संविधान जागर यात्रा

    31-Aug-2024   
Total Views |
sanvidhan jagar yatra


देशभर संविधानाचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्ताने संविधानप्रेमी कार्यकर्त्यांनी ‘संविधान जागर समिती’ स्थापन केली आणि महाराष्ट्रभर ‘संविधान जागर यात्रा’ सुरू केली आहे. महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्यापासून सुरू झालेल्या यात्रेची सांगता दि. 6 सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. या यात्रेत खरा संविधानविरोधी राजकीय पक्ष कोणता, याची पुराव्यांसकट मांडणी करून भोळ्याभाबड्या समाजाला जागृत केले जात आहे. त्यानिमित्ताने यात्रेचा सारांश मांडणारा हा लेख...

देशात 2014 साली भाजपचे राज्य आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 26 नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला. आपण संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करतो. मात्र, आपण जी उद्देशिका वाचतो, ती डॉ. बाबासाहेबांनी लिहिलेली मूळ उद्देशिका नाही. कारण, काँग्रेसच्या इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळात डॉ. आंबेडकरांनी लिहिलेल्या उद्देशिकेला बदलून नव्याने तयार केलेली उद्देशिका संविधानात टाकली. हाच खरा तर संविधानाचा आणि आमच्या महामानव डॉ. बाबासाहेबांचा अपमान. मात्र, आपण वाचत असलेली उद्देशिका ही इंदिरा गांधींनी बदललेली उद्देशिका आहे, हे आपल्या गावीही नसते. मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस, शरद पवार गट ते उद्धव ठाकरे गट सगळ्यांनी या ना त्या मार्गाने लोकांना सांगितले की, ‘भाजप बहुमताने सत्तेत आला, तर संविधान बदलेल, आरक्षण काढून टाकेल, मागासवर्गीय समाजावर अत्याचार करण्यासाठी हुकूमशाही आणतील, ‘मनू’चे राज्य आणतील’ वगैरे वगैरे.

सत्य समाजासमोर यावे म्हणून महाराष्ट्रातील संविधानप्रेमी कार्यकर्त्यांनी ’संविधान जागर समिती’ स्थापन केली आणि संविधान जागर यात्रा सुरू केली. महाड चवदार तळे येथून सुरू झालेली यात्रा किल्ले रायगड, पतित पावन मंदिर, शाहू महाराज स्मारक, महात्मा फुले स्मारक, लहुजी साळवे स्मृतिस्थळ, दीक्षाभूमी, काळाराम मंदिर, चैत्यभूमी असे सलग 30 दिवस चालणार आहे. संविधानविषयक जागृती, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रयत्न, देशाच्या उभारणीत संविधानाचे योगदान, यासोबतच त्याचा झालेला गैरवापर, 1975 ते 1977 अशी दोन वर्षे त्याच्याऐवजी आलेला ‘मिसा’ कायदा म्हणजे एक अर्थाने आपल्या संविधानाचाच खून करण्याचा झालेला प्रयत्न व बौद्ध समाजात पसरविले जात असलेले अनेक गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न या यात्रेद्वारे केला जाणार आहे. महाराष्ट्रातील शेकडो एससी, एसटी, व्हीजेएनटी,ओबीसी, इड्ब्ल्यूएस, ओपन समाजांतील दलित, वंचित, शेतकरी, विद्यार्थी, युवा व महिला संघटना या यात्रेला पाठिंबा देत आहेत.

या यात्रेत श्रद्धेय दादासाहेब गायकवाड, बाळासाहेब साळुंखे, सिधनाक इनामदार अशा अनेक समाजसुधारकांचे प्रत्यक्ष वंशज सहभागी होत आहेत. या यात्रेसंदर्भात संबंधितांशी चर्चा केली. त्यानंतर वाटले की, आता समाजाला फसवणे कुणाच्या बापालाही शक्य नाही! भोळाभाबडा समाज आणि त्याचे नेतृत्व आता जागृत होत आहे आणि बदलत आहे. समाज बदलत आहे, संविधान खर्‍या अर्थाने जाणत आहे.

दलित-मुस्लीम भाई भाई: एक थोतांड!

शरीयत कायदा सोडून संविधान स्वीकारण्याचे काम जर यापुढे मुस्लिमांना जमणार नसेल, तर ‘संविधान जागर समिती’ हे काम करेल. कारण, या देशात राहायचे तर बाबांनी दिलेल्या संविधानाला मानलेच पाहिजे. संविधानाची शक्ती आम्हाला माहिती आहे. त्यामुळे भाजप बहुसंख्य मतांनी सत्तेत आला तर संविधान बदलेल, या काँग्रेसच्या खोट्या प्रचाराचा निषेध करावा तितका थोडा आहे. संविधानामध्ये सगळ्यात जास्त छेडछाड काँग्रेसनेच केली. ‘संविधान जागर यात्रे’दरम्यान आम्ही संविधानाची सार्वभौम शक्ती समाजासमोर मांडत आहोत. काँग्रेसच्या खोट्या विचारांचा पर्दाफाश करत आहोत. काँग्रेसने आजन्म आमच्या बाबासाहेबांचा दुस्वास केला, त्यांना त्रास दिला. दुसरे असे की, खरे म्हणजे आमच्या मागासवर्गीय समाजाची दिशाभूल करण्यासाठी ‘दलित-मुस्लीम भाई-भाई’ असे काही स्वार्थी नेते आणि लोक म्हणत असतात. आमचा समाज भोळा आहे, भाबडा आहे. तो अशा खोट्या बहकाव्यात येतो. पण, वास्तव काय आहे, तर आज महाराष्ट्रभर मुस्लिमांकडून मागासवर्गीय समाजावर वारंंवार हल्ले होत आहेत. मुस्लीम समाजाकडून मागासवर्गीय महिलांवर व समाजावर वारंवार हल्ले होत असतील, तर आता आम्हाला त्यांच्यासोबत राहण्यात कोणतेही स्वारस्य नाही. दलित-मुस्लीम भाई भाई थोतांड आहे.
-नितीन मोरे, अध्यक्ष-संस्थापक, जय भीम आर्मी


संविधानाची ताकद सांगणारी ‘संविधान जागर यात्रा’

भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणजेच संविधानाचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे आणि या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ’संविधान जागर समिती’ गठित केली. संविधान जागर यात्रा 2024 दि. 9 ऑगस्ट ते दि. 6 सप्टेंबर रोजी क्रांतिभूमी महाड ते चैत्यभूमी अशी करण्याचे योजिले. या संविधान जागर समितीचा संयोजक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात संविधानाचा जागर करणार्‍या ऐतिहासिक रथाचा एक वाहक होण्याचे भाग्य मला लाभले! काँग्रेसी खोट्या प्रचारामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये खरंच अनेक गैरसमज होते व आहेत. हेच गैरसमज दूर करणारे प्रभावी माध्यम म्हणून येणार्‍या काळात ’संविधान जागर यात्रा’ संपूर्ण देशासाठी दिशादर्शक आणि भारताला सशक्त करणारी असेल असे मला वाटते. आंबेडकरी समाजातातून संविधान जागर यात्रेचे ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे, येणार्‍या काळात निश्चितच ही संविधान जागर यात्रा समाजातील गैरसमज दूर करण्यास साहाय्यभूत ठरेल! नव्हे त्याचा प्रत्यय येत आहे.
- नागसेन पुंडगे, समाजअभ्यासक, सामाजिक कार्यकर्ता


काँग्रेस पक्षाचा खोटारडेपणा!

एकीकडे संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस आणि त्यांचे सोबती ‘भाजप संविधान बदलणार आहे’ अशा अफवा पसरवून दलित समाजात भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत. खरे तर काँग्रेसच्या इंदिरा गांधींनी जेव्हा देशात आणीबाणी लादली, तेव्हा तो संविधान हत्येचा पहिला प्रयत्न होता. संसदेमध्ये बहुमत नसताना, संसदेत विरोधी पक्षाचे कोणीही हजर नसताना हा निर्णय घेण्यात आला. काँग्रेसचे हे कृत्य संविधानविरोधी होते, हे समाज विसरला आहे. याचा फायदा घेत ‘भाजप संविधान बदलणार’ अशा अफवा पसरवून काँग्रेस पक्ष आपली गेलेली सत्ता पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. हे समाजाच्या लक्षात आणून देण्यासाठी मी या यात्रेत सहभागी झालोे. कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही, असा प्रश्न माझ्या महार समाजाला पडला आहे. त्या प्रश्नांचे अधिकृत उत्तर देण्यासाठी या जागर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील समाजाची परिस्थिती जाणून घेण्याची संधी मिळाली. सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना भेटण्याची संधी मिळाली, त्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांना संविधानाबद्दल जागरूक करणे आणि अफवा पसरवणार्‍यांना सडेतोड उत्तर देण्याची संधी म्हणजे ही संविधान जागर यात्रा आहे.
- आकाश अंभोरे, फुले- शाहू-आंबेडकर यांच्या राष्ट्रीय विचारांचे समर्थक


काँग्रेस पक्षच खरा संविधानविरोधी!

2014 साली सामान्य कुटुंबातील व्यक्ती नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. राज्यात साडेतीन टक्के लोकसंख्या असणार्‍या समाजाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी बनले आणि काँग्रेसची 70 वर्षांची घराणेशाही उलथून गेली. हे सहन झाल्याने काँग्रेसने खोटा प्रचार केला - ‘भाजप संविधान बदलणार, मनूचे राज्य येणार.’ खरे तर इंदिरा गांधींसारखाच संविधानाचा खून करण्याचा प्रयत्न राजीव गांधींनीदेखील केला. सर्वोच्च न्यायालयाने शहाबानोला पोटगीरुपी न्याय दिला होता. मात्र, राजीव यांनी संविधानविरोधात जाऊन सर्वोच्च न्यायालयाला निर्णय बदलायला लावला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते की, काँग्रेस हे जळतं घर आहे. त्यात उडी मारू नका, तरी आमची भोळी जनता या खोट्या अपप्रचाराला बळी पडली. खरं काय आणि खोटे काय, हा फरक स्पष्ट करण्यासाठी ही संविधान जागर यात्रा संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त काढली आहे.
योजना ठोकळे, अध्यक्ष, आधार महिला संस्था कौशल्य विकास केंद्र


काँग्रेसच्या काळातच संविधानात सर्वाधिक बदल

काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात इंदिरा गांधींनी 42वी घटना दुरुस्ती करून सर्व संविधानातील लोकशाहीच बदलून टाकली व आणीबाणी लावली.जेव्हा बाबासाहेबांनी हिंदू महारांना धम्म दिला, तेव्हा पंडित नेहरूंनी सर्वप्रथम नवबौद्धांचे आरक्षण बंद करण्यासाठी दुरुस्ती केली होती. त्यांचे वंशज ‘भाजप संविधान बदलणार’ असा गैरसमज पसरवत आहेत, म्हणून सत्य जनतेसमोर मांडण्यासाठी ही जागर यात्रा आहे. ज्यांना 64 वर्षं देशावर राज्य करताना 26 नोव्हेंबर रोजी ‘संविधान दिन’ महोत्सव म्हणून साजरा व्हावा, हे कधी सुचले नव्हते, तेच अमृतमहोत्सवी अपप्रचार करून करत आहेत असे हे लोक ’संविधान खतरे मे’ म्हणत आहेत. ते संविधान मानत अजिबात नाहीत. देशात राहून संविधान न माननारे हे लोक देशविघातक, जातीय द्वेष पसरवत आहेत. खरे तर कॉाग्रेसच्या काळातच संविधानात सर्वाधिक बदल झाले.
- स्नेहा भालेराव, घे भरारी संस्था, अध्यक्ष


संविधान हे सर्वशक्तीमानच!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्मित संविधानाला 75 वर्षं पूर्ण होत आहेत. या अमृतमयी प्रसंगी देशात एकतेचे उत्साहाचे, आनंदाचे वातावरण अपेक्षित आहे. मात्र, सध्या देशात काही लोक याउलट वातावरण निर्माण करत आहेत. ‘संविधान बदलले जाणार’ अशी हाकाटी राजकीय हेतूने प्रेरीत होऊन पिटत आहेत. पण, प्रश्न असा आहे की, खरंच भाजप संविधान बदलणार आहे का? किंवा, संविधान बदलले जाऊ शकते का? याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. हे संविधान संपूर्ण देशाच्या संपूर्ण हिताचे रक्षण करते. असे संविधान कमकुवत कसे असू शकेल? उद्या भविष्यात या संविधानांवर हल्ले होऊ शकतात आणि संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, याची कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही होती. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या चतु:सूत्रीवर अधारित असलेले मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य याच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी बाबासाहेबांनी घेतली आहे. यासाठी संविधानात त्यांनी अनुच्छेद 139(1) (2) (3) (4) तशी स्पष्ट तरतूद केली आहे, तसेच घटना दुरुस्ती च्या अनुच्छेद 368 (3) (4) मध्ये ही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, कोणत्या स्थितीत मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य यामध्ये कोणतीही छेडछाड करता येणार नाही. या बाबीचे रक्षण करण्याची जबाबदारी कोर्टाच्या खांद्यावर टाकली आहे. त्यामुळे संविधान बदल सहजासहजी शक्य नाही. संसदेतील बहुमत 400 काय, 500 पर्यंत गेले तरी संविधान बदलता येणार नाही. संविधान जागर यात्रेनिमित्त हे सत्य आम्ही समाजासमोर मांडत आहोत. समाजाला संविधानाची शक्ती समजावी यासाठी आम्ही प्रयत्न करतो.
अ‍ॅड. विजय गव्हाळे, संस्थापक- अध्यक्ष, बौद्ध युवक संघ


राष्ट्रद्रोही लोकांचा डाव आम्ही बाबासाहेबांची लेकरं हाणून पाडू!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, ते प्रथमही भारतीय आहेत आणि अंतिमही भारतीयच आहेत. बाबासाहेबांच्या विचारांनुसार, आम्ही सगळे भारतीय असून, या देशाच्या प्रगतीसाठी सर्वंकष प्रयत्न करू. ते संविधानाचे पालन केल्यानेच शक्य आहे. मात्र, भारतीय संविधानाबद्दल काही विघातक शक्ती सध्या डोके वर काढत असून, त्यांनी संविधानाची बदनामी चालवली आहे. केवळ सत्ता मिळावी म्हणून काँग्रेससारखे पक्ष संविधानाला कमकुवत ठरवून अफवा पसरवत आहेत की, भाजप संविधान बदलणार आहे. खरेतर, संविधान इतके कमकुवत नाही, तर शक्तिशाली आहे. त्यामुळे ‘भाजप संविधान बदलणार’ अशी अफवा पसरवणारे लोकच संविधानविरोधी आहेत. संविधानाची शक्ती समाजासमोर सर्वार्थाने येणे गरजेचे आहे. पण, भारतीय संविधानातील अनेक मूलभूत मुद्दे व अंग सामान्य माणसाला ज्ञात नाहीत. आपल्या ‘संविधान जागर यात्रे’त संविधानतज्ज्ञ व अभ्यासकांमुळे संविधानातील अनेक पैलू उलगडत आहेत. त्यामुळे आपण जगातील एका प्रगत राष्ट्राचे नागरिक आहोत, याचा सार्थ अभिमान वाटतो. संविधानकारांचे प्रत्येक भारतीयांवर अमाप उपकार आहे. त्यामुळे ‘भाजप संविधान बदलणार’ अशी अफवा पसरवणार्‍या खोटारड्या राष्ट्रद्रोही लोकांचा डाव आम्ही बाबासाहेबांची लेकरं हाणून पाडू!
- राजेंद्र गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जिवलग सहकारी दादासाहेब गायकवाड यांचे नातू, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सामाजिक संघटना, महाराष्ट्र, अध्यक्ष


भाजप संविधान बदलणार म्हणणारे खोटारडे

संविधानाच्या मूलभूत अधिकारात अनुच्छेद 15 व 16 मध्ये शिक्षण, नोकरी व नोकरीतील पदोन्नतीचा मूलभूत अधिकार समाविष्ट असल्यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, भटके व विमुक्त यांचा आरक्षणाचा हक्क आहे. त्याआधी संविधानाच्या अनुच्छेद 12 ते 35 मध्ये स्पष्ट आहे की, सर्व मूलभूत अधिकारात कोणालाही कसल्याही प्रकारचा बदल करताच येणार नाही. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद (लोकसभा व राज्यसभा), सर्वोच्च न्यायालय यापैकी कोणालाही कसलाही बदल करता येणार नाही. याचा अर्थ आमचे आरक्षण हे कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. हे सत्य असताना काँग्रेस आणि त्यांचे सोबतचे पक्ष खोटेनाटे पसरवत आहेत की, भाजपला एकहाती सत्ता मिळाली तर ते संविधान बदलतील, आरक्षण हटवतील. जनतेचा विकास न करणारे, जनतेला सतत फसवून, खोटे सांगून, देशावर याच पक्षाच्या एका घराण्याने राज्य केले. त्यांनी व त्यांच्या पिलावळीने संविधान, आरक्षण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने लबाडी केली. राजकारण केले. तसेच आरक्षणाअंतर्गत आरक्षणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यामध्ये क्रिमीलेअरची अट लावणे हे सर्वोच्च न्यायालयाचे मत होते निर्णय नाही. मात्र, या मताचा संबंधही विरोधी पक्षाने नरेंद्र मोदी व भाजप सरकार यांच्याशी जोडला. हे चूक आहेे. मागासवर्गीय समाजासाठी काम करणार्‍या भाजप सरकारविरोधात आणि संविधानाविरोधात खोटीनाटी अफवा पसरवणार्‍यांना आम्ही फुले-आंबेडकरी जनता कधीच माफ करणार नाही व धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही!
- अ‍ॅड. वाल्मिक निकाळजे, मानवी हक्क अभियानाचे संस्थापक सदस्य, भारतीय दलित पँथर राज्यस्तरीय कार्यकर्ते


यात्रेतील तीन ठराव आणि इतर...

1. देशात 70 वर्षांची घराणेशाही उलथवून सर्व सामान्यांना सत्तेची चावी केवळ संविधानामुळे शक्य झाले.

2. नोकरीतील पदोन्नती व नवबौद्ध आरक्षण इंदिरा गांधी यांनी रोखले होती, ती अटलजींद्वारा सुरुवात व आरक्षण मुदतवाढ करणार्‍या केंद्र सरकारचे अभिनंदन

3. भारत संविधानाच्या मार्गाने प्रगती करत राहिला तर बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार भारत लवकरच महासत्तेच्या दिशेने वाटचाल करेल.

4. यात्रेत संविधान जागर समितीने ’कधीच न बदलणारे संविधान व त्याच्या हत्येचा प्रयत्न करणारी काँग्रेस’ या विषयाचे पुस्तक व मुस्लिमांकडून दलित वंचितांवर झालेल्या अन्यायाच्या घटनांचा अहवाल समितीच्या वतीने प्रकाशित करण्यात आला.
9594969638

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.