मुंबई : कोकण पदवीधर मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आल्याबद्दल आमदार निरंजन डावखरे यांचा दिलीप जाधव यांच्या अष्टविनायक निर्मिती संस्थेकडून सत्कार करण्यात आला. गडकरी रंगायतनमध्ये 'आज्जीबाई जोरात' या नाटकाच्या सुरुवातीलाच सुप्रसिद्ध कलाकार निर्मिती सावंत, पुष्कर श्रोत्री, मुग्धा गोडबोले, जयवंत वाडकर, अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे, मुंबई हाऊसिंग फेडरेशनचे संचालक डॉ. विशाल कडणे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत निर्माते दिलीप जाधव यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा संपन्न झाला.
बदलत्या युगात मोबाईलचे कृत्रिम तंत्रज्ञान तसेच रेडिमेड बुद्धिमत्ता यांचा अतिक्रमण सर्वत्र झाले, घराघरातील बालमानाचा ताबा या मोबाईलने घेतला आहे, यावर मात करण्यासाठी एक थेरपी म्हणून आज्जीबाई जोरात हे नवे महाबालनाट्य व्यावसायिक रंगभूमीवर लोकप्रिय झाले आहे. दरम्यान, महाराष्ट्र शासनाने या नाटकाचे विशेष महत्त्व ओळखून हे नाटक दत्तक घ्यावे या विशेष मागणीसाठी निर्माते दिलीप जाधव प्रयत्नशील आहेत.
यावेळी कलाकार शिष्टमंडळाने नाट्यनिर्माते दिलीप जाधव यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांची सविस्तर चर्चा निरंजन डावखरे यांच्यासोबत केली. यात प्रामुख्याने मराठी नाट्यसृष्टीस लघु उद्योगाचा दर्जा मिळावा, बालनाट्यांचे अनुदान ५० हजारांहून अधिक करावे, प्रलंबित अनुदानाची प्रकरणे तातडीने मार्गी लावावी आदी मराठी नाट्य क्षेत्रास भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांसाठी आमदार निरंजन डावखरे यांनी पुढाकार घ्यावा अशी विनंती दिलीप जाधव यांच्या नेतृत्वाखाली केली गेली. तसेच, या सर्व मागण्यांसाठी सकारात्मक भूमिका घेऊन लवकरच शासन दरबारी हे सर्व प्रश्न तातडीने लावून धरेन असे आश्वासन आमदार निरंजन डावखरे यांनी दिले.
याशिवाय या चर्चेदरम्यान 'आज्जीबाई जोरात' या महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या मराठी भाषेचा प्रखर पुरस्कार करणाऱ्या नाटकास सांस्कृतिक आणि शालेय शिक्षण खात्याकडून राजाश्रय मिळावा, अशी मागणी निर्माता दिलीप जाधव यांनी केली. सर्व प्रश्न आणि मागण्यांवर प्रामुख्याने लक्ष घालून लवकरात लवकर शासन दरबारी निकाली काढण्याचे आश्वासन निरंजन डावखरे यांनी दिले.