सह्याद्री-कोकण भ्रमणमार्ग प्रदेशात ३२ वाघांचे अस्तित्व
06-Aug-2024
Total Views | 425
मुंबई (अक्षय मांडवकर) - महाराष्ट्र ते कर्नाटकपर्यंत विस्तारलेल्या सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्ग प्रदेशात (sahyadri konkan wildlife corridor) ३२ वाघांचा वावर असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील सह्याद्रीला केंद्रस्थानी ठेवून 'वाईल्डलाईफ काॅन्झर्वेशन ट्रस्ट'ने (डब्लूसीटी) कोल्हापूर वन विभाग आणि 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'च्या मदतीने तयार केलेल्या अहवाल कराडमध्ये पार पडलेल्या 'सह्याद्री व्याघ्र भूप्रदेश संवर्धन परिषदे'त प्रसिद्ध करण्यात आला (sahyadri konkan wildlife corridor). या अहवालात सह्याद्रीत मादी वाघ पिढ्यानपिढ्या प्रजनन करत असल्याची महत्त्वपूर्ण नोंद करण्यात आली आहे. (sahyadri konkan wildlife corridor)
सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गाचा विस्तार हा महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापासून दक्षिणेकडे कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पापर्यंत आहे. १० हजार ७८५ चौ.किलोमीटर क्षेत्रावर या भ्रमणमार्गाचा विस्तार पाहायला मिळतो. या भ्रमणमार्गच्या क्षेत्रामध्ये संरक्षित वनक्षेत्राबरोबरच खासगी आणि सरकारी मालकीच क्षेत्र, गाव, महामार्ग, रेल्वेमार्ग, धरण अशा अनेक गोष्टीचा समावेश आहे. त्यामुळे या भ्रमणमार्गात अनेक ठिकाणी आपल्याला खंड म्हणजेच 'गॅप' आणि अडथळे म्हणजेच 'बाॅटलनेक' दिसतात. अशा परिस्थितीत असलेल्या या भूभागामधील वाघांच्या संख्येचे अवलोकन करण्याचे काम 'डब्लूसीटी'ने वन विभागाच्या मदतीने २०२२-२३ या सालात केले. प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये हा अभ्यास केंद्रित होता आणि या अहवालातील गोवा व कर्नाटक राज्यातील वाघांची संख्या ही 'राष्ट्रीय व्याघ्र गणने'च्या अहवालामधून घेण्यात आल्याची माहिती 'डब्लूसीटी'चे वन्यजीव संशोधक गिरीष पंजाबी यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. कर्नाटकमधील १७ आणि गोव्यातील ५ वाघांची संख्या ही राष्ट्रीय व्याघ्र गणनेच्या अहवालानुसार नोंदवण्यात आली, तर महाराष्ट्रामधील १० वाघांच्या छायाचित्रांची नोंद आम्ही आमच्या अभ्यासातून केल्याचे त्यांनी सांगितले. ही संख्या केवळ भ्रमणमार्ग भूप्रदेशातील असून 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्प' किंवा 'राधानगरी वन्यजीव अभयारण्या'सारख्या संरक्षित वन क्षेत्रामधील वाघांच्या संख्येचा यात समावेश नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील १० वाघांचा विचार केल्यास ही संख्या केवळ भ्रमणमार्ग प्रदेशातील आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि राधानगरी वन्यजीव अभायरण्यात सद्यस्थितीत असलेल्या प्रत्येकी एक वाघाचा यात समावेश नाही. सह्याद्री-कोकण भ्रमणमार्ग प्रदेशामध्ये मादी वाघ या पिढ्यानपिढ्या प्रजनन करत असल्याचे समोर आले आहे. २०१५ साली याठिकाणी जन्मास आलेल्या एका मादी वाघिणीने याच भूप्रदेशात तीन पिल्लांना जन्म दिला आहे. हा भ्रमणमार्ग व्याघ्र स्थलांतराच्या दृष्टीने जिवंत असल्याची काही उदाहरण आहेत. जसे की, मे, २०१८ रोजी 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'मधील चांदोली अभयारण्यात आढळलेला 'टी-३१' हा नर वाघ मे, २०२० साली कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पात आढळून आला होता. तसेच २०१८ मध्ये महाराष्ट्रात टिपण्यात आलेली 'टीटी ७' नामक वाघीण जवळपास चार वर्षानंतर ३० जून, २०२१ रोजी गोव्यातील 'म्हादई अभयारण्या'त आढळली होती. त्यामुळे सह्याद्री-कोकण भ्रमणमार्ग हा वाघांच्या भ्रमणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याचे समोर आले आहे.
सह्याद्री-कोकण भ्रमणमार्गातील वाघांच्या संचाराविषयी काही महिन्यापूर्वी कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पामध्ये गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील वनधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत भ्रमणमार्गातील वाघांच्या हालचाली, संरक्षण आणि शिकारीसंदर्भात समन्वयावर आधारित चर्चा करण्यात आली. राज्याअंतर्गत होणाऱ्या वाघांच्या हालचालींबाबत समन्वय साधण्यासाठी लवकरच समाजमाध्यमावरील वाॅट्सअॅपवर वनधिकाऱ्यांचा गट तयार करण्यात येणार आहे. त्याठिकाणी माहितीची देवाण-घेवाण केली जाईल. - मणिकंदन रामानुजम, मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर (प्रादेशिक)