामगारांनी मंजूर सदनिकेची संपूर्ण रक्कम डिसेंबरपर्यंत भरणा केली आहे .
अशा गिरणी कामगारांना, वारसांना दि. 1 एप्रिल 2024 ते दि. 31 मार्च 2025 या एक वर्षाच्या कालावधीचे सेवाशुल्क विशेष बाब म्हणून माफ करण्यास मंजुरी दिली आहे. दरम्यान, यासंदर्भात ‘म्हाडा’, गिरणी कामगार, गिरणी कामगार संघटना यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. तर गिरणी कामगार संघटनांनी राज्य सरकारकडे वारंवार पत्रव्यवहार केला होता. याबाबत गृहनिर्माण विभागाने निर्णय घेतला असून आता एक वर्षाच्या कालावधीचे हे सेवाशुल्क विशेष बाब म्हणून माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.