बांगलादेशी हिंदू गायकाचे घर जाळले; हजारो वाद्यांची राखरांगोळी!
07-Aug-2024
Total Views | 122
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Singer Rahul Ananda) बांगलादेशात झालेल्या हिंसाचारामुळे संपूर्ण जग हादरले. येथील इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून आंदोलनाच्या नावाखाली हिंदूना टार्गेट केले जात आहे. बांगलादेशातील गायक आणि जोलेर गान बँडचा अग्रगण्य राहुल आनंदा यांचे घर जाळल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. यात राहुल आनंदा यांनी स्वतः तयार केलेल्या हजारो वाद्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. सोमवार, दि. ५ ऑगस्टच्या दुपारी हा संपूर्ण प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.
मुळात राहुल आनंदा हे आपल्या कुटुंबियांसह भाड्याच्या घरात राहत होते. एका इस्लामिक कट्टरतावाद्यांच्या जमावाने त्यांच्या घरावर हल्ला केला. तेव्हा राहुल व त्यांचे कुटुंबीय घरातच होते. कसेबसे ते पळून जाण्यात यशस्वी झाले. सध्या ते एका अज्ञात स्थळी असल्याची माहिती मिळत आहे. राहुल आनंदा यांच्या घरात सुमारे ३ हजार न बदलता येणारी वाद्ये होती, जी त्यांनी वर्षानुवर्षे डिझाइन केली आणि बनवली होती. कट्टरत्यावाद्यांच्या हल्ल्यात या सर्वांची राखरांगोळी करण्यात आली आहे. राहुल आनंदा हे बांगलादेशचे प्रसिद्ध गायक असले तरी केवळ ते एक हिंदू होते म्हणून कट्टरतावाद्यांनी त्यांच्या घरावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.