मुंबई : गुजरातमध्ये चांदीपुरामुळे ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत चांदीपुरा आजाराचे ५३ रुग्ण सापडले असून १ रुग्ण महाराष्ट्रातील आहे. त्यामुळे महाराष्ट्रदेखील आता अलर्ट मोडवर आहे. सॅन्डफ्लाय माशीमुळे होणाऱ्या या आजाराचा ९ महिने ते १५ वर्षापर्यंतच्या मुलांना अधिक धोका असतो. तरी ४० टक्के इतका या आजारात मृत्यू दर नोंदवला गेला आहे. मात्र एखाद्या रुग्णाला या आजाराची बाधा झाल्यास ४८ तासात ही मृत्यू होण्याची शक्यता असते.
मात्र हा आजार साथीचा आजार नाही, पंरतु एखाद्या संक्रमित मुलाला चावलेली माशी दुसऱ्या सुदृढ मुलाला चावली, तर त्या निरोगी बालकालाही संसर्ग होऊ शकतो. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, हा आजार मुख्यत ग्रामीण आणि आदिवासी भागात आढळतो. पण सध्या शहरी भागातील झोपडपट्टीमध्ये देखील रुग्णांचे प्रमाण आढळून येत आहे.
'चांदीपुरा आजार' नाव कसे पडले?
१९६५ मध्ये महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील चांदीपुरा भागात देशात पहिल्यांदा रुग्णांच्या रक्तजल नमुन्यातून या आजाराची माहिती मिळाली. त्यामुळे 'चांदीपुरा आजार' म्हणून त्याला ओळखले जाऊ लागले. २००४-०६ आणि २०१९ साली या आजाराने आपले बस्तान आंध्रप्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधील काही भागात बसवले. त्यामुळे चांदीपुरा भाग आणि चांदीपुरा आजार हा अनेकांना परिचयाचा झाला.
सॅन्डफ्लाय माशी कशी ओळखायची?
सॅन्डफ्लाय माशी डासांपेक्षा लहान असून तिचा रंग वाळूसारखा भुरकट असतो. माशीचे पंख केसाळ असतात. भारतात या माशींच्या ३० प्रजाती आढळतात. तसेच या माशीचा आकार १.५ ते २.५ मिलिमीटर येवढा असता. त्यामुळे त्या क्वचितच डोळ्यांनी दिसतात. या मातीतल्या माश्या रात्रीच्या वेळी जास्त क्रियाशील असतात. या माश्या गळक्या घरांमध्ये किंवा मातीच्या घरांमधील भेंगामध्ये आढळतात.
आजाराची लक्षणे
उच्च दर्जाचा ताप,उलट्या होणे,निद्रानाश,अर्ध चेतन अवस्था, काही तासांत कोमात जाणे, त्वचेवर वाढलेल्या खुणा
आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी
- घर आणि परिसर स्वच्छ ठेवा.
- उकिरडा गावापासून दूर ठेवावा.
- मच्छरदाणीत झोपावे.
- राहत्या घराच्या परिसरात चांगली स्वच्छता ठेवावी आणि पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
- डास आणि माशांचा उपद्रव होऊ नये म्हणून काळजी घ्यावी.
- घरातील भिंतीच्या भेगा बुजविणे
आरोग्य विभागाने सॅन्डफ्लाय या माश्यांची उत्त्पतीस्थानांची विल्हेवाट लावत लोकांमध्ये जागृकता निर्माण केली पाहिजे. तसेच शासनाने प्रत्येक जिल्हानिहाय या आजारासंदर्भात केंद्रांची निर्मिती करायला हवी. सध्या या आजाराचे निदान एनआयव्हीमध्ये होते. परंतु निदान केंद्राची निर्मिती व्हायला हवी, जेणेकरून संशयित रुग्णांची लगेच तपासणी केली जाऊ शकते. तसेच रुग्णांना विशेष खाटांची सोय उपल्बध करून देणे गरजेचे आहे.
डॉ . अविनाश भोंडवे (इंडियन मेडिकल असोसिएशनचे, माजी अध्यक्ष)