सध्या पाकिस्तानात माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या राजकीय पक्षावर बंदी घालण्यात आली असल्याने, पाकिस्तानात लोकशाही फक्त नावापुरतीच उरलेली आहे. ती आधीही नव्हतीच परंतु, शहबाज शरीफ सरकारने आपले राजकीय शत्रू संपविण्याचा विडा उचलल्याने, इमरान यांना आता ना निवडणूक लढवता येईल, ना पक्ष चालवता येईल. जगभरात नाचक्कीची परमोच्च सीमा गाठली असताना, त्याची चिंता पाकिस्तानला आधीही नव्हती आणि आताही नाही.
आताही पाकिस्तानच्या नाचक्कीची आणखी एक घटना समोर आली आहे. संयुक्त अरब अमिरात अर्थात यूएई आणि सौदी अरेबिया, या आखाती देशांनी आता त्यांच्या देशातील पाकिस्तानी कामगारांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. यूएईमध्ये तब्बल 50 टक्के गुन्हे हे पाकिस्तानी नागरिक करत आहेत, तर सौदीे अरेबिया पाकिस्तानातून येणार्या भिकार्यांमुळे हैराण झाले आहे. विशेष म्हणजे, हा खुलासा यूएई आणि सौदी अरेबियाने केला नाही, तर खुद्द पाकिस्तानी संसदेच्या समितीत करण्यात आला आहेत.
पाकिस्तानी अधिकार्यांनी ही माहिती पाकिस्तानी संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या , सिनेटच्या परदेशी पाकिस्तानींसाठी स्थापन केलेल्या समितीला दिली आहे. यूएईसारखे देश पाकिस्तानातून येणार्या कामगारांविषयी अजिबात समाधानी नाहीत. त्यामुळे आता पाकिस्तानी कामगारांना कामासाठी बोलावण्याऐवजी, बांगलादेशमधील नागरिकांना कामासाठी प्राधान्य दिले जात आहे. यूएईतील 50 टक्के गुन्ह्यांमध्ये, पाकिस्तानी नागरिकांचा समावेश असल्याचे आढळले आहे. ज्यामुळे यूएई चिंतित आहे. पाकिस्तानी नागरिकांच्या गैरवर्तनामुळे यूएई त्रस्त असून, पाकिस्तानी दुबईसारख्या शहरात महिलांचे विनापरवाना व्हिडिओ बनवत असल्याचे प्रकारही समोर आले आहे.
यूएईसोबतच इराक आणि सौदी अरेबियासुद्धा पाकिस्तानी नागरिकांना वैतागला आहे. पाकिस्तानातून येणार्या भिकार्यांमुळे सौदी अरेबिया आणि इराक त्रस्त झाले असून, तेथील अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर 2023 मध्ये काही नागरिक हजला गेले आणि तिथेच भीक मागू लागले. सौदी अरेबियासह आखाती देशांमध्ये पकडलेल्या भिकार्यांपैकी, जवळपास 90 टक्के पाकिस्तानी असल्याचेही समोर आले आहे. पाकिस्तानी लोकांना नवीन तंत्रज्ञानानुसार काम करता येत नसल्याचे समितीमध्ये सांगण्यात आले. त्यामुळे या देशांमध्ये पाकिस्तानी नागरिकांची मागणी कमी होत आहे. त्यामुळे अशा कामगारांना प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे समितीकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पाकिस्तानी भिकार्यांचा सौदी अरेबियात जाण्याचा मुद्दा यापूर्वीही अनेकदा उपस्थित झाला आहे. समितीने जानेवारी 2024 मध्ये, पाकिस्तानी भिकार्यांचा सौदी अरेबियात प्रवेश रोखण्यासही पाकिस्तान सरकारला सांगितले होते. यापूर्वी ऑक्टोबर 2023 मध्ये सौदी अरेबियाला जाण्याचा प्रयत्न करणार्या, 24 भिकार्यांना पकडण्यात आले होते.सौदी अरेबियातील मशिदींमध्ये पाकिस्तानी, पाकीटमारांसारखे फिरत असल्याचे यापूर्वीही समोर आले आहे. आखाती देशातील लोक या सगळ्याला कंटाळले आहेत, आणि आता ते पाकिस्तानी लोकांना कामावर ठेवत नाहीत. पाकिस्तान मोठ्या प्रमाणावर बाहेरून येणार्या पैशांवर अवलंबून आहे, त्यामुळे ही बाब त्याच्यासाठी चिंतेची आहे.
दहशतवादामुळे आधीच पाकिस्तानने जगाला पोखरण्याचे काम केले आहे. स्वतः पेरलेल्या दहशतवादाचे परिणाम पाकिस्तानला स्वतःला देखील भोगावे लागत आहेत. मात्र, आता दहशतवाद्यांप्रमाणेच पाकिस्तानी नागरिक अन्य देशांना विनाशस्त्रही त्रासदायक ठरू लागले आहे. आपण दुसरीकडे कामासाठी गेल्यानंतर देशाच्या नावाला बट्टा लागणार नाही, याची काळजी पाकिस्तानी घेतील अशी अपेक्षाही नाही. मात्र, अन्य देश म्हणजे पाकिस्तान नाही, हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. चीनच्या हातचे बाहुले झालेल्या पाकिस्तानला, नाचक्की आता नवीन गोष्ट राहिलेली नाही. पूर्वी तेथील सरकारमुळे पाकिस्तानची नाचक्की होत होती. आता मात्र चित्र अगदी उलटे आहे. आता पाकिस्तानी नागरिकांच्या कुरापतीमुळे अन्य देशही त्रस्त असून, पाकिस्तानच्या इज्जतीचा पंचनामा खुद्द पाकिस्ताननेच केला आहे.
7058589767