सकल समाजासाठी प्रेरणादायी

    05-Aug-2024   
Total Views |
avinash shinde


प्रतिकूल परिस्थितीची कोणतीही कटुता मनात न ठेवता, अविरत सेवाकार्य करणारे अरविंद शिंदे. भंडारा जिल्ह्यातील गावखेड्यातून आलेल्या शिंदे यांच्या विचारकार्याचा घेतलेला हा मागोवा...

"ए अकेला इस शहर मे अबुदाना धुंडता हैं आशियाना धुंडता हैं,” अशी गावखेड्यातून शहरात आलेल्या बहुसंख्यांची मनस्थिती होते. या पार्श्वभूमीवर खेड्यातून शहरात येत, कल्याण शहरालाच आपलेसे करणारे अरविंद शिंदे. 21 वर्षांपूर्वी डोळ्यांत स्वप्न आणि खिशात 174 रुपये घेऊन कल्याण येथे आलेले अरविंद शिंदे आज ‘रोटरी क्लब ऑफ कल्याण डायमंड’चे अध्यक्ष आहेत. सुभेदार कट्टा संस्थापक सचिव ‘विदर्भ सिटिझन फोरम’ संस्थापक अध्यक्ष ‘लिगल अवेरनेस वेल्फेअर असोसिएशन’ संस्थापक सचिव ‘अखिल महाराष्ट्र भाट समाज संघटने’चे राज्य सचिव आहेत शिंदे फाऊंडेशनचे ते संस्थापक- अध्यक्ष आहेत.

ते समाजासाठी पर्यावरण शैक्षणिक आणि आर्थिक सबलतेसाठी विविध उपक्रम राबवतात. कचरावेचक पालकांच्या पाल्यांचा आणि इतर गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचा खर्च ते करतात. तसेच सहकारी संस्था, सोसायटीमध्ये अरविंद  कायद्याची तसेच पर्यावरणाची जागृती करतात. भाट समाजातील हुशार विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शिष्यवृत्ती योजनाही कार्यान्वित केली. नैसर्गिक आपत्तीमध्ये तन, मन, धन अर्पून त्यांनी समाजासाठी काम केले.

शिंदे कुटुंब मुळचे भंडारा जिल्ह्यातील निलज गावचे. भाट समाजाच्या सोमेश्वर आणि प्रभावती यांना चार अपत्ये. त्यांपैकी एक अरविंद. घरची गरिबी. दगडाच्या खाणीत दगड फोडायला जाणे, दुसर्‍याच्या शेतात मजुरी करणे अशी काम करून प्रभावती यांनी मुलांना वाढवले. त्या अरविंद यांना सांगत “बाळा, आपण गरीब आहोत, पण आपल्यापेक्षाही अनेकजण खूप गरीब आहेत. त्यांना एकवेळचे अन्नही मिळत नाही. आपल्यापेक्षा त्यांचा संघर्ष मोठा आहे. त्यांना नेहमी मदत करायची.” पवनापासून बाबा आमटे यांचे ‘आनंदवन’ जवळच होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत शाळेतर्फे ते श्रमदानअनुभव अभ्यासाला तेथे जायचे. ‘आनंदवन’ तसेच आजूबाजूच्या खेड्यातल्या वनवासी लोकांची परिस्थिती पाहून अरविंद यांना वाटायचे की ’खरेच जगात आपल्यापेक्षाही जास्त दुःख असणारे लोक आहेत.’ अरविंद यांचा प्रकाश आमटे आणि ‘आनंदवन’ यांच्याशी बालपणापासूनच स्नेह जुळला. पुढे माध्यमिक शिक्षणासाठी शिंदे कुटुंब पवनी तालुक्यात राहायला आले.

अरविंद पुस्तकांच्या दुकानात काम करून शिक्षण घेऊ लागले. काम करून त्यांनी विज्ञान शाखेमधून ‘झुओलॉजी’ विषयात पदवी मिळवली. या काळात प्रभावती यांना क्षयरोग झाला, त्या अंथरूणाला खिळल्या. मग बहीण पुष्पाने आईची जागा घेत घर-कुटुंब सांभाळले. महत्प्रयासाने आई बरी झाली. आई आणि बहिणीचे प्रेम, त्यांची माया पाहून अरविंद यांनी मनात ठरवले की, आईला राबतानाच पाहिले, दुःख, कष्टापेक्षा वेगळे काही जगात असू शकते, हे तिला महिती नव्हते, तर आई आणि बहिणीला यापुढे तरी सुखाचे दिवस येतील, असे काहीतरी करायचे. हे सत्यात उतरवायचे होते. त्यासाठी ते कामासाठी मुंबईला आले. चुलत भाऊ दिनेश शिंदे यांनी त्यांना सहकार्य केले. अरविंद यांना महावितरणमध्ये नोकरी मिळाली. 90च्या दशकात वेतन काही खूप नव्हते. पण, काटकसर करत अरविंद यांनी छोट्या बहिणीचे लग्न लावले, भावांचे शिक्षण पूर्ण व्हावे, यासाठी प्रयत्न केले.

आईला कल्याणला आणले. सगळे सुरळीत व्हावे, यासाठी अर्थार्जन वाढणे गरजेचे होते. मग अरविंद दिवसा महावितरणमध्ये नोकरी करत आणि रात्री कल्याण खाडी परिसरात लस्सी विकत. हे सगळे करत असताना शहरातील सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत यांच्याशी संपर्क कायम ठेवला. फावल्या वेळेत त्यांनी समाजोपयोगी कामामध्ये स्वतःला झोकून दिले. समाजासाठी काम करताना त्यांना जाणवले की, सहकार क्षेत्र, कायद्याचे क्षेत्र याबाबत सामान्य माणसाला बर्‍याच अडचणी असतात. त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. या जाणिवेतूनच मग अरविंद शिंदे यांनी ‘बॅचलर ऑफ सोशल वर्क’, ‘मास्टर ऑफ सोशल वर्क’, ‘जीडीसीए’, ‘डिप्लोमा इन कॉपरेटिव्ह मॅनेजमेंट’, ‘डिप्लोमा इन लेबर लॉ’, ‘एलएलबी’पर्यंत शिक्षण पूर्ण केले. प्रामाणिक, निस्वार्थी सामाजिक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख शहरात निर्माण झाली.

अरविंद यांना विचारले की, आनंदाचा क्षण कोणता, तर ते सांगतात की, कल्याण डंपिग ग्राऊंडमधील मुलांना शाळेमध्ये प्रवेश मिळवून देत त्यांच्यात शिक्षणाबद्दल प्रेम निर्माण केले. आयुष्यात काहीतरी बनण्याची त्यांच्यात जेव्हा इच्छा निर्माण झाली, तो आनंदाचा क्षण आणि दुसरा आनंदाचा क्षण म्हणजे आठ महिने कोमामध्ये गेलेली आई शुद्धीत आली, तो दिवस! त्यांच्या आईवर डायलिसीसचे उपचार सुरू होत असताना ती कोमात गेली. ती शुद्धीत येणारच नाही, असे सगळ्यांचेच म्हणणे. त्यावेळी आयसीयूमध्ये कोमामध्ये असलेल्या आईला एकटे वाटू नये म्हणून अरविंद यांनी तिला घरी आणले.

घरातच आयसीयू युनिट बनवले. घरातच डायलिसीस सेंटर तयार केले. आठ महिने आई कोमात होती. तिने एकदातरी शुद्धीत यावे, असे अरविंद यांना वाटे. आठ महिन्यांनी दि. 29 नोव्हेंबरला आई शुद्धीत आली. अरविंद आणि कुटुंबीयांना पाहून ती खूप आनंदाने हसली. ते हास्य म्हणजे अरविंद शिंदे यांच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण! तर अशा या अरविंद शिंदे यांचे विचारकार्य भाट जातीसाठीच नव्हे, तर अवघ्या समाजासाठी प्रेरणादायी आहे.

9594969638

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.