मराठी चित्रपटसृष्टी बॉलिवूडपेक्षा कमी नाही : देव गिल

Total Views |
 
Aho Vikramaarka
 
‘मगधिरा’ चित्रपटामुळे विशेष ओळख निर्माण करणारे आणि दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचे शिष्य असलेले अभिनेते-निर्माते देव गिल यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले असून, त्यांचा आगामी ‘अहो विक्रमार्का’ चित्रपट मराठी आणि तेलुगू भाषांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे अन्य भारतीय भाषांमध्येही डबिंग करण्यात आले आहे. देव गिल यांनी आजवर कन्नड, तेलुगू, तामिळ, पंजाबी आणि हिंदी चित्रपटांत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तेव्हा, ‘अहो विक्रमार्का’ या त्यांच्या आगामी चित्रपटानिमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’ने त्यांच्याशी साधलेला संवाद.
 
महाराष्ट्रातील कलाकारांना व्यासपीठ मिळावं ही इच्छा...
 
देव गिल यांची जन्मभूमी महाराष्ट्र असून आपल्या कर्मभूमीबद्दल सांगताना ते म्हणाले की, “माझा जन्म पुण्यात झाला असून, मी पुण्यातच राहतो. फार आधीपासून माझं स्वप्न होतं की, माझ्या माणसांना मला व्यासपीठ मिळवून द्यायचं होतं. कारण, 20 वर्षांपूर्वी मला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत जाऊन स्वत:चे नाव आणि स्थान निर्माण करण्याची संधी ‘मगधिरा’ या चित्रपटामुळे मिळाली होती. त्यामुळे मी एक गोष्ट कायम सांगतो की, मला जन्म माझ्या आईवडिलांनी दिला आणि मला नाव दिग्दर्शक आणि माझे गुरुवर्य एस. एस. राजामौली यांनी दिलं. कायम माझ्या आईने मला एक शिकवण दिली होती की, ‘जर का तू आपल्या लोकांसाठी काही करू शकतो तर नक्की कर’ आणि ‘अहो विक्रमार्का’ हा चित्रपट ज्यावेळी करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी पुणे आणि महाराष्ट्रातील विविध भागांमधील कलाकारांना राष्ट्रीय पातळीवर व्यासपीठ मिळावं, ही इच्छा होती आणि म्हणूनच हा चित्रपट मराठी आणि तेलुगू भाषेत चित्रित केला आणि पुण्यातच संपूर्ण चित्रीकरणदेखील केलं.”
 
प्रवीण तरडेंचं नाव इतर प्रादेशिक चित्रपटसृष्टीत व्हावं हे स्वप्न  
 
अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याबद्दल विशेष कौतुक करताना देव म्हणाले की, “प्रवीण तरडे हे फार ताकदीचे कलाकार आहेत. त्यांच्याशी माझी पहिली भेट ही त्यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या निमित्ताने झाली होती. त्यांना भेटल्यानंतर एका बाबीने माझ्या मनात घर केलं की, ही व्यक्ती फार हुशार आहे आणि त्यांना आणखी मोठ्या प्लॅटफॉर्मची गरज आहे. जेव्हा ‘अहो विक्रमार्का’ या चित्रपटाची चित्रीकरणापूर्वीची सगळी पूर्वतयारी झाली; त्यावेळी या चित्रपटात प्रवीण तरडेच असावे, हे मी निश्चित केलं होतं. कारण, संपूर्ण महाराष्ट्र तर त्यांना ओळखतोच, पण देशातील इतर प्रादेशिक चित्रपटसृष्टीतही त्यांचे नाव व्हावे, हे माझं स्वप्न असल्यामुळे मी त्यांना या चित्रपटात खलनायकाची भूमिका दिली.”
 
एस. एस. राजामौली हे माझे गॉडफादर!
 
“दिग्दर्शक एस. एस. राजामौली हे माझे गॉडफादर आहेत. त्यांचाच शिष्य असल्यामुळे त्यांची दिग्दर्शनाची पद्धत, त्यांची टीम यांच्याच मदतीने मी ‘अहो विक्रमार्का’ हा चित्रपट तयार केला आहे. ज्यांनी ‘आर. आर. आर’, ‘बाहुबली’ हे चित्रपट केले आहेत किंवा ज्यांनी ‘ऑस्कर’ जिंकले आहे, अशा क्रिएटिव्ह कलाकारांच्या साथीने हा चित्रपट आम्ही मराठीत तयार केला आहे. ‘केजीएफ’सारख्या अनेक चित्रपटांचे बॅकग्राऊंड म्युझिक करणार्‍या रवी बसरूर यांनी ‘अहो विक्रमार्का’चं पार्श्वसंगीत केलं आहे. ‘पुष्पा’ चित्रपटाच्या ‘फायटिंग मास्टर’ने या चित्रपटासाठी काम केलं आहे, तर अशा दिग्गज कलाकारांना सोबत घेऊन आम्ही मराठी चित्रपटसृष्टीला एक नवी कलाकृती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे,” असे सांगत मराठी चित्रपटसृष्टीला अजून मोठ्या उंचीवर न्यायचे आहे, असेदेखील गिल म्हणाले.
 
मराठी चित्रपटसृष्टीदेखील हिंदीपेक्षा कमी नाही
 
मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील फरक सांगताना देव गिल म्हणाले की, “मराठी चित्रपट हा वास्तववादी अधिक आहे आणि दाक्षिणात्य चित्रपट हे ‘लार्जर दॅन लाईफ’ चित्रपट आहेत. मला असं वाटतं की मराठीत कुशल कलाकार आहेत आणि त्यांना योग्य व्यासपीठ जर का मिळालं तर मराठी चित्रपटसृष्टीदेखील हिंदीपेक्षा कमी नाही.
लेखिका - रसिका शिंदे-पॉल
 

रसिका शिंदे - पॉल

रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.